Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 18 July 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जूलै २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता
तंत्रज्ञान संस्था - आयआयसीटी आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - एन एफ डी सी च्या
संयुक्त कॅम्पसचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव
आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या संस्थेत १७ अभ्यासक्रमांचा
समावेश असून, गेमिंग,
अॅनिमेशन, पोस्ट-प्रॉडक्शन, कॉमिक्स अशा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. आयआयसीटीने
इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून, अभ्यासक्रमांची
देवाणघेवाणही होणार आहे.
मुंबईत सुरु झालेलं IICT हे केंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचा सर्जनशील भारताचा संकल्प साकारतंय, असं मत माहिती आणि प्रसारण
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केलं. या संस्थेत उद्योगाशी थेट संबंधित
१७ अभ्यासक्रम शिकवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी
वैष्णव
आयआयसीटी ही संस्था मुंबईत उभी राहणं
हे सर्जनशील अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या भारताच्या वाटचालीतलं मोठं पाऊल, असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
येत्या दोन वर्षात ही संस्था नावारुपाला येईल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
यावेळी "गुलशन महल" मध्ये
भारत पॅव्हेलियन या विशेष दालनाचंही उद्घाटन करण्यात आलं. हे दालन म्हणजे भारताच्या
कथा सांगण्याच्या परंपरेचा उज्ज्वल प्रवास जागतिक स्तरावर उलगडणारा एक अनोखा अनुभव
आहे. भारत पॅव्हेलियन; म्हणजे,
देशाला जागतिक स्तरावर एक सर्जनशील महासत्ता बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं
महत्त्वाचं पाऊल आहे. तसंच वेव्ह्ज् या जागतिक मनोरंजन परिषदेच्या निष्कर्षांचा अहवालही
यावेळी सादर करण्यात आला.
****
बोगस बियाणे विक्री करणाऱ्याविरोधात
कठोर कायदा आणून तो राज्यात लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं कृषीमंत्री
माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत सांगितलं. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी
याबाबत प्रश्न विचारला होता. बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात होणाऱ्या किरकोळ कारवाईमुळे
हे प्रकार सातत्याने होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
**
सफाई कामाकरता रोबोटिक मशीन खरेदी
करण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देईल त्यामुळे येणाऱ्या काळात हाताने मैला वाहून
नेण्याचा प्रकार पूर्णपणे बंद होईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं.
सफाई कामगाराचा काम करताना मृत्यू
झाला तर त्याच्या कुटुंबाला तीस लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर वीस लाख रूपये
आणि अपंगत्व आल्यावर दहा लाख रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं सामाजिक न्याय
मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. रोबोटिक मशीन खरेदी करण्यासाठी शंभर कोटी रुपये
निधी उपलब्ध केला आहे. मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचे निर्देश महानगरपालिका,
नगरपालिकांना दिले असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
**
गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून
मान्यता दिली जाईल, अशी
घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज विधानसभेत केली. आपल्या रीतीरिवाजाचं
जतन व्हावं यासाठी या उत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता दिली जात असल्याचं त्यांनी
सांगितलं. यानिमित्त राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर विविध सांस्कृतिक कार्यक्रम,
व्याख्यानमाला, स्पर्धा, ड्रोन शो आयोजित केले जातील, उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धा
तालुकास्तरावर आयोजित केल्या जातील, गणेशोत्सवानिमित्त टपाल तिकीट
आणि नाणे काढले जातील, तसंच उत्सवासाठी भरीव निधीची तरतूद केली
जाईल, असं शेलार यांनी सांगितलं.
**
राज्यातल्या दहीहंडी खेळातल्या दीड
लाख गोविंदांचा विमा उतरवला जाईल, अशी घोषणा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली.
अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
**
विधीमंडळ सभागृहातल्या सदस्यांनी
सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल असं वक्तव्य माध्यमांसमोर करू नये, अशी ताकीद, विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. प्रत्येक सदस्य हा आपापल्या मतदारसंघातल्या लाखो
लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यामुळे केवळ सभागृहच नाही तर
जनतेची प्रतिष्ठा राखणं सदस्याचं कर्तव्य आहे, असं अध्यक्ष म्हणाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी काल अध्यक्ष आणि सत्ताधारी बाकांकडे पाहून
अपमानास्पद हातवारे केले, तसंच
शब्द वापरले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री शंभुराज देसाई आणि
दादा भुसे यांनी केली.
दरम्यान, विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज
समारोप होणार आहे.
****
No comments:
Post a Comment