Thursday, 29 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

सिक्कीम राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेचं अभिनंदन केले. खराब हवामानमुळं पंतप्रधानांनी सिक्कीम दौरा रद्द करुन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सिक्कीमच्या नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं. सिक्कीमला आपण प्रत्यक्षात लवकरच भेट देणार असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यात अंशतः बदल करण्यात आला आहे. ते आता त्यांच्या नियोजित वेळेच्या एक तास आधी पटणा इथं पोहोचतील. आज दुपारी ४.३० वाजता पटनाच्या लोकनायक जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते बिहटा येथील नवीन विमानतळाची पायाभरणी करतील. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी पाटण्यात तीन किलोमीटरचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.

****

देशभरात आजपासून विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या अभियानाच्या माध्यमातून ९० गावांमध्ये कृषी तंत्रज्ञान, खरीप पीक, कृषी औजार तसंच नवनवीन विकसीत कृषी संशोधन, प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घेण्याचं आावाहन कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी केलं आहे.

****

खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पनामा दौऱ्यावर आहे. पहलगाम हल्ला हा बहरणाऱ्या काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी भारतीय दुतावासात आयोजित कार्यक्रमात सांगितलं. शिष्टमंडळानं पनामाचे राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची भेट घेतली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं दक्षिण आफ्रिकेच्या मंत्र्यांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. दक्षिण आफ्रिकेनं भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं त्या म्हणाल्या. खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सौदी अरबच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळनं कांगोहून आता सिएरा लिओन इथं पोहचलं आहे.

****

मुख्यमंत्र्यांनी काल आगामी आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मानाच्या पालखीमधल्या वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातीलअसंही त्यांनी सांगितलं. सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालयं आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

****

नवी मुंबईत आज ४ रूग्णांना कोरोना ची लागण झाली असून एकूण १९ कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या वतीनं कोविडबाबत आवश्यक दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, सर्दी, खोकला, फ्ल्यू सदृश्य लक्षणं आढळल्यास वैद्यकिय सल्ला घ्यावा आणि आपल्या नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असं आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचं वितरण परवा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. एमजीएम परिसरातल्या रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या या सोहळ्यात, राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या सोळा यशस्वी युवांचा सन्मान करण्यात येणार आहे.

****

गोंदिया जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत सुरक्षा रथाचं लोकार्पण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज करण्यात आलं. हा सुरक्षा रथ संपूर्ण जिल्ह्यात फिरणार असून गावागावांमध्ये जाऊन वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या क्वालीफायर सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. तर, एलिमेनिटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान उद्या खेळवण्यात येणार आहे. तीन जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना आहे.

****

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा अमेरिकी जोडीदार रॉबर्ट गॅलवे यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला. तर, रोहन बोपन्ना आणि एडम पावलासेक जोडीनं अमेरिकेच्या रॉबर्ट कॅश आणि ट्रेसी यांना पराभूत करत दुसरी फेरी गाठली.

****

पुढील दोन दिवस मराठवाड्यात वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments: