Thursday, 20 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.08.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 August 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट ब आणि गट क वर्गातल्या अतांत्रिक पदाच्या नोकर भरतीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याकरता राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

·      ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात वाढ, १० टक्के साखर उतारा आल्यास दोन हजार ८५० रुपये प्रतिटन भाव.

·      राज्यात आजपासून आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्यास परवानगी.

·      अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत तपास करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.

·      राज्यात १३ हजार १६५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ३४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

आणि

·      मराठवाड्यात काल २९ जणांचा मृत्यू, तर नव्या एक हजार १६९ बाधित रुग्णांची नोंद.

****

केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क वर्गातल्या अतांत्रिक पदाच्या नोकर भरतीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याकरता राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या संस्थेसाठी सरकारनं एक हजार ५१७ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि बँकींग कर्मचारी निवड संस्था - आयबीपीएस या संस्थांमधील भरतीसाठी ही चाळणी परीक्षा असणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया अधिक सुलभ होईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार कोणत्याही एका भरती यंत्रणेकडे किंवा एकाच वेळी विविध यंत्रणांकडे उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी अर्ज करु शकतील. परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असणार आहे. वर्षातून दोनवेळा ही परीक्षा घेतली जाईल, पदवी, बारावी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा वेगवेगळ्या पातळ्यांसाठी असलेली ही परीक्षा १२ भारतीय भाषांमध्ये घेतली जाईल. कमाल वयोमर्यादेच्या अटीपर्यंत उमेदवारांना त्याच्या इच्छेनुसार कितीही वेळा ही परीक्षा देता येईल. अनुसूचित जाती/जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्या असलेल्या वयोमर्यादेबाबतची शिथिलता या परीक्षेलाही लागू राहील. या परीक्षेत उमेदवारांना मिळालेले गुण हे तीन वर्षापर्यंत ग्राह्य धरले जातील.

****

ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या अर्थविषयक  व्यवहार समिती घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिल्लीत समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. २०२० - २१ या आगामी हंगामात १० टक्के साखर उतारा देणाऱ्या ऊसाला दोन हजार ८५० रुपये प्रतिटन दर मिळेल. उतारा एक टक्का जास्त आल्यास, दरात २८५ रुपयांनी वाढ होईल, तर साडे नऊ ते दहा टक्के  दरम्यान उतारा राहिल्यास भावात प्रतिटन २८५ रुपयांची कपात केली जाईल. साडे नऊ टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा आल्यास शेतकऱ्यांना दोन हजार ७०७ रुपये ५० पैसे प्रतिटन दर मिळेल. कृषी मूल्य आणि दर आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

****

राज्यात आजपासून आंतरजिल्हा बस सेवा सुरू होत आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी काल या परवानगीचे आदेश जारी केले. आजपासून बससेवा सुरू करण्याचा राज्य परीवहन महामंडळाचा प्रयत्न असल्याचं महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं. मार्च महिन्यात लागू झालेल्या टाळेबंदीपासून बससेवा बंद होती. आंतरजिल्हा प्रवासासाठी प्रवाशांना ई पासची आवश्यकता नाही, असं या आदेशात म्हटलं आहे. सध्या फक्त एसटी बसच्या माध्यमातूनच आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी असून, खासगी वाहनांना मात्र पूर्वीप्रमाणे ई-पाससह आवश्यक परवानगी घ्यावी लागणार असल्याचं, यात नमूद करण्यात आलं आहे. या प्रवासासाठी महामंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, त्यांचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

****

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षेत्राला मर्यादा असल्याचं सांगत, या प्रकरणाचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवावेत, तसंच तपास कार्यात सीबीआयला सहकार्य करावं, असे निर्देशही न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी आणखी काही गुन्हे दाखल असल्यास, त्यांचा तपासही सीबीआयकडूनच केला जाईल, असं न्यायालयानं नमूद केलं आहे. या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलीस काही गैर करत असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत नसलं, तरीही, बिहार पोलिसांना तपासात केलेल्या आडकाठीमुळे मुंबई पोलिसांच्या प्रामाणिक तपासाबाबत संशय निर्माण झाल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं.

****

पिकांच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीनं कृषी संजीवनी प्रकल्पातून मार्गदर्शन करावं अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा अशा पद्धतीने पीक उत्पादनाचं नियोजन करावं, त्याचबरोबर विभागवार पिकांचं नियोजन करून, ज्या पिकांना बाजारपेठ आहे, तेच पिक घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनेंतर्गत सहभागी गावातल्या तीन हजार ८०० गावांचा पाण्याचा ताळेबंद करण्यात आला असून, पीक पद्धतीत बदलासाठी हे उपयुक्त ठरू शकतं, असं कृषी मंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले.

****

राज्यातल्या आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. संरक्षण दलातले शौर्य पदकधारक, सेवा पदकधारक यांना तसंच त्यांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे, आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातल्या सर्व आजी, माजी सैनिकांना लागू करण्यात आल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

सहकारी बँकांचं अस्तित्व आणि त्यांचं सहकारी स्वरुप जपावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. तसं पत्र पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलं असून, हे पत्रं त्यांनी ट्विटरवर प्रकाशित केलं आहे. सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं आपण स्वागत केलं, कारण मध्यम वर्गाच्या हितरक्षणाच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र सहकारी बँकांची स्थिती इतर बँकांपेक्षा वाईट आहे आणि त्यातले घोटाळे रोखण्यासाठी त्यांचं खाजगीकरण केलं पाहिजे, ही समजूत खोडून काढली पाहिजे, असं पवार म्हणाले. सहकारी बँकिंग क्षेत्रं हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्यामुळे त्यांचं अस्तित्व सहकारी बँका म्हणूनच जपलं पाहिजे, असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं, असंही पवार यांनी नमूद केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वच्छ महोत्सव २०२० या ऑनलाईन कार्यक्रमाअंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’चे पुरस्कार घोषित करणार आहेत. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याअंतर्गत पंतप्रधान पुरस्कारप्राप्त निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित होईल.

****

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं ११ ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी ग्रामीण भागातल्या उमेदवारांना सोयीचं जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलता येईल. जे उमेदवार परीक्षा केंद्र बदलणार नाहीत, त्यांना त्यांच्या पत्त्यानुसार संबंधित जिल्हा परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल. २० सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

****

राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. भोकर शहराजवळ सीताखंडी जवळ पर्यायी रस्त्यात दोन कंटेनर फसल्यामुळे नांदेड - भोकर वाहतूक ठप्प झाली होती. परभणी जिल्ह्यातल्या अनेक भागात काल संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाला.

यवतमाळ जिल्ह्यातल्या ईसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या पेनटाकळी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पैनगंगा नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

राज्यात काल १३ हजार १६५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सहा लाख २६ हजार ६४२ झाली आहे. एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. काल ३४६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २१ हजार ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नऊ हजार ११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत चार लाख ४६ हजार ८८१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

मराठवाड्यात काल २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १६९ बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २५५ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी १३१ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३० रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५७ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यातही तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ६० रुग्णांची भर पडली. उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर आणखी १३१ रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात २६९, तर हिंगोली जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.

****

मुंबईत काल आणखी एक हजार १३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४६ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल दोन हजार ७२४ नवे रुग्ण आणि ९० मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल ८६४ नवे रुग्ण आढळले, तर १५ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ९६, अहमदनगर ६५०, सातारा ३९६, सांगली ३३१, सोलापूर २८७, पालघर २७२, रत्नागिरी ३९, वाशिम ३०, धुळे १८, सिंधुदुर्ग १३, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.  

****

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचा पार्थिव देह काल सकाळी मुंबईत आणून, सायंकाळी वर्सोवा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. मेवाती घराण्याचे गायक पंडित जसराज यांचं सोमवारी अमेरिकेत निधन झालं, ते ९० वर्षांचे होते.

****

औरंगाबाद इथं महाज्योती संघर्ष कृती समितीनं विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केलं. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग समाजाचे प्रतिनिधी पारंपरिक वेशभूषेत या आंदोलनात सहभागी झाले होते. महाज्योती संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात यावा तसंच बार्टी - सारथी यासारख्या संस्थेच्या धर्तीवर तिची स्थापना करण्यात यावी, संस्थेसाठी लोकसंख्येनुसार त्वरीत ५०० कोटी रूपयांची तरतूद करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होतं.

****

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ च्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात ३१ ऑगस्ट पर्यंत गाव पातळीवर महिला आणि किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छता, सॅनेटरी पॅड गावागावात उपलब्ध करून देणे, यासह महिलांच्या आरोग्य आणि रोजगार विषयक विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातल्या सर्व ग्राम पंचायतींना १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून किशोरवयीन मुलींना ५ रूपयांमधे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिलं जात असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे यांनी सांगितलं.

“गावातल्या स्वयं सहाय्यता गटाकडून पॅड विकत घेऊन वितरीत करायचे आहेत. ज्यांच्याकडे ‘अस्मिता योजने’चे कार्ड आहेत या सर्व मुलींसाठी आपण मोफत पॅड उपलब्ध करून देणार आहोत. स्वयं सहाय्यता गटांच्या साठी रोजगाराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुध्दा अशा एखाद्या कारखान्याची उभारणी करण्यासाठीही प्रयत्नशील आहोत.”

आगामी काळात जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात हे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणं आणि त्याचा गावागावतल्या महिलांना वापर करण्यासह मासिक पाळी व्यवस्थापन महिलांसाठी रोजगार निर्मिती यावर उस्मानाबाद जिल्हा परिषद भर देणार आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

****

परभणी जिल्ह्यातल्या सर्व खाजगी रूग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत घेण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसंच खाजगी कोविड रुग्णालयांना तत्काळ दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याबाबत आदेश काढावेत अशी मागणीही पक्षानं दिलेल्या निवेदनात केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेली १४ दिवसांची टाळेबंदी काल संपली. या काळात नागरीकांनी योग्य सहकार्य केलं असून, कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही, असं सांगून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांचे आभार मानले.

****

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल सर्व शेतमालाचे व्यवहार सुरु झाले. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर वाहनचालक आणि शेतकऱ्यांची तापमानाची तपासणी करुनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाल्यानं शेतकरी, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

****

लातूर रेल्वे स्थानकाला आयएसओ मानांकन मिळालं आहे. सोलापूर विभागात आठ रेल्वे स्थानकांना हे मानांकन जाहीर झालं आहे, राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सोलापूर विभागात आतापर्यंत एकूण नऊ रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात गणेशोत्सव आणि गौरी सणानिमित्त सर्व नागरिकांनी कोविड-१९च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. सर्व गणेश मंडळांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव गणेशाची प्रतिष्ठापना करून साजरा करू नये, तर सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असं त्या म्हणाल्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...