Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date 28 May 2025
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर
येणार आहेत. उपराष्ट्रपती मुंबई इथल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान
संस्थेच्या ६५ व्या आणि ६६ व्या दीक्षांत सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ आणि ३० मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर आहेत. सिक्कीम इथं सिक्कीम ऍट फिफ्टी
कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील. तर, उत्तर प्रदेशातील
कानपूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते २० हजार ९०० कोटी रुपयांच्या विविध विकास
प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. बिहारमध्ये पंतप्रधान करकत
इथं ४८ हजार ५२० कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तर, पश्चिम बंगाल दौऱ्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत अलिपूरदूर इथं शहर गॅस वितरण
प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे.
****
आज स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जयंती साजरी करण्यात
येत आहे. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. वीर सावरकर
यांची स्वातंत्र्य चळवळीतील अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा कृतज्ञ राष्ट्र
कधीही विसरू शकत नाही. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचे बलिदान आणि
देशासाठीचे समर्पण मार्गदर्शक ठरत राहील अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं समर्थनगर भागात सावरकर यांच्या
पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
मुंबई विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन
कार्याला समर्पित असलेल्या अभ्यास आणि संशोधन केंद्राचं काल राज्यपाल सी पी
राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित
ठिकाणांना जोडणारी अखिल भारतीय सावरकर पर्यटन साखळी तयार करावी, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
****
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात
बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. काँग्रेस खासदार शशी
थरूर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पनामाच्या संसद
अध्यक्षांची भेट घेतली. दहशतवादी कृत्यांना शिक्षा देणं हा भारताचा उद्देश
असल्याचं थरूर यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने
दक्षिण आफ्रिकेतील सदस्यांची भेट घेतली. दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने
सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर ही सुनियोजित आणि योग्य कारवाई होती असं त्यांनी
सांगितलं. या शिष्टमंडळाचे सदस्य आज केपटाऊन इथं विविध शासकीय मंत्र्यांसोबत बैठक
घेणार आहे. खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने
कुवैतचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला आणि दहशतवादाविरुद्ध भारताचा शून्य सहनशीलता
आणि नवीन सामान्य दृष्टिकोन अधोरेखित केला.
****
मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात कोरोना विषाणूच्या
रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कल्याण-डोंबिवली इथं काल कोविड-19 बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या प्रभारी अधिकारी
डॉ. दीपा शुक्ला यांनी ही माहिती दिली. याशिवाय अन्य दोन रुग्णांवर उपचार सुरू
असून एका रुग्णाला उपचारानंतर सुटी देण्यात आली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
धाराशिव इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने
दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या
कार्यक्रमात शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा
त्यांच्या पालकांसह स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात आज जागतिक मासिक पाळी स्वच्छता
दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना
कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या समन्वयाने हे उपक्रम राबवले जाणार
आहे. यात गावपातळीवर किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम, संवाद सत्रे, आरोग्य शिबिरे, प्रबोधन
कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
हवामान
राज्यात
तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी
झाले आहेत. पुणे इथं तीन जालना इथं दोन जणांचा तर आणि मुंबई, रायगड आणि अहिल्यानगर इथं प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. लातूर
इथं गेल्या तीन दिवसांत सरासरी २०६ पूर्णांक ५ मिलीमीटर पाऊस झाला. पावसामुळं
जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील
दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या
कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली
आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड,
परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या पहिल्या क्वालीफायर सामन्यात
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात सामना
होणार आहे. तर, एलिमेनिटर सामना
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान होणार आहे. काल लखनऊ इथं झालेल्या
शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा सहा गडी
राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनौ च्या संघानं वीस षटकांत तीन गडी बाद २२७
धावा केल्या. २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रॉयल
चॅलेंजर्स बंगळुरूने १८ षटके आणि ४ चेंडूत चार बाद २३० धावा केल्या. जितेश शर्मानं
नाबाद ८५,
मयंक अग्रवाल ४१ तर विराट कोहलीने ५४ धावा केल्या.
****
No comments:
Post a Comment