Saturday, 31 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही ते प्रकाशन करणार आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी आज राज्यशासनाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे.

****

सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणाद्वारे शासकीय तंत्रनिकेतन संस्था आयटीआयच्या अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून राज्यातील सर्व आयटीआय दत्तक देण्यात येणार आहेत. त्यासाठी औद्योगिक, सार्वजनिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. राज्यातल्या आयटीआय खासगी भागीदारीतून दत्तक देण्याच्या योजनेचा शुभारंभ काल नाशिकमध्ये करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सातपूरचे आयटीआय लघुउद्योग भारतीला दत्तक देण्यात आल्याचं कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी यावेळी जाहीर केलं. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशऩ- मित्रा धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार आहे. नाशिक इथं लोढा यांनी काल  ‘औद्योगिक बैठक घेऊन औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला.

****

राज्यभरात येत्या दोन जून ते ३१ जुलै दरम्यान स्टॉप डायरीया अभियान राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत, हे अभियान गावागावात राबवण्याचे निर्देश दिले. या अभियानामध्ये गाव आणि शहरी अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळेतल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचं सर्वेक्षण करुन, अतिसारग्रस्त बालकांना ओआरएस आणि औषधी देण्यात येणार आहे.

****

धुळे जिल्ह्यातल्या आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीनं नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत ९० उमेदवारांची एक कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या ‘शिवांजली सोल्युशन’ या कार्यालयाच्या संचालिका कविता प्रशांत भदाणे आणि अलीबाग इथले वैभव विजय पोळ या संशयितांविरुद्ध काल फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

****

पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार यांसारख्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सजग राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केलं आहे. जिल्हा हिवताप कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. 

****

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा -जालना- पूर्णा साप्ताहिक विशेष रेल्वे चालवण्याचं नियोजन केलं आहे. ही रेल्वे पूर्णतः अनारक्षित असेल. परवा एक जूनपासून दर रविवारी ही गाडी पूर्णेहून संध्याकाळी पाच वाजता सुटेल आणि रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी जालन्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पाच जूनपासून दर गुरुवारी सकाळी नऊ वाजता जालन्याहून सुटेल आणि दुपारी साडे बारा वाजता पुर्णा इथं पोहोचेल.

****

क्रिकेट - आईपीएल स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स संघानं गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सला २२८ धावांचं आव्हान दिलं, प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सचा संघ सहा गडी गमावत २०८ धावाच करु शकला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सनं क्वालीफायर -२ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे; तर गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

****

 

गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला. मे महिन्यात अशा स्वरूपाचा पाऊस यापूर्वी झालेला नाही. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल. त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल, असं कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटलं आहे. कोकणातील शेतकऱ्यांना आता भात रोपे टाकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. अतिवृष्टी झालेल्या मराठवाडा, विदर्भ  आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचा सल्ला आवटे यांनी दिला आहे.

****

दरम्यान, गेल्या चोवीस तासात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. आज दिवसभरातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

 

No comments: