Wednesday, 28 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.07.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी वी सिंधूनं उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात तिने हाँगकाँगच्या नगन यी चेऊंगचा २१-नऊ, २१-१६ असा पराभव केला.

तिरंदाजीमध्ये भारताच्या तरुणदीप रायनं पुरुषांच्या वैयक्तिक प्रकारात पुढील फेरीत प्रवेश मिळवला. त्यानं युक्रेनच्या ओलेक्सीई हनबिन याचा सहा-चार असा पराभव केला.

हॅाकी मध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनकडून एक-चार असा पराभव पत्करावा लागला.

****

पहिला अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं आज पुणे इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. नाटेकर यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदं मिळवली आहेत. भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते.

****

हिपेटायटिस आणि त्यामुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगासारख्या आजारांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आज जागतिक हिपेटायटिस दिवस साजरा केला जात आहे. २०३० पर्यंत सार्वजनिक आरोग्य जोखीम म्हणून, काविळीचं निर्मूलन करण्याच्या प्रयत्नांची गरज अधोरेखित करणं, हा यावर्षीच्या हिपेटायटिस दिनाचा विषय आहे.

****

जागतिक निसर्ग संवर्धन दिन आज पाळण्यात येत आहे. पृथ्वीवरुन नष्ट होत असलेल्या वन संपदेचं जतन आणि संवर्धन करण्याची वचनबद्धता पुन्हा व्यक्त करणं हा यामागचा उद्देश आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त चित्रपट प्रभागाकडून आज याविषयीचा माहितीपट दाखवण्यात येणार.

****

अश्लील चित्रपट प्रकरणी निर्माता राज कुंद्रा याला जामीन द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.‌ याबाबत मुंबई पोलिसांनी उद्यापर्यंत आपलं उत्तर सादर करावं, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.‌ त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या लाडेवडगाव इथं शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू झाला. दहा वर्षीय हर्षद आणि सात वर्षीय माधव लाड हे दोघे जण शेततळ्यात खेळता खेळता पडले, त्यांना पोहता येत नसल्याचं त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

****

No comments: