Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
May 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ मे
२०२५ दुपारी १.०० वा.
****
भारत पंचाहत्तर वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत असून, पाकिस्तान वारंवार निष्पाप नागरिकांवर हल्ले करवत असल्याचं सांगत आता भारत प्रत्येक
हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी दिला आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथे बोलत होते. ऑपरेशन सिंदूरच्या
माध्यमातून भारतीय सैन्यदलानं अवघ्या २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त केले.
सीमेपलीकडून होणारा दहशतवाद प्रॉक्सी वॉर नाही तर युद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून मध्ये गांधीनगर इथं त्यांच्या हस्ते ‘शहरी विकास २०२५’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांच्या हस्ते आज
एकूण ५५३७ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा पार पडला.
तत्पूर्वी,
पंतप्रधानांच्या उपस्थितीत गांधीनगर इथं राजभवन ते महात्मा मंदिर
ऑपरेशन सिंदूर सन्मान यात्रा काढण्यात आली. नागरिकांनी तिरंगा फडकावत आणि जोरदार घोषणा
देत पंतप्रधानांचं गांधीनगरमध्ये स्वागत केलं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या
श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात
आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले. थोड्याच वेळात मुंबई विद्यापीठात आयोजित छत्रपती
संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहणार आहेत.तसंच
मुंबई विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राचं
उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसाव्या
जयंतीच्या पूर्वसंध्येला अमित शहा यांचं विशेष व्याख्यानही आज होणार आहे.
****
ऑपरेशन सिंदूर बाबत भारताची भूमिका जगभरातल्या अनेक देशांसमोर
मांडण्यासाठी भारत सरकारनं पाठवलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळांच्या विविध देशांना
भेटी सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या अशा शिष्टमंडळानं आपल्या
चार देशांच्या भेटींपैकी पहिली भेट कतार या देशाला दिली. दोन दिवसांच्या या भेटीत भारतीय
शिष्टमंडळानं कतारच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री, संसदेचे उपाध्यक्ष यांच्या समकक्ष उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी,
तसंच त्या देशाचे निवडक पत्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी
चर्चा केली. खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल गयाना इथं भेट
दिली. गयानानं दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेचं समर्थन केल्याचं थरुर यांनी सांगितलं.
****
इयत्ता अकरावीच्या प्रवेशाकरता काल ऑनलाईन नोंदणी पोर्टल कार्यान्वित
केल्यानंतर,
पहिल्या दिवशी दोन लाख अठ्ठावन हजार आठशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी
नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. राज्यस्तर प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा
शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी ही माहिती दिली. या पोर्टलवर नऊ हजार तीनशे
अडोतीस महाविद्यालयांची नोंदणी असून,त्यातून अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे पस्तीस जागा उपलब्ध आहेत. या प्रक्रियेतल्या
तांत्रिक अडचणी किंवा इतर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ८५ ३० ९५ ५५
६४ या सहाय्यता क्रमांकावर संपर्क साधावा, असं
आवाहन शिक्षण संचालकांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात येत्या एकोणीस जुलैला एकाच दिवशी पन्नास लाख
वृक्षांची लागवड करण्याचं नियोजन असून, वृक्ष लागवडीशी संबंधित
सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात, असे
निर्देश धाराशीवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या
आढावा बैठकीत ते आज बोलत होते. खुल्या जागा, शाळांचे
तसंच साखर कारखान्यांचे परिसर वृक्ष लागवडीसाठी निवडण्याची सूचना त्यांनी केली. सहा
महिन्यांनंतर या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेण्यात येईल, असंही
पुजार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथे काल झालेल्या
पावसामुळे पपई,
आंबा आणि इतर फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या
वादळी पावसामुळे अनेक वृक्षही उन्मळून पडले असून बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे
वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक घरं आणि गोठ्यांचंही मोठं नुकसान झालं असून, या सगळ्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थ करत असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दक्षिण कोरियातल्या गुमी इथे सुरू असलेल्या आशियायी ॲथलेटिक्स
अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सर्व्हिन सेबॅस्टियननं भारतीय पदकांचं खातं उघडताना, पुरुषांच्या वीस किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment