Monday, 26 July 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 July 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marath

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 July 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पेगॅसस, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज सलग पाचव्या दिवशी बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, अकाली दल यासह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी विविध मुद्यांवरुन अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. मात्र गदारोळ वाढतच गेल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

राज्यसभेतही हेच चित्र पहायला मिळालं. कामकाज सुरु होताच पेगॅसस, कृषी कायदे या मुद्यांवर विरोधकांनी आणलेला स्थगन प्रस्ताव सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी सभागृहाच्या मधोमध येऊन गदारोळ करण्यास सुरुवात केली. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज होत नसून, महत्वाचे मुद्दे बाजुला राहत असल्याबद्दल सभापतींनी चिंता व्यक्त केली. तरीही गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही सुरवातीला एका तासासाठी, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, संसदेत आज दोन्ही सभागृहात कारगिल विजय दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

****

कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी आज ट्रॅक्टरवर संसदेत पोहोचले. आपण शेतकर्यांचा आवाज संसदेपर्यंत आणला असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसंच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यात भिलवडी इथं पूरग्रस्त भागाला भेट दिली. पवार यांनी अनेक शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. नुकसानीचे पंचनामे केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यात भुस्खलनाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये, तर बाधित कुटुंबीयांना दहा हजार रुपये तातडीची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी आज पाटण तालुक्यातल्या कोयानानगर इथं भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

****

टोकियो इथं सुरू असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत आज भारताचा पुरुषांचा तिरंदाजी संघ प्रवीण जाधव, अतनु दास, आणि तरुणदीप राय यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाकडून पराभव झाला.

टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत भारताचा अचंता शरथ कमलनं तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. त्याने पोर्तुगालच्या खेळाडूचा ४-२ असा पराभव केला. महिला एकेरीत मनिका बत्राचा तिसर्या फेरीतला सामना ऑस्ट्रीयाच्या खेळाडूसोबत होणार आहे.

तलवारबाजीमध्ये पहिल्यांदाच भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीचा दुसर्या फेरीत फ्रान्सच्या खेळाडूकडून पराभव झाला.

जलतरणामध्ये भारताचा पहिला जलतरणपटू साजन प्रकाश आज २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभागी होणार आहे.

नेमबाजीत स्कीट स्पर्धेत अंगद वीर सिंह बाजवा अठराव्या, तर मेराज खान २५व्या स्थानावर राहीला. 

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ४३ कोटी ५१ लाख ९६ हजार एक मात्रा वितरीत करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ३९ हजार ३६१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४१६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २० हजार ९६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३५ हजार ९६८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी पाच लाख ७९ हजार १०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख ११ हजार १८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

महिला आणि बालविकास मंत्रालयाने पीएम केअर्स योजनेअंतर्गत, पात्र असलेल्या बालकांची माहिती गोळा करण्यासाठी पी एम केअर फॉर चिल्ड्रन डॉट इन हे वेब पोर्टल सुरु केलं आहे. अनाथ मुलांची, सातत्याने सर्वतोपरी काळजी घेणं आणि संरक्षण करणं, हे या योजनेचं उद्दीष्ट आहे. या पोर्टलवर बालकांची नोंदणी आणि लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे मोड्यूल कार्यान्वित केलं आहे.

****

कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि महाड - पोलादपूरचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं मध्यरात्री मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं, ते ५४ वर्षांचे होते. जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम जगताप यांनी केलं होतं.

****

 

No comments: