Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दहशतवाद समूळ नष्ट केला जाईल, उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांचं मुंबई इथल्या कार्यक्रमात प्रतिपादन
·
२०२५-२६ च्या पणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान
आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
·
छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत
कार्यान्वीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·
तुळजापूरसह विविध देवस्थानांच्या तीन हजार कोटी रुपयांच्या
विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता
आणि
·
देशभरात आजपासून विकसित कृषी संकल्प अभियान, कृषी विज्ञान
केंद्रांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
दहशतवाद
सहन केला जाणार नाही, तो समूळ नष्ट केला जाईल, असा ठाम संदेश उपराष्ट्रपती
जगदीप धनखड यांनी दिला आहे. मुंबईत गोवंडी इथल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान
संस्थेच्या ६५ व्या आणि ६६ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. युद्धासाठी सज्जता
हीच शांततेची हमी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
लोकसंख्या, लोकशाही आणि
विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ असून, लोकसंख्येचा अभ्यास
करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरणनिर्मिती
यातला दुवा म्हणून महत्त्वाचं काम करतात, असंही धनखड यावेळी म्हणाले.
जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं
मर्यादित राहता कामा नये, असंही त्यांनी सांगितलं.
****
२०२५-२६
च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने मान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि
प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. शेतकऱ्यांना
त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा यासाठी एमएसपीमध्ये वाढ केल्याचं त्यांनी
सांगितलं.
बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री
यामध्ये
कारळासाठी ८२० रुपये प्रती क्विंटल, नाचणी ५९६ रुपये, कापूस ५८९ रुपये, आणि तीळासाठी ५७९ रुपये प्रती क्विंटल
एमएसपी निश्चित करण्यात आली आहे.
रेल्वे
प्रवासी आणि मालाची विना अडथळा आणि जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र आणि
मध्य प्रदेशातल्या दोन मल्टीट्रॅकिंग म्हणजेच बहुमार्गिका प्रकल्पांनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं
मंजूरी दिली. यामध्ये दिल्ली - चेन्नई रेल्वे मार्गावरच्या वर्धा ते बल्लारशा दरम्यान
चौथ्या मार्गाचा समावेश आहे. या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे १७६
किलोमीटरने वाढेल, असं वैष्णव यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना
परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, व्याज अनुदान
सुरू ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याचा सात कोटी ७१ लाख शेतकऱ्यांना
फायदा होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत
कार्यान्वीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या
आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेअंतर्गत सर्व प्रलंबित कामं तातडीने मार्गी
लागण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, ठेकेदारांना
काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात,
आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. या योजनेतला २६ एम एल डी पाणी पुरवठा
करणारा टप्पा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा, पाईप लाइन टाकण्याच्या
कामासाठी १५ जून नंतर शटडाउन घ्यावा, या कामामध्ये खंड पडू नये
यासाठी महानगरपालिकेला ८२२ कोटी रुपयांचा कर्ज निधी उभारण्याची मंजुरी तातडीने द्यावी,
असंही त्यांनी सूचित केलं.
ठेकेदाराने
वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
****
दरम्यान, मुख्यमंत्री
फडणवीस आज परभणी जिल्हा दौऱ्यावर असून, वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या विविध
विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, ते जाहीर सभेतही संबोधित करणार आहेत.
****
राज्यातल्या
विविध देवस्थानांच्या विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला
प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यासंदर्भातले शासन निर्णय नियोजन विभागाने
काल जारी केले. यामध्ये तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिराच्या विकासाकरता एक हजार
८६५ कोटी, मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृतीस्थळाच्या
विकासाकरता ६८१ कोटी, कोल्हापूर मधल्या जोतिबा मंदिराच्या विकासासाठी
२५९ कोटी, अष्टविनायक मंदिरांच्या विकासाकरता १४८ कोटी रुपये
खर्चाच्या विकासकामांचा समावेश आहे. या विकास आराखड्यांमुळे या मंदिर आणि परिसराचा
विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना
पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
****
राज्य परिवहन
महामंडळाच्या स्मार्ट बस मध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली लावण्यात
येणार असल्यानं, या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या
ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या 'स्मार्ट बस'मध्ये बसवण्यात आलेल्या, आयटी सुरक्षा प्रणालीची काल
पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या प्रणालीअंतर्गत
चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर
देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच, वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक
प्रणाली देखील बसवण्यात येणार असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांची १४२ वी जयंती काल सर्वत्र साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर
शहरात समर्थनगर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या
वतीनं अभिवादन करण्यात आलं. धाराशिव शहरात जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी
महाराज चौक इथं सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं, तुळजापुरातही
स्वातंत्र्यवीर सावरकर चौक इथं मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
****
देशभरात
आजपासून विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
या अभियानाच्या माध्यमातून ९० गावांमध्ये कृषी तंत्रज्ञान, खरीप पीक,
कृषी औजार तसंच नवनवीन विकसीत कृषी संशोधन, प्रकल्पांबाबत
शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ
घेण्याचं आावाहन कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केलं आहे.
****
जालन्यात
खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने मोठी कारवाई करत उत्पादनास परवानगी नसलेल्या
फॉस्फोजिप्सम या खताचा तब्बल वीस लाख रुपये किमतीचा ३२० मेट्रिक टन साठा जप्त केला.
कृषी विभागाच्या पथकाने काल जालना-राजूर मार्गावर गुंडेवाडी शिवारात कृष्णा फास्केईम
लिमीटेड या कंपनीने भाड्याने घेतलेल्या गोदामांवर छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी
कंपनीच्या कायदेशीर जबाबदार व्यक्तींसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
भारतीय
सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या रुपाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबदल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नांदेडमध्ये काल काँग्रेसच्या
वतीनं 'जय जवान जय किसान' तिरंगा महारॅली काढण्यात
आली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक यावेळी उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यात
पाथरी आगाराला राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १४ नवीन बसेस मिळाल्या असून, आमदार राजेश
विटेकर यांच्या हस्ते काल या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. पाथरी आगारातल्या एकूण
बसेसची संख्या आता ७४ झाली असून, दररोज सुमारे २५ हजार किलोमीटरचा
प्रवास केला जात आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सेवा देता येणार असल्याचं विटेकर यांनी
सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात
सुरु झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने अनेक भागात पिकांचं तसंच मालमत्तेचं नुकसान झालं
आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची
सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या
नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काल आयोजित बैठकीत ते बोलत होते.
****
जालना जिल्ह्यात
बदनापूर इथं मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी केली.
****
No comments:
Post a Comment