Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29
May 2025
Time 18.10 to
18.20 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे
२०२५ दुपारी १८.०० वा.
****
·
देशव्यापी विकसित
कृषी संकल्प अभियानाचा केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, महाराष्ट्रात साडेचार
हजार गावांमध्ये अभियान राबवणार
·
मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते मराठवाडा कृषी विद्यापीठात अमेरिकन कपाशीच्या तीन सरळ वाणांचं लोकार्पण
·
ई - गव्हर्नन्सच्या
माध्यमातून राज्यातल्या नागरिकांना साडे बाराशे सेवा ऑनलाईन देण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची
माहिती
·
गेल्या आर्थिक वर्षात
महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक
·
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्याचा २०२५-२६ वर्षाकरता ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा पतआराखडा तयार
आणि
·
जालन्यात आजही जोरदार
पाऊस, लातूरसह मराठवाड्यासाठी
हवामान खात्याचा यलो अलर्ट
****
देशाव्यापी विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ आज ओडिशामध्ये केंद्रीय कृषीमंत्री
शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते झाला. आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असून, आज शास्त्रज्ञ त्यांच्या
प्रयोगशाळांमधून बाहेर पडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. आणि आपल्या नव्या संशोधन आणि कृषीविषयक
घडामोडी यांची माहिती त्यांना देत आहेत, असं चौहान यांनी सांगितलं. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रीय
कृषी मंत्रालय, राज्यांचे विभाग
आणि कृषी विद्यापीठं एकत्रित काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बाईट – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
या अभियानांतर्गत देशातल्या ७०० जिल्ह्यांमध्ये दोन हजारांहून अधिक कृषी शास्त्रज्ञ
शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
****
दरम्यान, विकसित कृषी संकल्प अभियानाचा
राज्यस्तरीय शुभारंभ परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांनी अभियानाच्या चित्ररथाला हिरवा
झेंडा दाखवून रवाना केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित
होत्या. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी
अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने
लाभत असून, त्यांना शास्वत
उत्पादन घेता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि ५० कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून चार हजार
५०० गावांमध्ये राबवलं जाणार आहे.
****
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचं
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात
अमेरिकन कपाशीच्या तीन सरळ वाणांचं लोकार्पण, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते
बोलत होते. कृषी संशोधनाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात असून, वेळोवेळी वाण विकसित
करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटनही आज वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा
वापर सुरू झाला असून, राज्यातल्या कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांच्या
उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन
करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिले.
परभणी इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचं ई-भूमिपूजनही
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं. गंगाखेड रोड वरील ब्राम्हणगाव आणि ब्रम्हपुरी
या गावाच्या शिवारात या महाविद्यालयासाठी २० हेक्टर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या जागेवर ४३० खाटांचं रुग्णालय आणि १०० विद्यार्थी क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय
उभारण्यात येणार आहे.
****
हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही आज
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि महिला मेळाव्याला संबोधित
केलं. शासनाच्या सर्व प्रकारच्या साडे बाराशे सेवा ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. या सेवा नागरिकांना घरबसल्या वॉट्सॲपच्या माध्यमातून मिळवता येतील, असं ते म्हणाले.
आगामी दिडशे दिवसांच्या कार्यक्रमात ई - गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर
करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरच्या
माध्यमातून भारताची ताकद जगाला दिसली, भारतीय सैन्याने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपलं सामर्थ्य
दाखवून दिलं, असं ते म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगावला तालुका करण्यासंदर्भात विचार केला जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिलं.
****
गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एक लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय
गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही गुंतवणूक देशाच्या
एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक
३२ टक्के अधिक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत २५ हजार
४४१ कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याची ही घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त
करत मुख्यमंत्र्यांनी, जनतेचं अभिनंदन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा २०२५-२६ वर्षाकरता ३३ हजार ५०० कोटी रुपयांचा पतआराखडा
तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज या पत आराखड्याचं
विमोचन करण्यात आलं. शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज पुरवठा होण्यासाठी बॅंकांनी कालबद्ध
पद्धतीने कार्यक्रम राबवावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या तुळजापूर- लातूर महामार्गावर आशिव ते उजनी
दरम्यान दोन ट्रॅव्हल्सचा अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. पुणे - उदगीर आणि मुंबई -
उदगीर धावणाऱ्या या खासगी
ट्रॅव्हल्स होत्या. आज पहाटे हा अपघात झाला असून, जखमींना लातूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं
आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई बस स्थानकावर बसने चिरडल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू
झाला. आज सकाळच्या सुमारास मृत अंकुश मोरे, हे बस मध्ये चढत असताना शेजारी उभी असलेली बस प्रवाशाच्या
अंगावरून गेली. याप्रकरणी पोलिस ठाण्यास गुन्हा दाखल झाला आहे.
****
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’
ही संकल्पना घेऊन एक ते सहा जून दरम्यान संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताह राबवण्यात
येणार आहे. याअंतर्गत मॅरेथॉन, रॅली, निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच
ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल आणि एसएमएस पाठवणं, भित्तिपत्रकं, चित्रफिती अशा विविध माध्यमांद्वारे विद्युत सुरक्षेविषयी
मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांमध्ये वीज अपघाताचं
प्रमाण कमी करण्यात महावितरणला यश आलं आहे. मात्र तरीही विविध कारणास्तव अपघात होतात, ते कमी करण्यासाठी
हा सप्ताह राबवण्यात येत असल्याचं, याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. लातूर जिल्ह्यातही
पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. लातूरसह छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, आणि धाराशिव जिल्ह्यांना
आजच्या दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढचे दोन आठवडे
राज्यात कोकण वगळता इतर भागात पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित राहीलेली कामं पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल. १२ जून
पासून राज्यात मान्सून परत येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. चंदीगढ इथं महाराजा
यादविंद्र सिंग स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
उद्या होणारा एलिमेनिटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात
येणार आहे.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी
आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या
जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव
केला. पुढच्या फेरीत सात्विक - चिराग जोडीचा सामना मलेशियाच्या जोडीसोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment