Tuesday, 27 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.07.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 July 2021

Time 7.10AM to 7.20AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      पूरग्रस्त भागात वीज आणि पाणी पुरवठा तातडीनं सुरु करण्याचा तसंच रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश.

·      पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या कायम स्वरूपी नियुक्त करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

·      पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत; तळई गावातील शोध मोहीम थांबवली- बेपत्ता ३१ व्यक्ती मृत घोषित.

·      राज्यातल्या पहिल्या मेडिकॅब रुग्णालयाचं जालन्यात लोकार्पण.

·      राज्यात चार हजार ८७७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात नऊ जणांचा मृत्यू तर ३२२ बाधित.

आणि

·      टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल तिसऱ्या फेरीत.

****

पूरग्रस्त भागात वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्याचे तसंच रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नुकसानाचा मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी, युद्धपातळीवर कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली. नुकसानाबाबतची आकडेवारी आणि करावयाच्या मदतीबाबत तपशीलवार वस्तूनिष्ठ अहवाल तयार करावा, जेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचवता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पुराचा फटका बसलेले सर्वच व्यापारी, व्यावसायिकांची माहिती एकत्र करावी, त्यांना राज्य तसंच केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, तसंच मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा काल सातारा जिल्हा दौरा खराब हवामानामुळे रद्द करावा लागला. सातारा जिल्ह्यात कोयनानगर इथं मुख्यमंत्री पाहणी करणार होते, मात्र, त्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर मुसळधार पावसामुळे कोयनानगर इथं उतरू शकलं नाही.

****

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफच्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कायम स्वरूपी ठेवल्या जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. काल सांगली इथं पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सतत येणारा पूर आणि भूस्खलन यासारख्या घटना लक्षात घेऊन, हा निर्णय घेतला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचं एक केंद्र कराड इथं तर दुसरं रायगड किंवा रत्नागिरी इथं सुरू केलं जाईल, असं पवार यांनी सांगितलं.

पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन या कामावर देखरेख करण्यासाठी नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात नेमले जातील, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही, असं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले –

आम्ही नोडल ऑफिसर नेमतोय प्रत्येक जिल्ह्यामधे. बाकीचे आमचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या ठिकाणी बसून काम करतील. आढावा घेतील. तीच गोष्ट सीओ करतील, एसपी करतील. तीच गोष्ट तिथले महानगर पालिकेचे आयुक्त करतील. या पद्धतीनं केलं तरच ते काम व्यवस्थितपणे होणार.

****

दरम्यान, सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानापोटी विशेष बाब म्हणून, १०० कोटी रुपये देण्याची घोषणा, उपमुख्यमंत्र्यांनी केली. सातारा इथं झालेल्या नुकसान आढावा बैठकीत त्यांनी, पंचनामे आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मृतांच्या वारसांना सात लाख रुपये मदतही त्यांनी जाहीर केली.

****

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पूर बाधित कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल सांगली इथं ही घोषणा केली. सांगली शहर आणि परिसराच्या पूरग्रस्त आढावा बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले –

ज्या कुटुंबाच्या घरात पाणी गेलेलं आहे, त्यांचं संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं आहे, कोणाचं शॉप पाण्याखाली गेलेलं असेल, ही प्राथमिक स्वरूपाची मदत आहे. ज्याला आपण तातडीची मदत म्हणतो, ती मदत ही दहा हजार रुपयांची असणार आहे.

 

कृष्णा नदी काठावर राहणाऱ्या लोकांच्या अडचणी समजावून घेतल्यानंतर या शहराची पुनर्बांधणी करावी लागेल हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे, असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

****

रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त तळई इथली शोध मोहीम काल थांबवण्यात आली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या तसंच बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी केलेल्या विनंती वरुन शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला असून, शोध पथकांना घटनास्थळावरून परत बोलावण्यात आल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तळई इथल्या ३१ व्यक्ती अद्यापही बेपत्ता असून, त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे तळई इथल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ८४ झाली आहे.

****

सातारा जिल्ह्यातही विविध ठिकाणचं मदत आणि शोध कार्य आपत्ती प्रतिसाद दलानं थांबवलं आहे. काल शोध कार्यादरम्यान, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. आंबेघर इथलं नऊ महिने वयाचं एक बालक अजूनही बेपत्ता आहे, या बालकाचा शोध थांबवून मदत कार्य बंद करण्यात आलं. जिल्ह्यात या अतिवृष्टीने दगावलेल्यांची संख्या ४२ झाली आहे.

****

जालना जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ३० हजार चौरस फुटात उभारण्यात आलेल्या, राज्यातल्या पहिल्या मेडिकॅब रुग्णालयाचं, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकापर्ण झालं. मास्टरकार्ड कंपनी आणि अमेरिका इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्यानं अवघ्या एका महिन्यात, शंभर खाटांच्या या सुसज्ज रुग्णालयाची उभारणी करण्यात आल्याचं, टोपे यांनी सांगितलं. मास्टरकार्ड कंपनी देशात अशा प्रकारच्या रुग्णालयांमधून दोन हजार खाटांची उभारणी करणार असून, राज्यात जालन्यासह बारामती आणि अमरावती इथं, शंभर खाटांचं रुग्णालय उभारण्यात येत आहे. या रुग्णालयाचे आयुष्यमान साधारणत: २५ वर्षे असल्यानं कोविड संसर्ग पूर्णत: आटोक्यात आल्यानंतरही, या रुग्णालयाचं विलगीकरण कक्ष, कर्करोग किंवा भविष्यात शासनाच्या इतर आरोग्य सेवांकरता उपयोग करण्याचं नियोजन असल्याचं, टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात काल चार हजार ८७७ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ६९ हजार ७९९ झाली आहे. काल ५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार ६०५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ७७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ४६ हजार १०६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३३ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ८८ हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३२२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या पाच, तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १७० रुग्ण आढळले. उस्मानाबाद ८३, औरंगाबाद २८, लातूर २३, जालना नऊ, नांदेड सात, तर परभणी जिल्ह्यात दोन नवे रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल एकही बाधित रुग्ण आढळला नाही.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीच्या, चार लाख ४४ हजार ६६९ मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन लाख ४२ हजार ६९० लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या एक लाख एक हजार ९७९ झाली आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या एका कोविड लसीकरण केंद्रावर शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये काल झटापट झाली. या प्रकरणी भाजपचे ओबीसी मोर्चाचे शहरजिल्हा अध्यक्ष गोविंद केंद्रे यांना, शिवसेनेचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रे यांच्या विरोधातही लसींच्या कुपनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

****

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज अंगारकी चतुर्थीला जालना जिल्ह्यातलं राजूर इथलं गणपती मंदीर बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक व्यापाऱ्यांनीही एक दिवस जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शनासाठी येणं टाळावं, असं आवाहन भोकरदनचे तहसीलदार संतोष गोरड यांनी केलं आहे.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताच्या अचंता शरथ कमलनं पोर्तुगालच्या खेळाडूचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढच्या फेरीचा सामना चीनच्या मा लाँग याच्याशी होणार आहे.

मात्र टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. मनिका बत्रा आणि सुतीर्था मुखर्जी यांचा काल पहिल्या फेरीतच पराभव झाला.  

तलवारबाजीमध्ये पहिल्यांदाच भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीचा दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या खेळाडूकडून पराभव झाला.

तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधव, अतनु दास आणि तरुणदीप राय यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाकडून पराभव झाला.

टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या सुमित नागलचा रशियाच्या खेळाडूकडून पराभव झाला.

मुष्टीयुद्ध स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात भारताच्या आशिश चौधरीला चीनच्या खेळाडूकडून शून्य - पाच असा पराभव पत्करावा लागला.

हॉकी मध्ये भारतीय महिला संघाचा जर्मनीकडून पराभव झाला.

जलतरणामध्ये भारताचा पहिला जलतरणपटू साजन प्रकाश २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात पात्र होऊ शकला नाही.

बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा ग्रूप ए मध्ये पराभव झाला. 

नेमबाजीत स्कीट स्पर्धेत अंगद वीर सिंह बाजवा अठराव्या, तर मेराज खान २५व्या स्थानावर राहील्यानं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळालेली भारोत्तोलक मीराबाई चानू काल भारतात दाखल झाली असून, तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

****

विद्यार्थ्यांनी शंका न बाळगता भारतीय सेनेत दाखल व्हावं, असं आवाहन कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी केलं आहे. कारगील विजय दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं कारगील स्मृतिवनात, हुतात्म्यांना अभिवादन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार अतुल सावे, स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यावेळी उपस्थित होते. युद्ध अथवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. आपण स्वतः दहा वर्षे भारतीय सेनेत सेवा दिली असून, १९७१ च्या युद्धात सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम केलं. सीमेवर राहून देशसेवा करण्यासारखं समाधान नसल्याचं कॅप्टन सुर्वे यांनी नमूद केलं.

****

कारगिल विजय दिनाच्या निमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या शिराढोण इथं, शिराढोण पोलीस ठाण्याच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी परिसरातील जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं. आमदार कैलास पाटील यांनीही रक्तदान करत कारगील हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातून सैन्यदलात सेवा देत असलेल्या सैनिकांचा काल कारगिल विजय दिनी कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, कारगील युध्दात हुतात्मा झालेल्या वीरांना कंधार इथं एका विशेष कार्यक्रमात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

****

पदोन्नती मधील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचं आरक्षण कायम करण्यात यावं, या मागणीसाठी, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं, आक्रोश आंदोलन करण्यात आलं. गत ७ मे रोजी शासनाने निर्णय जाहीर करून मागासवर्गीयांचं पदोन्नती मधील आरक्षण रद्द केल्यामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय झाला असून, आरक्षण कायम करण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएससी चा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. आतापर्यंत या दोन शाळांमध्ये प्रत्येकी २४ तसंच २५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. शाळांमध्ये प्रवेशाचा ओघ सुरू असल्याची माहिती उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील कालगाव इथंला तलाठी आनंदा नारायण गायकवाड याने शेतीचा फेर नोंद घेण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली. पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

****

No comments: