Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२१ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या
पावसाळी अधिवेशनात पेगॅसस, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या
गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं.
लोकसभेत
कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, अकाली दल यासह
इतर विरोधी पक्ष सदस्यांनी, विविध मुद्यांवरुन अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन
घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळातच
प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी गदारोळ न करता
महत्वाच्या मुद्यांवर काम होऊ द्यावं, अशी विनंती अध्यक्षांनी केली, मात्र तरीही
गोंधळ सुरुच राहील्यानं, लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात
आलं.
राज्यसभेत
कामकाज सुरु होताच पेगॅसस, कृषी कायदे या मुद्यांवर विरोधकांनी आणलेले स्थगन
प्रस्ताव, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आजही फेटाळले. त्यामुळे विरोधकांनी
सभागृहाच्या मधोमध येऊन गदारोळ करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं
कामकाजही सुरवातीला एका तासासाठी, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
पश्चिम
महाराष्ट्र आणि कोकण विभागात अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या
नागरीकांच्या वारसांना, नऊ लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सरकार योजना तयार करत
असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या
पूरग्रस्त भागाला आज भेट दिल्यानंतर, ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री मदत
निधीतून दोन लाख रुपये, तर केंद्र सरकार आणि गोपीनाथ मुंडे दुर्घटना बीमा योजनेतून
प्रत्येकी दोन लाख रुपये, मृतांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचं, पवार
यांनी सांगितलं.
****
राज्यात
सहा जिल्ह्यांमध्ये पुरामुळे शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचं सर्वाधिक नुकसान
झालं असून, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं
वाटप केलं जाणार असल्याची घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
केली. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत
होते. राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं.
त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. दौरे केल्याने यंत्रणा
त्यांच्यासाठी फिरवावी लागतं, ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन
संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहनही पवार यांनी यावेळी
केलं. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री असल्याचंही त्यांनी
नमूद केलं.
****
नांदेड
जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, सुपर स्प्रेडर
ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीची कोविड
चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम, जिल्हा प्रशासनानं हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा
आणि करावयाच्या उपाययोजनाच्या संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या
मोहिमेअंतर्गत ज्या शासकीय कार्यालयाचा आणि सेवावर्गात मोडणाऱ्या व्यावसायिकांचा,
अधिकाधिक विविध लोकांशी दररोज संपर्क येतो, अशा व्यक्तींची कोविड चाचणी
युद्धपातळीवर करण्यात येणार आहे.
****
केंद्र
सरकार आरोग्य योजनेच्या पुणे विभागाअंतर्गत, औरंगाबादला सप्टेंबर महिन्याअखेर
पर्यंत औषधोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरु असून,
या केंद्रामुळे औरंगाबाद शहर आणि आसपास राहत असलेल्या नागरिकांना वैद्यकीय सेवा
तसंच औषधांचा पुरवठा करणं सहज शक्य होणार आहे. या योजनेच्या पुणे विभागाच्या
अतिरिक्त संचालक डॉ. अनुराधा सोंडूर यांनी ही माहिती दिली.
****
टोकियो
ऑलिम्पिक स्पर्धेत आज ६९ किलो वजनी गटात भारताची मुष्टीयोद्धा लवलिना बोरगैईनं
उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत तीने जर्मनीच्या नादिन
एपेट्ज चा पराभव केला.
बॅडमिंटनमध्ये
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं
ब्रिटनच्या जोडीचा पराभव केला.
भारताच्या
पुरुष हॉकी संघानं स्पेनचा तीन - शून्य असा सहज पराभव केला. आज सकाळी झालेल्या या
सामन्यात भारतीय संघानं प्रथमपासूनच वर्चस्व राखलं होतं.
नेमबाजीमध्ये
दहा मीटर एयर मिश्र सांघिक प्रकारात, ई वेलारेविन आणि दिव्यांश पवार, तसंच अंजुन
मुद्गिल आणि दीपक कुमार यांची जोडी, पात्रता फेरीत बाद झाली. तर दहा मीटर एयर
पिस्टल मिश्र प्रकारात मनु भाकेर आणि सौरभ चौधरीची जोडीही बाद झाली.
टेबल
टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या अचंता शरथ कमलला चीनच्या एम ए लाँग कडून पराभव
पत्करावा लागला.
****
भारत
आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज कोलंबो
इथं खेळला जाणार आहे. रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
तीन
सामन्यांच्या मालिकेत भारत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment