Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 May
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
केवळ अर्थव्यवस्थेसाठी
नव्हे, तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं - पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम
·
पुण्यातल्या एनडीएच्या
दीक्षांत समारंभात १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड
·
रेल्वे विभागाकडून
उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर
·
विकसित कृषी संकल्प
अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकर्यांना मार्गदर्शन
आणि
·
आशियाई ॲथलेटिक्स
चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडुंची काल तीन सुवर्ण पदकांची कमाई
****
केवळ अर्थव्यवस्थेसाठी नव्हे, तर देशाच्या
स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं आहे, असं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात कानपूर इथं जाहिर सभेला ते
काल संबोधित करत होते. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत तीन नियम पाळणार असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
बाईट
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही, या
माध्यमातून संपूर्ण जगाने,
आपल्या देशातल्या महिलांचा राग आणि वेदना पाहिल्या, या
कारवाईत भारताने स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि मेक इन इंडियाची शक्ती जगासमोर
प्रदर्शित केली,
असं पंतप्रधान म्हणाले.
यावेळी ४७ हजार ५७३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या १५
मेगा विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. त्यांनी
चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यान कानपूर मेट्रोच्या नवीन कॉरिडॉरला हिरवा झेंडा
दाखवला.
तत्पूर्वी बिहारमधल्या काराकट इथंही ४८ हजार ५०० कोटी
रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी
पंतप्रधानांच्या हस्ते झाली.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज साजरी होत
आहे. हे वर्ष अहिल्यादेवी यांचं त्रिशताब्दी वर्ष असल्यानं, विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या
अहिल्यादेवींच्या जन्मगावी आज राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी
जयंतीवर्षानिमित्त पुण्यात आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री
फडणवीस यांनी,
अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या तत्त्वानुसार
शासन चालवणार असल्याचं सांगितलं. महिलांच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी राज्य
सरकारने अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली असून, त्या महिलांच्या
सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती
भवनात आयोजित एका समारंभात १५ परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल
पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल
हा पुरस्कार दिला जातो. जळगावच्या सुजाता बागुल यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी
दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
****
पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीए चा १४८ वा
दीक्षांत समारंभ काल उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिवशी पहिल्यांदाच १७ महिला
कॅडेट्सनी तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला. या
संचलनात सहभागी झाल्यानंतर महिला छात्रांनी पुशअप्स मारून आपल्या यशाचा जल्लोष
केला. २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महिलांना एनडीएमध्ये प्रवेश
देण्यात आला होता,
त्याची ही पहिली फलश्रुती आहे. या कार्यक्रमाला मिझोरामचे
राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग, दक्षिण मुख्यालयाचे
प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एनडीएचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गुरुचरण सिंग
आदी मान्यवर उपस्थित होते.
****
कृषी विभागाचे सर्व निर्णय शेतकऱ्यांना मदत करणारे आणि
हिताचे ठरावे,
यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सुचना ऐकून त्यास शासन प्राधान्य
देत असल्याचं,
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर इथं काल कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रगतीशील आणि प्रयोगशील
शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध
योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या गटामार्फत
मांडलेल्या सुचना ऐकून कोकाटे यांनी त्याची नोंद घेतली.
****
रेल्वे विभागाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर
धाराशिव रेल्वे स्थानक असं केलं आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्वीच्या उस्मानाबादचं
नाव बदलून धाराशिव केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे नामांतर केलं आहे.
स्थानकाचं नवीन नाव आणि कोडला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोशिएशनकडून मान्यता
देण्यात आली आहे. पूर्वी उस्मानाबाद नाव असलेल्या या स्टेशनचा कोड यू एम डी असा
होता, तो बदलून आता धाराशिव या नवीन नावाच्या स्टेशनचा कोड, डी
आर एस व्ही असा झाला आहे. सर्व रेल्वे नोंदी, निवेदन आदी या नवीन नावाने
होतील. हा बदल करण्यासाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम ही आरक्षण प्रणाली, आज
रात्री पावणे बारा ते दीड वाजेपर्यंत तात्पुरती बंद करण्यात येणार असून, यात्रेकरू
आणि जनतेने याची नोंद घ्यावी असं मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव इथं विकसित
कृषी संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल राज्याचे कृषी विभागाचे प्रधान
सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेच्या चित्ररथाला
यावेळी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.
यावेळी कृषी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी नवीन विकसित
झालेल्या बियाणांच्या वाणाची, तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची
माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकरी यादव देशमुख यांनी, या
कार्यक्रमात माती परिक्षणाबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं.
बाईट
- शेतकरी यादव देशमुख
****
ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ बीड शहरात काल रिपब्लिकन पक्ष
आठवले गटाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून
काढण्यात आलेल्या या भारत झिंदाबाद तिरंगा रॅलीत हजारो रिपाइं कार्यकर्ते सहभागी
झाले होते. राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.
****
आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी
काल तीन सुवर्ण पदकांची कमाई केली.
पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत गुलवीरने, महिलांच्या
उंच उडीत पूजाने,
तर महिलांच्या हेप्टाथलॉनमध्ये नंदिनी अगासराने सुवर्ण पदक
जिंकलं. पारुल चौधरीने महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकलं.
या स्पर्धेत भारत सध्या आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन
कांस्यपदकासह एकूण १८ पदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी
अधिकाऱ्यांनी केवळ नियमित कामकाजापुरतं मर्यादित न राहता सकारात्मक दृष्टिकोनातून
नवकल्पना मांडाव्यात,
असे निर्देश मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूरचे आमदार
राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी
त्यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. या बैठकीस
जिल्ह्यातल्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. याअंतर्गत
तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीनं आज शहरात बाईक रॅली
काढण्यात येत आहे.
लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल तंबाखूच्या
दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली.
****
गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या
पावसामुळे लघु,
मध्यम आणि लहान प्रकल्पातला पाणीसाठा वाढत आहे. बीड शहरालगत
असलेलं बिंदुसरा धरण पूर्ण भरलं आहे. धरणाच्या मध्य चादरीवरून पाणी वाहण्याची
शक्यता लक्षात घेता बिंदुसरा नदीलगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment