Wednesday, 28 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 May 2025

Time 18.10 to 18.20 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

·      २०२५-२६ च्या पणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

·      चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मंजूरी

·      राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट बस मध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

·      स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची १४२ वी जयंती उत्साहात साजरी

आणि

·      यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस नियमित सरासरीपेक्षा जास्त पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, मान्सून मराठवाड्यात दाखल

****

२०२५-२६ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयकमान्यता दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा यासाठी एमएसपीमध्ये वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं.

बाईट - अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

 

यामध्ये कारळासाठी ८२० रुपये प्रती क्विंटल, नाचणी ५९६ रुपये, कापूस ५८९ रुपये, आणि तीळासाठी ५७९ रुपये प्रती क्विंटल एमएसपी निश्चित करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासी आणि मालाची विना अडथळा आणि जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या दोन मल्टीट्रॅकिंग म्हणजेच बहुमार्गिका प्रकल्पांनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. यामध्ये दिल्ली - चेन्नई रेल्वे मार्गावरच्या वर्धा ते बल्लारशा रेल्वेमार्गादरम्यान चौथ्या मार्गाचा समावेश आहे. या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं जाळं सुमारे १७६ किलोमीटरने वाढेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. तीन हजार ३९९ कोटी रुपयांचे हे प्रकल्प २०२९-३० या वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे ७८४ गावांमधल्या २० लाख नागरिकांना लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत व्याज अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याचा सात कोटी ७१ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. गोवंडी इथल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या ६५व्या आणि ६६व्या दीक्षांत समारंभात ते सहभागी झाले होते. ही संस्था लोकसंख्या, आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, ग्रामीण आरोग्य अभियान यांसारख्या महत्वाच्या विषयांवर अभ्यास करते.

****

ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी जनता दलाचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचलं. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया सरकारचे सदस्य, राजकीय पक्षांचे नेते, आसियानचे सरचिटणीस यांची भेट घेणार आहे.

द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ ग्रीसचा दौरा आटोपून लाटविया आणि स्पेनला भेट देईल.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काँगोच्या राष्ट्रीय सभेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बर्थोल्ड उलुंगू यांची भेट घेतली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या मौजे चौंडी इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाच्या जतन संवर्धन विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय नियोजन विभागाने आज जारी केला. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातली कामं करताना त्यांचं ऐतिहासिक महत्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचं तसंच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनंच ही कामं करु घ्यावीत, विकास आराखड्यातली सर्व कामं पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट बस मध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली लावण्यात येणार असल्यानं, या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची आज पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

या प्रणालीअंतर्गत चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धती पासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.

****

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची १४२ वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांना अभिवादन केलं.

नाशिक जिल्ह्यात भगूर या सावरकर यांच्या मूळ गावी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं. समर्थनगर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला उपआयुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विविध पक्ष संघटनांच्या वतीनेही सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं. याठिकाणी संध्याकाळी व्याख्यान आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.

धाराशिव शहरात जयोस्तु प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं सावरकरांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आमदार कैलास पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजसिंह राजे निंबाळकर, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तुळजापुरातही स्वातंत्र्यवीर सावरकर चौक इथं मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रावार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना परभणी जिल्ह्यातले सुभेदार गणपत संसारे यांनी भारतीय सैन्य दलाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले

बाईट – सुभेदार (नि) गणपत संसारे

****

लातूर जिल्ह्यात सुरु झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने अनेक भागात पिकांचं तसंच मालमत्तेचं नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. लातूर शहरात मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर आणि शहरातल्या सकल भागात पाणी जमा झालं असून, अनेक ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलं आहे. नुकसान झालेल्या घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासकीय नियमानुसार आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, महानगरपालिकेने शहरातल्या नाल्यांची सफाई मोहीम हाती घ्यावी, आदी सूचनाही भोसले यांनी दिल्या.

****

जालना जिल्ह्यात बदनापूर इथं मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार नारायण कुचे आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर देत, त्यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

****

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रीय झाला असून, अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेडमध्ये मान्सून पोहोचला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून याठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. कोम यांच्या पार्थिवावर उद्या तलासरी इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.           

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...