Thursday, 29 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

पेगॅसस, कृषी कायदे यासह इतर मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामात आजही व्यत्यय आला.

लोकसभेत कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात केलेल्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पाडणं हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्ष कामकाज करण्यास तयार आहे, मात्र सरकार काही मुद्यांवर उत्तर देण्यास तयार नसल्याचं विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले. तर विरोधी पक्षनेते संसदेची प्रतिष्ठा राखत नसल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला. त्यावरुन विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज सुरवातीला दोन वेळा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

राज्यसभेतही कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी एका तासासाठी आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

****

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज पाळण्यात येतो. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वन्यजीव प्रेमींना विशेषतः जे व्याघ्र संवर्धनासाठी काम करतात, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत १८ राज्यात पसरलेल्या ५१ व्याघ्र राखीव क्षेत्रांची भूमी आहे. भारताने व्याघ्रसंवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार निश्चित करण्यात आलेलं उद्दिष्ट चार वर्ष आधीच पूर्ण केलं असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. वाघांचं संरक्षण-संवर्धन करण्यासाठी आणि व्याघ्र-स्नेही परीसंस्थेचं जतन करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

दरम्यान, पंतप्रधान आज राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करणार आहेत. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान शिक्षणतज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

****

टोकियो ऑलिम्पिक्स स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघानं अर्जेंटिनाचा तीन - एक असा पराभव केला.

बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूनं डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१ - १५, २१ - १३ असा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

तिरंदाजीत अतनु दासनं कोरियाच्या जिनह्येक ओह याचा सहा - पाच असा पराभव केला.

नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर पिस्टल पात्रता फेरीत मनु भाकेर पाचव्या स्थानावर, तर राही सरनोबत १८व्या स्थानावर राहीली. या फेरीचा दुसरा भाग उद्या होणार आहे.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुपर हेवीवेट प्रकारात भारताचा सतीश कुमारही उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आज झालेल्या सामन्यात त्याने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊन याचा चार - एक असा पराभव केला. सुपर हेवीवेट प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला सतीश कुमार हा पहिला भारतीय मुष्टीयोद्धा आहे. 

****

यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीची प्रश्नपत्रिका सर्व बोर्डातल्या विद्यार्थ्यांसाठी समान असावी यादृष्टीनं विविध क्षेत्रातल्या तज्ञांची समिती नेमण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. ही सीईटी राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. सर्व बोर्डांच्या मागणीनुसार प्रत्येकाच्या अभ्यासक्रमाचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका काढल्यास गोंधळ निर्माण होईल, असं राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आलं.

****

नवीन शहरे वसवण्याकरता राज्यांना कामगिरीवर आधारित आठ हजार कोटी रुपयांच्या आव्हान निधी देण्याची वित्त आयोगानं शिफारस केली असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यातल्या निधीसाठी आठ राज्यांना प्रत्येकी एक अशा आठ नवीन शहरांसाठी या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक प्रस्तावित नवीन शहरासाठी उपलब्ध रक्कम एक हजार कोटी रुपये आहे आणि प्रस्तावित योजनेंतर्गत राज्यात फक्त एक नवीन शहर वसवता येणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात औरंगाबाद शहराची हरितक्षेत्र विकासासाठी, तर नाशिकची, शहर सुधार आणि हरितक्षेत्र विकास स्मार्ट शहर अभियानाअंतर्गत निवड करण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर विधानसभा मतदार संघातील उदगीर आणि जळकोट तालुक्यातील विविध शासकीय इमारती बांधकामासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व शासकीय इमारतीची कामे अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या तीन लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. उडीद, कापूस, मूग, तूर, ज्वारी, सोयाबीन या पिकांसाठी, एक लाख ७६ हजार ६३४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे. त्यासाठी १५ कोटी ४५ लाखांचा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला आहे.

****

No comments: