Monday, 26 July 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ जुलै २०२१ सकाळी ११.०० वाजता

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आज कारगिल विजय दिवस. १९९९ साली आजच्या दिवशी भारताच्या सशस्त्र दलांनी ऑपरेशन विजय अंतर्गत कारगिल क्षेत्र पाकिस्तानी घुसखोरांकडून ताब्यात घेतलं होतं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण केली आहे. कारगिल भागातल्या द्रास इथं असलेल्या हुतात्मा स्मारकास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, लडाखचे राज्यपाल आर के माथूर आणि लडाखचे खासदार जामयांग शेरींग नामग्याल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. 

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसंच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार आहेत.

दरम्यान, मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे दोन लाख ३० हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं आहे.

****

टोकियो इथं सुरू असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत आज भारताचा पुरुषांचा तिरंदाजी संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. प्रवीण जाधव, अतनु दास, आणि तरुणदीप राय यांच्या संघानं कझाकस्तानच्या संघाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या अचंता शरथ कमलनं तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

तलवारबाजीमध्ये पहिल्यांदाच भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीचा दुसर्या फेरीत फ्रान्सच्या खेळाडूकडून पराभव झाला.

****

इंफाळपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बिष्णुपुर परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या प्रतिहल्ल्यात गोळी लागल्यानं जखमी झालेले धुळे जिल्ह्यातले २१ वर्षीय जवान निलेश महाजन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुळे तालुक्यातल्या सोनगीर इथं त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत

****

जालना जिल्ह्यातल्या फुल उत्पादक शेतकऱ्यांना कोविड निर्बंधाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात जालना आणि भोकरदन तालुक्यातले काही शेतकरी बाजारपेठ जवळ असल्यानं फुलशेतीला प्राधान्य देतात. मात्र, कोविड संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षीही सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यावर निर्बंध आल्याने फुलांची बाजारातील मागणी घटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: