Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जुलै २०२१ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं
आवाहन पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या
आकाशवाणीवरील कार्यक्रमातून पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद
साधला, त्यावेळी ते बोलत होते. वैविध्यपूर्ण भारताचं अखंडत्व
अबाधित ठेवणं हे आपलं दायित्व असल्याचं ते म्हणाले. यावर्षी, येत्या १५ ऑगस्टला देश आपल्या स्वातंत्र्याच्या
७५व्या वर्षात प्रवेश करत असून जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, देशानं कित्येक शतकं वाट पहिली, त्याच्या स्वातंत्र्याला
७५ वर्षे पूर्ण होत असतांनाच्या क्षणांचे आपण साक्षीदार बनणार असल्याचं भाग्य आपणा
सर्वांना मिळणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. यंदाच्या १५ ऑगस्टला जास्तीत जास्त
भारतीयांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गायचं असून यासाठी राष्ट्रगान डॉट इन या संकेतस्थळावर
राष्ट्रगीत गाऊन ते ध्वनिमुद्रित करावं या अभियानात सहभागी व्हावं असं
पंतप्रधान म्हणाले. देशाचा “अमृत महोत्सव’
हा कुठल्या सरकारचा कार्यक्रम नाही, तर हा कोट्यवधी
भारतवासियांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना
केलेले हे वंदन आहे असं पंतप्रधान म्हणाले.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना पाहून
संपूर्ण देश रोमांचित झाला, त्याक्षणी,
संपूर्ण देशानं जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना ‘विजयी भव’ असा आशिर्वाद दिला, अशा शब्दात पंतप्रधान मोदी
यांनी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं.
सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता #HumaraVictoryPunch कॅम्पेन सुरु झाले आहे, असंही मोदी
यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, २६ जुलै रोजी,
‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय
सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने
पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला
जाणार आहे, असं ते म्हणाले.
आपल्या दैनंदिन कामातून राष्ट्र निर्मितीचं काम
होऊ शकतं, यासाठी त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ चा दाखला देत
आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणं, हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनलं पाहिजे असं नमूद केलं. येत्या सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’
आपल्यासाठी अशी एक संधी आहे, असंही ते म्हणाले
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी चिपळूणला
भेट देणार आहेत. याठिकाणी सुरु असलेल्या मदत
आणि बचाव कार्याची ते पाहणी करणार आहेत.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी
काल दूरध्वनीद्वारे संवाद साधत, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या
जीवित आणि वित्त हानीबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यपालांनी यावेळी त्यांना राज्यात
सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याचीही माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या जवळपास ३० गावांना
आज पुन्हा एकदा भूगर्भातून गुढ आवाजासह कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. सकाळी ८ वाजून २२ मिनिटांनी पांगरा शिंदे, नांदापूर, सोडेगाव, हरवाडी, दांडेगाव आदी परिसरात भूकंपाचा धक्का
जाणवला. जिल्ह्यातील औंढा, कळमनुरी, वसमत
या तालुक्यांच्या काही भागात हे धक्के जाणवले. गेल्या १५ दिवसांपूर्वी रविवार या भागात
भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता.
****
हंगेरीत
सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकनं ७५ किलो वजनी गटात बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं
आहे.
****
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुनं महिला एकेरीचा आज
झालेला पहिला फेरीचा सामना जिंकत पुढील फेरी गाठली आहे. सिंधुनं सरळ सेटमध्ये इस्त्राईलच्या
क्सेनिया पोलिकार्पोव्हावर मात केली.
अरविंद सिंग आणि अर्जुन लाल जाट यांनी
नौकाविहार-स्कल्स , लाईट वेट
पुरुष दुहेरी प्रकारात आज उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांच्या लेजर रेडीयल प्रकरात
नेथ्रा कुमानन हिनं पुढची फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये आज महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि अंकिता रैना जोडीचा
पहिल्या फेरीच्या सामन्यात पराभव झाला तर टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताचा साथियान ज्ञानशेखरन पराभूत झाला. भारताची एकमेव जिमनॅस्टीकपटू
महिलांच्या आर्टीस्टीक जिमनॅस्टीक क्रिडा प्रकाराच्या पात्रता फेरीत बाद झाली.
पुरुषांच्या दहा मिटर एअर रायफल शुटींग क्रिडा प्रकारात दिव्यांश सिंग पनवार आणि
दिपक कुमार पात्रता फेरीत अपयशी ठरले आहेत. आज सकाळी ही स्पर्धा घेण्यात आली. महिलांच्या
दहा मिटर एअर पिस्टल प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात मनु भाकर आणि यशस्वीनी देसवाल अपयशी ठरल्या.
****
कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांवर पोहोचली असून सांगली शहराभोवती पाण्याचा वेढा
पडला आहे. सध्या ६० टक्के शहर जलमय झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मिरज-कागवड राज्यमार्गावर
पाणी आल्यानं आज सकाळपासून कर्नाटककडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. आज सकाळी वारणा
धरणातून नदी पात्रात होणारा विसर्ग कमी करण्यात
आला आहे. शहराची पाणी पातळी येत्या काही तासात कमी होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री
जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पूरस्थितीमुळे २२ हजार कुटुंबातील एक लाख
लोक स्थलांतरित झाले आहेत, तर २४ हजारांहून अधिक जनावरं अन्य ठिकाणी हलवण्यात आली आहेत. पूरस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील ९४ गावं बाधित
आहेत.
//***************//
No comments:
Post a Comment