Friday, 30 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं. राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत, तर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. 

राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शुन्य प्रहर सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरण आणि कृषी कायद्याचा मुद्दा उपस्थित करत फलक झळकावले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभापतींनी कामकाज सुरवातीला एका तासासाठी आणि नंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित केलं.

लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी, सरकार महत्वाच्या मुद्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. सरकारने त्यांचा मुद्दा बाजुला ठेऊन विरोधकांच्या मागण्या पूर्ण कराव्या, असं ते म्हणाले. इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गदारोळ वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाजही सुरवातीला एका तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

****

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. हिंदू ग्रूपचे संचालक एन राम आणि आशिया नेटचे संस्थापक शशी कुमार यांनी ही याचिका दाखल करत, पेगॅसस प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांकडून आपले विचार आणि मतं मागवली आहेत. नागरिकांनी माय जीओव्ही पोर्टलवर आपले विचार पाठवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कोल्हापूर शहरातही मुख्यमंत्री पाहणी करणार असून, जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा इयत्ता बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या सी बी एस ई रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.

****

कर्नाटक मधल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवणार असल्याचं कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे. कन्नड जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. कर्नाटकात अलमट्टी धरण झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पूरस्थितीला तोंड द्यावं लागत आहे.

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ४५ कोटी ६० लाख ३३ हजार ७५४ मात्रा वितरीत करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ४४ हजार २३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ४२ हजार ३६० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी सात लाख ४३ हजार ९७२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख २३ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नवीन २९ आयुष्यमान रुग्णालयं स्थापन करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली आहे. त्यांनी काल यासंदर्भात नवी दिल्ली इथं पवार यांची भेट घेतली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्याची गैरसोय कमी करण्यासाठी अधिकचा निधी जिल्ह्यास देण्यात यावा, अशी मागणीही निंबाळकर यांनी केली आहे.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडचा एक - शून्य असा पराभव केला. पुरुष हॉकी संघाचा आज जपान विरुद्ध सामना होणार आहे. 

तिरंदाजीत दिपीका कुमारीला उपान्त्य फेरीत दक्षिण कोरियाच्या आन सान कडून शून्य - सहा असा पराभव पत्करावा लागला.

भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात तीने चीनी तैपेईच्या चेन निन चेन हिचा चार - एक असा पराभव केला.

नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकेर आणि राही सरनोबत अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाही. मनु १५व्या, तर राही ३५व्या स्थानावर राहीली.

ॲथलेटिक्स मध्ये महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतची दूती चंद सातव्या स्थानावर राहीली. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत एम पी जबीर देखील सातव्या स्थानावर राहीला. तीन हजार मीटर स्टिपलचेस मध्ये भारताच्या अविनाश साबळेनं नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सातवं स्थान मिळवलं आहे. मात्र अविनाश ला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं.

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीतला सामना जपानच्या यामागुची हिच्याशी आज दुपारी होणार आहे.

****

No comments: