Saturday, 31 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

देशांतर्गत सुरक्षा राखण्यासाठी विकास आणि कल्याणकारी उपक्रम महत्वाची भुमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी इथं भारतीय पोलिस सेवेतल्या प्रशिक्षणार्थींसोबत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक पोलिसांपुढे मोठं आव्हान असून, तरुण पोलिस अधिकाऱ्यांनी ही फसवणूक रोखण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधावे, असं पंतप्रधान म्हणाले. तरुण आयपीएस अधिकाऱ्यांनी पोलिस दलातील सुधारणा आणि उत्तम आरोग्य राखण्यावर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. गेल्या ७५ वर्षात भारतानं उत्तम पोलिस सेवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पोलिस प्रशिक्षणाशी संबंधित पायाभूत सुविधांमध्ये गेल्या काही वाढ झाली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.   

****

देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या ४६ कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ४४ लाख ३८ हजारांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली.

****

कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या महिनाभरात देशातल्या दोन लाख २७ हजारांहून अधिक गर्भवतींना, लसीची पहिली मात्रा देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, गर्भवतींचं नियमितपणे समुपदेशन करत त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगितल्यानं हे यश मिळाल्याचं, मंत्रालयानं म्हटलं आहे. गर्भवतींच्या लसीकरणात तमिळनाडू आघाडीवर असून तीथे ७८ हजार ८३८ जणींना लस देण्यात आली आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशात ३४ हजार, तर ओडिशामध्ये २९ हजार ८२१ गर्भवतींना लस मिळाली आहे.  

****

लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी भारतीय उद्योग परिषद - सी आय आयनं सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया या कंपनीबरोबर करार केला आहे. यानुसार आता देशातल्या छोट्या गावांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये, लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी, विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. रुग्णालये आणि उद्योगजगत यांच्यातला दुवा बनत ‘सीआयआय’ आणि सीरम या संस्था लसीकरण मोहिमेला वेग आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेमुळे दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत कमी कालावधीत पोहोचता येईल, असं सीरम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

****

देशात काल नव्या ४१ हजार ६४९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५९३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या तीन कोटी १६ लाख १३ हजार ९९३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २३ हजार ८१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३७ हजार २९१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी सात लाख ८१ हजार २६३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख आठ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात ५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी संस्थांना, सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. सहकार विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ५० पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी, ऑनलाईन पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किसनराव किनवटकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. किनवटकर हे बळीराम पाटील महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी युवक काँग्रेसच्या विविध समित्यांवर जबाबदारी सांभाळली आहे. ते नांदेड जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष होते.

****

सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त दिला जाणारा, यंदाचा जीवनगौरव पुरस्कार, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाला आहे. एक्कावन्न हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

नांदेडहून हिमाचल प्रदेशातल्या अम्ब अन्दौरा इथं जाणारी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी, मंगळवार तीन ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. कोविड-19 विषाणू संसर्गामुळे ही विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस तात्पुरती रद्द करण्यात आली होती.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारतीय महिला हॉकी संघानं दक्षिण आफ्रिकेचा चार - तीन असा पराभव केला.

थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर थाळीफेक करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. थाळीफेक मध्येच सीमा पुनिया तिच्या गटात सहाव्या क्रमांकावर राहीली. या गटात कोणत्याही स्पर्धकाला पात्रतेसाठी आवश्यक असलेला ६४ मीटरचा टप्पा ओलांडता न आल्यानं अंतिम १२ मध्ये स्थान मिळवण्याच्या सीमाच्या आशा कायम आहेत.

मुष्टीयुद्ध प्रकारात पुरुषांच्या ४८ ते ५२ किलो वजनी गटात अमित पंघालचा कोलंबियाच्या युबेरजन मार्टीनेज कडून चार - एक असा पराभव झाला. तीरंदाजीत अतनु दासचा पराभव झाला.

****

No comments: