Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2021
Time 7.10AM to 7.20AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५
जुलै
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
कोकणातील धोकादायक वस्त्यांचं
सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचं
आणि पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांची घोषणा
**
पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत
राज्यातील सात जिल्ह्यात ११२ लोकांचं निधन, सहा जिल्ह्यातील ९९ जण अद्याप बेपत्ता
**
राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करण्याचं मराठा
आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आवाहन
**
राज्यात सहा
हजार २६९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू तर ३२२ बाधित
**
दोन कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सेलूच्या पोलिस उपअधिक्षकाला एका पोलीस कर्मचाऱ्यासह अटक
आणि
**
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य
पदक
****
कोकणातील धोकादायक वस्त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल आणि
पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी
केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रायगड जिल्ह्यातल्या दरडग्रस्त तळीये गावाला
भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसंच नागरिकांशी संवाद साधला. कोकणात सातत्यानं
येणाऱ्या नैसर्गिक संकटाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख करून, दुर्घटना घडूच नयेत, घडल्या तर त्यात जीवितहानी होऊ
नये यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील असं सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन
पथकास घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला या आरोपाचं त्यांनी खंडन केलं. आपत्तीच
एवढी मोठी होती, की पथकाला त्याठिकाणी पोहचताना अडचणी आल्या.
राज्य शासन आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी तयार होतं. केंद्राने देखील सहाय्य केलं,
लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक -एनडीआरएफ
या सर्वांनीच मदत केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवते, यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल, असं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्य सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार रत्नागिरी,
सातारा, ठाणे, कोल्हापूर, सांगली, पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग या आठ जिल्ह्यात पुरात अडकलेल्या एक लाख ३ हजार ३१३ लोकांना सुरक्षित स्थळी
हलवण्यात आलं आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत या सात जिल्ह्यात ११२ लोकांचं
निधन झालं आहे तर तर तीन हजार २२१ पाळीव प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. सहा जिल्ह्यातील
९९ जण अद्याप बेपत्ता आहेत.
****
रायगड जिल्ह्यात महाड आणि पोलादपूर तालुक्यात दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले
एकूण ५७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये १० वर्षा खालील ७ बालकांचा
समावेश आहे. तळीये मधून एकूण ४६ मृतदेह मिळाले असून पोलादपूर तालुक्यात ११ मृतदेह
बाहेर काढले आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप इंगोले
यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या
हिरकणी वाडी परिसरात काल सकाळी दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी,
हिरकणी वाडीतील घरांना चिरा पडणे, तडे जाणे
अशा घटना घडल्या आहेत. मोठ मोठे दगड रायगड किल्ल्यावरून खाली येत असल्यामुळे
प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी, ग्रामस्थांनी
केली आहे. इथली काही कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत.
****
सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर इथं मदत आणि शोधकार्यासाठी
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दाखल झालं असून मातीखाली गाडले गेलेले ११
मृतदेह काल बाहेर काढण्यात आले. दरड कोसळल्याने तसेच पुरात वाहून गेल्याने
दगावलेल्यांची संख्या आता १३ झाली आहे.
****
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आपत्तीग्रस्तांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लीटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. अन्न
आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं बोलत
होते. या भागांमध्ये दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचं वितरण केलं जाणार असल्याचं ते
म्हणाले. ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेलं
आहे किंवा पाण्यात आहे तिथं इतर ठिकाणांवरून शिवभोजनाची पाकिटं वितरीत करण्याची
परवानगी देण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरातला महापूर आता ओसरला असून मदत कार्याला वेग आला आहे. चिपळूण पालिकेचे कर्मचारी
ठिकठिकाणी स्वच्छता करत आहेत. आपद्ग्रस्तांना ठिकठिकाणाहून मदतीचा मोठा ओघ सुरू
झाला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक सर्व वस्तूंचा समावेश आहे. खेड तालुक्यातल्या
पोसरे इथं घरांवर कोसळलेली दरड दूर करण्याचं काम सुरू झालं असून दरडीखालून तिघांचे
मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
****
अभियांत्रिकी शाखेसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मुख्य तिसऱ्या टप्प्याची परीक्षा आज होत आहे.
राज्यातल्या पूरग्रस्त सात जिल्ह्यातल्या उमेदवारांना आज तसंच परवा होत असलेल्या
परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचणं कठीण असल्यानं, या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची दुसरी संधी दिली जाणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल ट्वीटरवरून ही माहिती दिली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
आणि पालघर या जिल्ह्यातल्या संबंधित विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची
५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करावी आणि मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावं, असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ
उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांनी काल या आशयाचं पत्र
राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना पाठवलं. सर्वोच्च
न्यायालयाने गेल्या ५ मे रोजी दिलेला निकाल आणि त्याअनुषंगाने निर्माण झालेली
कायदेशीर परिस्थिती त्यांनी या पत्रात नमूद केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या 'मन
की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रमाचा हा ७९ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात काल सहा हजार २६९ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ५८ हजार ७९
झाली आहे. काल २२४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१
हजार ४२९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के
झाला आहे. काल सात हजार ३३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६०
लाख २९ हजार ८१७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३५ शतांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात ९३ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२२ कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातले तीन, औरंगाबाद दोन तर उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली
जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा
समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १७६ रुग्ण आढळले.
उस्मानाबाद ६९, औरंगाबाद ३६, लातूर
१५, जालना ११, हिंगोली सात, नांदेड
सहा, तर परभणी जिल्ह्यात दोन तर नवे
रुग्ण आढळले.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचं दिसत असल्यानं, सोमवारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठांमध्ये व्यवहार सुरू
ठेवण्यास परवानगी देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा
करून यासंदर्भात निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री
म्हणाले. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना काही
सवलती देण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी
चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं पवार म्हणाले.
****
भारतीय माध्यमिक शैक्षणिक प्रमाणपत्र आयसीएसईच्या दहावी आणि बारावी वर्गाचे
निकाल काल जाहीर झाले. दहावीचा निकाल ९९ पूर्णांक ९८ शतांश टक्के इतका लागला तर
बारावीचा निकाल ९९ पूर्णांक ९४ शतांश टक्के लागला. कोरोना विषाणू संसर्गामुळे
परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. दहावीचा निकाल नववीचे गुण आणि दहावीच्या
अंतर्गत गुणांच्या मुल्यांकनावर तर बारावीचा निकाल अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत
परीक्षेतील गुणांवर आधारित आहे.
****
दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण-पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज
भरण्यास ३० जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. ही मुदत २३ जुलैला संपणार होती.
७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं तंत्रशिक्षण
संचालनालयातर्फे परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक इथलं नियोजीत चौऱ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तूर्तास
स्थगित होण्याचे संकेत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा नाशिकचे पालकमंत्री छगन
भुजबळ यांनी दिले आहेत. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी, संमेलनाच्या नाशिक इथल्या निमंत्रकाना पत्र पाठवून संमेलन कधी घेणार,
याबाबत ३१ जुलै पर्यंत खुलासा करावा असं सांगितलं होतं. त्या
अनुषंगानं, भुजबळ यांनी काल पत्रकारांशी बोलताना, हे संमेलन भरवणं, तूर्तास तरी अशक्यच असल्याचं
सांगितलं.
****
दोन कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात, परभणी जिल्ह्याच्या सेलू विभागाचा पोलिस उपअधिक्षक
राजेंद्र पाल आणि मानवतच्या पोलिस ठाण्यातील कर्मचारी गणेश चव्हाण या दोघांना,
काल अटक करण्यात आली. सेलूच्या पोलिस ठाण्यात
मे महिन्यात एका तरुणाच्या अपघाती मृत्युबाबत गुन्हा नोंदवण्यात आला. या मयताच्या
पत्नीसोबत मयताच्या मित्राचं झालेलं संभाषण पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाल यानं
मिळवलं. याआधारे मयताच्या मित्राला संबंधित गुन्ह्यात न
अडकवण्यासाठी प्रथम दोन कोटी रुपयांची आणि
तडजोडीनंतर दीड कोटींच्या लाचेची, पाल यानं मागणी केली. यातील
पहिला हप्ता, दहा लाख रुपये रक्कम संबंधित तक्रारदाराकडून स्वीकारतांना गणेश चव्हाण याला काल
रंगेहाथ पकडण्यात आलं. मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही
कारवाई केली.
****
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो
वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक
स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक आहे. भारोत्तोलन प्रकारात तब्बल २१ वर्षांनंतर
भारतानं पदकाची कमाई केली, यापूर्वी २००० साली सिडनी ऑलिम्पिक
स्पर्धेत कर्नम मल्लेश्वरीनं कांस्य पदक पटकावलं होतं. काल मीराबाईनं क्लीन अँड
जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलून विक्रम केला, मात्र चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात ११६ किलो वजन उचलून पहिला
क्रमांक पटकावला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मीराबाई
चानू हिचं
अभिनंदन केलं आहे.
पुरुष हॉकीत भारतानं न्यूझीलँडचा तीन दोन अशा फरकानं पराभव केला, तर महिला हॉकीत नेदरलँडने भारतीय संघाचा पाच एकने पराभव केला. तीरंदाज
दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांचा दक्षिण कोरियाच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत
पराभव केला. मुष्टीयुद्धात विकासकृष्ण यादवचा जपानच्या खेळाडूनं पराभव केला. नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एयर रायफल स्पर्धेत भारताच्या
अपूर्वा चंदेला तसंच एलावेलिन वेलारिवन पात्रता फेरीतच बाद झाल्या. तर सौरभ चौधरी
१० मीटर एयर पिस्टल प्रकारात सातव्या स्थानावर राहिला. टेनिसमध्ये पुरुष एकेरीत
सुमीत नागलने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये महिला
एकेरीत मनिका बत्राने इंग्लंडच्या टिन टिनला हरवत, दुसऱ्या
फेरीत प्रवेश केला, मिश्र दुहेरीत मात्र मनिका आणि शरद कमल
जोडीचा चिनी तैपे जोडीनं पराभव केला. बॅटमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साईप्रणीतला
पराभवाचा सामना करावा लागला, मात्र दुहेरीत, चिराग शेट्टी आणि रंकीरेड्डी जोडीनं चीनी तैपेच्या ली यांग आणि वांग ची
लिनचा पराभव केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब शहरासाठी ५६ कोटी रुपये खर्च करुन कायम स्वरुपी
पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. कळंब नगर परिषदेच्या
बहुउद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन आणि अन्य विविध विकास कामांचा शुभारंभ बनसोडे
यांच्या हस्ते काल करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, बनसोडे यांनी उस्मानाबाद तालुक्यात कसबे
तडवळे इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन
केलं. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या
जागेतच बाबासाहेबांचं स्मारक उभारण्यात येईल, असं बनसोडे
यांनी सांगितलं. या शाळेत सध्या पाचशेच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
त्यांच्या शिक्षणातही खंड पडू नये यासाठी शाळेकरता जागा बघितल्या आहेत, त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला असल्याचं, बनसोडे यांनी सांगितलं.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघातल्या हिंगोली, नांदेड आणि
यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात अतिवृष्टीने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे
करण्याचे निर्देश खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. गेल्या
चार दिवसांपासून
हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं नुकसान
झालं आहे.
//******************//
No comments:
Post a Comment