Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 May 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर
आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते करकत इथं ४८ हजार ५२० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं
भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान थोड्याच वेळात रोहतास इथल्या विक्रमगंजमध्ये
जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान दुपारनंतर उत्तर प्रदेश दौऱ्यासाठी रवाना
होणार आहेत.
****
खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील
सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ काल कोलंबियाची
राजधानी बोगोटा इथं पोहोचलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला
पाकिस्तानातील लष्करी आणि पोलीस अधिकारी उपस्थित असल्याचं थरुर यांनी कोलंबियाच्या
निदर्शनास आणून दिलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं दक्षिण
आफ्रिकेचा दौरा पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेनं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला असल्याचं सुप्रिया
सुळे यांनी जोहान्सबर्गमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं. द्रमुक खासदार कनिमोझी यांच्या
नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ लाटवियातील रीगा इथं दाखल झालं. हे शिष्टमंडळ रिगा
इथं संसद सदस्य आणि संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षांसोबत बैठकीत सहभागी
होणार आहे. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळानं काल जकार्ता इथं इंडोनेशियातील
विविध क्षेत्रातील विचारवंतांशी संवाद साधला.
****
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान
आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध भारतानं केलेल्या प्रभावी कारवाईत नारी
शक्तीनं महत्त्वाची भूमिका बजावली, असं प्रतिपादन संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल गोव्यात आयएनएसव्ही तारिणीच्या स्वागतर सोहळ्यात बोलत होते. सशस्त्र दलात महिलांचा सहभाग वाढल्यापासून महिलांनी
प्रत्येक भूमिकेत अनन्यसाधारण कामगिरी
करत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.
****
ऑपरेशन शिल्ड अंतर्गत पंजाबमध्ये
उद्या मॉक ड्रील आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांना हल्ल्यापासून बचाव करण्यासाठीचं
मार्गदर्शन यातून केलं जाणार आहे.
****
प्रसार भारती - प्रसारण आणि प्रसारासाठी
सामायिक ऑडिओ - व्हिज्युअल, पीबी शब्दने यूट्यूबर्स, पॉडकास्टर्स आणि व्हिडिओ संपादकांना
नि:शुल्क सेवा देण्याच्या उद्देशानं नोंदणी करण्यास आमंत्रित केलं आहे. पीबी शब्द, कॉपीराईट मुक्त, प्रामाणिक आणि वापरासाठी सुरक्षित
असं व्यासपीठ आहे. देशभरातले वृत्त विषयक पोर्टल शब्दच्या माध्यमातून दूरदर्शन आणि
आकाशवाणीच्या विश्वासार्ह स्त्रोतांपर्यंत पोहोचू शकतात.
****
गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात
एक लाख ६४ हजार ८७५ कोटी इतकी विक्रमी परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली. ही गुंतवणूक देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या
४० टक्के इतकी आहे. त्याआधीच्या आर्थिक
वर्षाच्या तुलनेत ही गुंतवणूक ३२ टक्के अधिक आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या
तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी इतकी परकीय गुंतवणूक आली. राज्याची ही घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी, जनतेचं अभिनंदन केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
शेतकऱ्यांना खरीप पिकांची लागवड करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रक्रिया तसंच कीड
आणि रोग नियंत्रण जनावरांची घ्यावयाची काळजी याबाबत कृषी हवामान केंद्राचे संचालक सचिन
सूर्यवंशी यांच्यासह कृषी शास्त्रज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामपंचायत
कार्यालयावंर वीज विरोध यंत्रणा लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी
यंत्रणेला दिल्या आहेत. वीज पडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता, त्यावर नियंत्रणांच्या अनुषंगानं
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत एलिमेनिटर
सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. काल झालेल्या
पहिल्या क्वालीफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं पंजाब किंग्सचा पराभव करत अंतिम
फेरी गाठली. तीन जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत
पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज
उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला. पुढच्या फेरीत
सात्विक - चिराग जोडीचा सामना मलेशियाच्या जोडीसोबत होणार आहे.
****
हवामान
पुढचे दोन आठवडे राज्यात कोकण वगळता
इतर भागात पाऊस कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment