Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2019
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v लोकसभा
निवडणुकीचा चौथ्या टप्प्यातला प्रचार शिगेला; प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांच्या सभांना जोर
v पराभवाचा अंदाज येताच, विरोधी पक्ष
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आक्षेप
घेतात- भाजप नेते प्रकाश जावडेकर
v औरंगाबाद जिल्ह्यातल्या मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणीसह अनिष्ट प्रथांविरोधात कारवाई
करण्याचे न्यायालयाचे निर्देश
आणि
v चीनमधल्या
आशियाई बॅडमिंटन क्रिडा स्पर्धेत भारताच्या
पी.व्ही सिंधू आणि सायना नेहवालसह सात खेळाडूंचा उपउपांत्य फेरीत प्रवेश
****
लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यातलं मतदान पूर्ण
झालं असून, येत्या सोमवारी २९ तारखेला चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. राज्यात
चौथ्या टप्प्यात मुंबईतल्या सर्व मतदार
संघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ
आणि शिरुर या १७ मतदार
संघात, मतदान होणार आहे. प्रचाराला काही दिवस शिल्लक असल्यानं, प्रमुख राजकीय पक्षांचे
नेते, आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, घेत आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची
काल नाशिक जिल्ह्यात निफाड इथं, महाआघाडीचे
उमेदवार समीर भुजबळ यांच्या
प्रचारासाठी सभा झाली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या सभेच्या
पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत इथली बाजार समिती बंद ठेवण्यात आली, त्यामुळे दोन हजार
ट्रक कांद्याचं नुकसान झालं, ते कोण भरून देणार असा प्रश्न पवार यांनी या सभेत उपस्थित केला. बाजार समित्यांमधली दलाली नष्ट करण्याच्या मोदी यांच्या विधानामुळे दलाल, भाजपच्या विरोधात
गेल्याचा दावाही पवार यांनी यावेळी केला.
गिरणारे इथंही पवार यांनी भुजबळ यांच्या
प्रचासासाठी सभा घेतली. पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकण्याची भाषा
करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वयानं लहान आहेत, त्यातच ते अपघाताने मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांनी
जपून टीका करावी असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला.
****
शिर्डी लोकसभा मतदार संघातल्या भाजपा-सेना महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपच्या
नेत्या पंकजा मुंडे यांची नेवासा इथं सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्याचा
विरोधकांचा डाव हाणून पाडण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
कोपरगाव इथं कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या
उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. यावेळी पवार
यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
****
नाशिक इथं काल शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांची शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. सैनिकांच्या शौर्याचे
राजकारण आम्ही करणार नाही, मात्र विरोधकांनी किमान सैनिकांच्या शौर्याविषयी शंका घेऊ
नये, त्यांचे निती धैर्य खचवणे सोडून द्यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
नंदुरबार मतदार संघात, प्रचाराच्या
रणधुमाळींनी रंगत वाढली आहे. भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सभा घेतल्या असून, वंचित बहुजन
आघाडीच्या उमेदवारांसाठी विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी देखील सभा घेतली. आज कॉग्रेस
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शिरपूर, अक्कलकुवा आणि साक्री अशा तीन तालुक्यात
महाआघाडीच्या उमेदवारांसाठी सभा होणार असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पालघर मतदार संघातल्या नालासोपारा इथं काल भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भाजप शिवसेना महायुतीचे
उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा घेतली. शिवसेनेचे नेते
एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
विरोधी पक्षांना आपल्या पराभवाचा अंदाज येताच, ते
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आक्षेप घेतात, असं भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल राजस्थानमध्ये जयपूर इथं, वार्ताहरांशी बोलत
होते. काँग्रेस महाआघाडीनं काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, ईव्हीएमद्वारे मतदानावर
पुन्हा एकदा शंका उपस्थित केली, त्या पार्श्वभूमीवर जावडेकर बोलत होते. राजस्थान, मध्यप्रदेश
आणि छत्तीसगड विधानसभेसाठी गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुका काँग्रेसनं जिंकल्या,
तसंच केरळ, तेलंगणा, तमिळनाडू
आणि पश्चिम बंगालमध्ये इतर पक्षांनी सरकारं स्थापन केली, त्यावेळी ईव्हीएम बाबत या
पक्षांची तक्रार नव्हती, असं जावडेकर यांनी नमूद केलं.
****
भोपाळ लोकसभा मतदार संघातल्या भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह
ठाकूर यांना निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी याचिका, राष्ट्रीय
तपास संस्थेच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फेटाळून लावली. २००८ मध्ये मालेगाव इथं
झालेल्या बाँबस्फोटात मरण पावलेल्या व्यक्तीच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती.
प्रज्ञासिंह यांना या न्यायालयानं जामिन मंजूर केलेला नसल्यामुळे या याचिकेवर निर्णय
देता येणार नाही, असं या न्यायालयानं म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांची काळजी केवळ काँग्रेस पक्षच घेऊ शकतो,
असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या कानपूर इथं एका प्रचार
सभेत ते काल बोलत होते. आपल्या जाहीरनाम्यातल्या घोषणांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, यांनी काल फतेहपूर इथे सभा घेऊन, मतदारांशी संवाद
साधला.
****
भाजपचे वायव्य दिल्लीचे नाराज खासदार उदीत राज यांनी
काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उदीत राज यांना भाजपनं पुन्हा लोकसभेची उमेदवारी
नाकारल्यानं, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली, आणि त्यानंतर
काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजपनं या मतदार संघातून पंजाबी सुफी गायक हंस राज हंस
यांना उमेदवारी दिली आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यामधल्या शेंद्रा मांगीरबाबा
यात्रेतल्या गळ टोचणीसह अनिष्ट प्रथांविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन आणि काळी जादू कायद्यानुसार
कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या
प्रथांविरोधात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेच्या सुनावणी दरम्यान
न्यायालयानं हे निर्देश दिले. या यात्रेत कोणी गळ टोचून घेतले तर त्याकडे दुर्लक्ष
केले असं गृहीत धरून देवस्थानचे विश्वस्त आणि पोलिस प्रशासनाला सहआरोपी घोषित करण्यात
येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांनी सहा आठवड्यात
शपथ पत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्य
पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या
आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या
महाराष्ट्र दिनाला या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या पदकांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम शहरात तीव्र पाणीटंचाई
भासत असून नागरिकांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालमला टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्यावतीनं करण्यात आली आहे. येत्या दहा दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास
आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर
यांनी दिला आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात, दोन मुलांचा
विहिरीत बुडून मृत्यू झाला. कुऱ्हाडी इथं काल दुपारी ही दुर्घटना घडली. करण निकाळजे
आणि पवन आढे अशी या दोघांची नावं असून, दहा वर्ष वयाची ही मुलं, पोहता येत नसतानाही,
विहिरीत उतरली, त्यामुळे दोघंही पाण्यात बुडाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परळी इथल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात २७ वर्षापूर्वी
झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी या औष्णिक विद्युत केंद्रातले उपमुख्य अभियंता नितीन गगे
यांना महाराष्ट्र वीजनिर्मिती कंपनीच्या संचालकांनी निलंबित केलं आहे. या विद्युत केंद्रात
असतांना जुन्या लेथ यंत्राच्या दुरूस्तीची निविदा काढून गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही
कारवाई करण्यात आली आहे. गगे यांच्यासह आणखी एका अधिकाऱ्याला या प्रकरणी निलंबित करण्यात
आलं आहे.
****
चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन
क्रिडा स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधू आणि
सायना नेहवाल सह सात खेळाडूंनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र किंदाबी श्रीकांतचं
आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं.
दरम्यान, बँकॉक इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियोद्धा
स्पर्धेत तेरा भारतीय खेळाडू आज उपांत्य फेरीचा
सामना खेळतील.
भारताची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिनं चीनमध्ये
सुरू असलेल्या कुनपिग खुल्या टेनिस अजिंक्यपद
स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू सामंता स्टोसूर हिचा पराभव करत स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
भारताच्य नेमबाज मनू भाकर आणि हिना सिद्धू बिजिंग
इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. दहा मीटर एअर पिस्टल
प्रकारातल्या अंतिम फेरीत या दोघींनाही स्थान मिळवता आलं नाही.
****
राज्यात सध्या उष्णतेचा कडाका असून सर्वाधिक तापमान
काल अकोला जिल्ह्यात ४५ पूर्णाक एक अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलं. मराठवाड्यातही सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा चढलेला असून औरंगाबाद इथं काल ४१ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
करण्यात आली.
****
हिंगोली इथल्या राज्य कलाध्यापक संघाच्या वतीने आयोजित
कला कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेत
सहभागी विद्यार्थी आणि कलाशिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा इथं आदिवासी वसतिगृहात
झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणाबाबत असंवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल आमदार विजय वडेट्टीवार,
बाळू धानोरकर, आणि सुभाष धोटे यांना राज्य महिला आयोगानं काल नोटीस बजावली. येत्या ३० तारखेला आयोगाच्या कार्यालयात
उपस्थित राहून खुलासा करावा असं या नोटीसीत म्हटल आहे.
*****
***
No comments:
Post a Comment