Sunday, 25 July 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 July 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथील जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका - तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** प्रत्येक भारतीयाने ‘भारत जोडो’आंदोलनाचं नेतृत्व करावं - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून आवाहन

** राज्यातल्या पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच मदत जाहीर करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

** जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकची सुवर्णपदकाला गवसणी

आणि

** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूचा पुढच्या फेरीत प्रवेश

****

प्रत्येक भारतीयाने ‘भारत जोडो’आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या ७९ व्या भागातून जनतेशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी, देश हीच आपली कायम सर्वात मोठी आस्था आणि प्राथमिकता असेल, असा संकल्प करण्याचं आवाहन केलं. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या अनुषंगानं बोलताना, नेशन फर्स्ट-अलवेज फर्स्ट अर्थात राष्ट्र प्रथम सदैव प्रथम हा मंत्र घेऊनच पुढे वाटचाल करायची आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

येत्या १५ ऑगस्टला अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रगान डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन जास्तीत जास्त भारतीयांनी एकाचवेळी राष्ट्रगीत गाण्याच्या उपक्रमात सहभागी व्हावं, असं पंतप्रधान म्हणाले. खादी तसंच हस्तकला कारागीरांनी केलेल्या वस्तू वापरण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. आपण आपलं काम अशाप्रकारे करावं, जे विविधतेने नटलेल्या आपल्या भारताला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं त्यांनी नमूद केलं. देशातल्या विविध ठिकाणच्या युवकांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं केलेल्या उपयुक्त प्रयोगांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली.

उद्या साजरा होत असलेल्या कारगील विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर कारगील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केलं. ऑलिम्पिक स्पर्धेत गेलेल्या भारतीय संघाला सर्वांनी शुभेच्छा देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. जलसंधारण, पर्यावरण, निसर्ग संवर्धन या विषयांवरही पंतप्रधानांनी संवाद साधला. आगामी सण उत्सवांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

राज्यातल्या पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पूरग्रस्त चिपळूण शहराला मुख्यमंत्र्यांनी आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, व्यापारी तसंच नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, फक्त सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, असं नमूद केलं. प्रश्न फक्त आर्थिक मदत पुरवणं, एवढाच नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करणं याला प्राथमिकता असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या मदत कार्याबाबत माहिती जाणून घेतली. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसंच औषधं, कपडे आणि इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच केंद्राकडे मागणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातल्या दरडग्रस्त तळई गावाला आज भेट दिली. इथल्या लोकांचं पूर्णपणे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पक्की घरं बांधून देण्यात येतील, असं आश्वासन राणे यांनी दिलं. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यावेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व्यवस्थित काम करत असल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे.

****

हंगेरीत सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकनं सुवर्णपदक पटकावलं आहे. प्रियानं ७५ किलो वजनी गटात बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत केलं.  

 

टोकियो ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा दारूण पराभव केला, आता बुधवारी सिंधूचा सामना हाँगकाँगच्या चेऊंग शी होणार आहे.

 

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीत मनू भाकर आणि यशस्विनी देसवाल या दोघींचंही आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तुल नेमबाजीत सहभागी होणार आहे. येत्या २९ जुलैला ही स्पर्धा होणार आहे. या व्यतिरिक्त मनु भाकर सौरभ चौधरीसोबत १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीच्या मिश्र संघ सामन्यातही खेळणार आहे.

नेमबाज अंगद वीरसिंग बाजवा आणि मेराज अहमद खान यांनी स्कीट नेमबाजी स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरवात होत आहे. कोलंबो इथं आज संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होणार आहे.

****

राज्यातील मागासवर्गीय उद्योजकांचे अनेकवर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न महाविकास आघाडी सरकार लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली आहे. ते आज मुंबई इथं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय औद्योगिक संस्था महासंघाच्या बैठकीत बोलत होते. मागासवर्गीय उद्योजकांना वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ व्हावा आणि त्यांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी एक कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.

****

राज्य सरकारने इतर मागासवर्गीयांचा इम्पिरीकल डाटा येत्या डिसेंबरपर्यंत संकलित करून न्यायालयाला दिला नाही, तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना संधी द्यायची नाही, असंच राज्य सरकारने ठरवलं असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ३९१ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या सात रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १५६रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज एका बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १ हजार १७८ झाली आहे.

****

भविष्य सांगायच्या बहाण्याने घरात प्रवेश करून लुटणाऱ्या दोन भामट्यांना औरंगाबाद शहर पोलिस दलाने अटक केली आहे. शहरात अशा प्रकारचे घडलेले गुन्हे उघडकीस आणून चोरी गेलेला मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. अशा भोंदू बाबांना, किंवा अनोळखी लोकांना घरात प्रवेश देणं टाळावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात संपूर्ण वर्षभर कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा संकल्प प्रहार जनशक्ती पक्षानं केला आहे. राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या वाढदिवसानिमित्त आज परभणी तालुक्यातील बाजार पिंगळी गावामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे बांधकाम मजूर, घरगुती कामगार आणि आस्थापनांवर काम करणाऱ्या कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली.

****

दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष सन्मानपत्र देऊन गौरवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी केलेल्या विविध कार्याची दखल घेत, आठवले यांचा गौरव करण्यात आला आहे.

//********//

 

 

No comments: