Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 May 2025
Time 18.10 to 18.20 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०२५ दुपारी १८.०० वा.
****
· ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यात हानी झालेल्या
नागरीकांच्या पाठिशी संपूर्ण देश - गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन
· राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स
नाईटिंगेल पुरस्कार प्रदान, जळगावच्या सुजाता बागुल यांचा समावेश
· पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात १७ महिला कॅडेट्सच्या
पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड
· रेल्वे विभागाकडून उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर
आणि
· विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
****
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या हल्ल्यात हानी झालेल्या नागरीकांच्या
पाठीशी संपूर्ण देश उभा आहे,
असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या
दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी आज पूंछमध्ये सार्वजनिक सभेत बोलताना,
हल्ल्यांमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची स्पष्ट हमी
दिली. या सभेत त्यांनी पाकिस्तानच्या निंदनीय कृत्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि
भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवायांचा उल्लेख केला.
भारताच्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला भारत सहन करणार
नाही, असं शहा यांनी स्पष्ट केलं.
बाईट – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
दरम्यान, अमरनाथ यात्रेपूर्वी
घेतलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत शहा यांनी लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
ही यात्रा जुलै महिन्यात सुरू होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं ४८
हजार ५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि
पायाभरणी केली. यात साडेपाच हजार कोटी रुपयांचा चौपदरी पाटणा - गया - दोभी महामार्ग, २४९ कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे. वाहतूक,
ऊर्जा, रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे
लाभ होणार आहे.
त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उत्तरप्रदेशात कानपूर इथंही ४७
हजार ५७३ कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली.
****
शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी ‘बायोचार’चा वापर करा असं आवाहन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या
वतीने नागपूरच्या धापेवाडा इथल्या भक्ती फार्मस् इथं आयोजित बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक
आणि प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. बायोचार हा पिकांचं अवशेष जाळून तयार केलेला
कोळशासारखा पदार्थ आहे. आपल्याकडे उपलब्ध पऱ्हाटी आणि तुऱ्हाटी हा बायोचार तयार करण्यासाठी
उत्तम बायोमास आहे.
नवीन तंत्र, नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवावी लागेल, शेतात वापरायच्या छोट्या उपकरणांची बँक तयार करणं गरजेचं आहे, काळाच्या ओघात शेतकऱ्यांनाच आपल्या विकासाचा मार्ग शोधावा लागेल, असंही गडकरी यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात
आयोजित एका समारंभात १५ परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार २०२५
प्रदान करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला
जातो. जळगावच्या सुजाता बागुल यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शासनाच्या आरोग्य योजनांचा
लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना
हा पुरस्कार देण्यात आला.
****
महाराष्ट्र राजभवन इथं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या
प्रमुख उपस्थितीत आजचा गोवा राज्य स्थापना दिवस आणि येत्या दोन जून ला साजरा होणारा
तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून हे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. यावेळी दोन्ही राज्यांचा
इतिहास आणि वारसा दर्शवणारे लघुपट देखील दाखवण्यात आले.
****
पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीए चा १४८ वा
दीक्षांत समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिवशी पहिल्यांदाच १७ महिला
कॅडेट्सनी तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला. या
संचलनात सहभागी झाल्यानंतर महिला छात्रांनी पुशअप्स मारून आपल्या यशाचा जल्लोष केला.
२०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महिलांना एनडीएमध्ये प्रवेश देण्यात
आला होता, त्याची ही पहिली फलश्रुती आहे.
या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग,
दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एनडीएचे प्रमुख
व्हाईस अॅडमिरल गुरुचरण सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
****
रेल्वे विभागाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर धाराशिव
रेल्वे स्थानक असं केलं आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्वीच्या उस्मानाबादचं नाव बदलून
धाराशिव केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे नामांतर केलं आहे. स्थानकाचं नवीन नाव
आणि कोडला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोशिएशनकडून मान्यता देण्यात आली आहे. पूर्वी उस्मानाबाद
नाव असलेल्या या स्टेशनचा कोड यू एम डी असा होता, तो बदलून आता धाराशिव या नवीन नावाच्या स्टेशनचा कोड, डी आर एस व्ही असा झाला आहे. सर्व रेल्वे नोंदी, निवेदन
आदी या नवीन नावाने होतील. हा बदल करण्यासाठी उद्या ३१ तारखेला मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन
सिस्टिम ही आरक्षण प्रणाली, रात्री पावणे बारा ते दीड वाजेपर्यंत
तात्पुरती बंद करण्यात येणार असून, यात्रेकरू आणि जनतेने याची
नोंद घ्यावी असं मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव इथं विकसित कृषी
संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र
रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेच्या चित्ररथाला यावेळी हिरवा झेंडा दाखवून
रवाना करण्यात आलं.
यावेळी कृषी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी नवी न विकसित झालेल्या
बियाण्याच्या वाणाची, तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची
माहिती दिली. खत, किड आणि रोगाचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, जमिनीचं आरोग्य संतुलन आणि मृदा आरोग्य
पत्रिकेचं महत्व यावर देखील या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थित शेतकरी
यादव देशमुख यांनी, या कार्यक्रमात माती परिक्षणाबाबत माहिती
मिळाल्याचं सांगितलं.
बाईट – यादव देशमुख, शेतकरी
****
ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ बीड शहरात आज रिपब्लिकन पक्ष आठवले
गटाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात
आलेल्या या भारत झिंदाबाद तिरंगा रॅलीत हजारो रिपाइं कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या
अविनाश साबळेनं तीन किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. याबद्दल बीड
जिल्ह्यातल्या मांडवा या त्याच्या गावी आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थ तसंच
अविनाशच्या प्राध्यापकांनी त्याच्या कुटुंबियांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. यावेळी अविनाशची आई वैशाली साबळे आणि वडील
मुकुंद साबळे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
बाईट - वैशाली साबळे आणि मुकुंद साबळे
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स
आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. यातील विजेता संघ एक जून रोजी पात्रता
फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाबरोबर खेळेल. आणि या सामन्यातला विजेता
संघ तीन जूनला अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी सोबत खेळेल.
****
गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे
लघु, मध्यम आणि लहान प्रकल्पातला पाणीसाठा
वाढत आहे. बीड शहरालगत असलेलं बिंदुसरा धरण पूर्ण भरलं आहे. धरणाच्या मध्य चादरीवरून
पाणी वाहण्याची शक्यता लक्षात घेता बिंदुसरा नदीलगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं
आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.
****
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण
मध्य रेल्वेनं पूर्णा -जालना- पूर्णा साप्ताहिक विशेष रेल्वे चालवण्याचं नियोजन केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment