Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 27 July 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सातत्याने
सुरु असलेल्या गदारोळाबद्दल उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू
यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त
** राज्यात अतिवृष्टी आणि
पुरामुळे १६ जिल्ह्यांतल्या एक हजार १२९ पाणीपुरवठा योजना बाधित
** औरंगाबाद
इथल्या घाटी रुग्णालयातला मंजूर स्वतंत्र माता आणि बालसंगोपन विभाग रद्द करण्याच्या
निर्णयावर पुनर्विचार व्हावा - आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
आणि
** भारत - श्रीलंकेदरम्यान टी ट्वेंटी
क्रिकेट मालिकेतला आजचा सामना रद्द
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात
सातत्याने सुरु असलेला गदारोळ आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या वर्तनावर उपराष्ट्रपती
आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभेत
'पेगासस हेरगिरी' विषयावरून आजही विरोधी पक्षाने घोषणाबाजी करत गदारोळ केला. अनेक वेळा
कामकाज तहकूब झाल्यावर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेतही हीच परिस्थती
राहिली. सदनाचं कामकाज दिवसभरात वारंवार तहकूब झाल्यावर, साडे चार वाजता पुन्हा सुरू
झाल्यावरही विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासभोवती येऊन फलक झळकावत घोषणाबाजी सुरू केली,
त्यामुळे तालिका अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. संसद कायदे निर्मिती
आणि जाहीर जीवनातील विषयांवर चर्चा करण्यासाठी आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी सभागृहातील
दुर्दैवी आणि क्लेशदायक वातावरणावर चिंता आणि काळजी व्यक्त केली आहे. महत्वाचे मुद्दे
सभागृहात मांडण्यापासून अनेक सदस्य वंचित आहेत. त्यामुळे आपली वागणूक आणि वर्तनावर
पुनर्विचार करा, अशी विनंती उपराष्ट्रपतींनी गदारोळ करणाऱ्या सदस्यांना केली आहे.
****
सर्व जेनरिक औषधांचा आवश्यक
औषधांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडवीय यांनी
लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग,
आदी आजारांवरच्या औषधांचा यामध्ये समावेश असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.
जैविक शेतीला प्रोत्साहन
देण्यासाठी सरकार विविध योजना लागू करत असल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
कैलास चौधरी यांनी लोकसभेत दिली. देशात सध्या ३८ लाख हेक्टर क्षेत्रावर जैविक शेती
केली जात असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवी वर्षापासून पुढच्या २५ वर्षांसाठी एक विशेष कार्य योजना आखण्याचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय गटाच्या बैठकीत
पंतप्रधानांनी हे निर्देश दिल्याचं, संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं.
स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षात अधिक उत्तम उद्दीष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांकडून
विचार मागवण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.
****
फक्त राज्य किंवा केंद्र सरकारच नव्हे, तर संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या पाठीशी
आहे, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. चिपळूण इथं पूरपरिस्थितीची
पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना
आणि व्यापाऱ्यांना मदत करणं महत्त्वाचं आहे. केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली
जाईल, असंही राज्यपालांनी यावेळी सांगितलं. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत राज्यपालांनी
प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव आणि मदत कार्याबाबतची सविस्तर माहिती घेत,
पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करण्याची सूचना
केली.
****
राज्यात अतिवृष्टी आणि
पुरामुळे १६ जिल्ह्यातल्या एक हजार १२९ पाणी पुरवठा योजना बाधित झाल्या आहेत. या सर्व
जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून युद्धपातळीवर
प्रयत्न सुरू असल्याची माहिती, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी
दिली. या सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी एकूण ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च या योजनांसाठी
लागणार आहे. तातडीची बाब म्हणून जिल्हा परिषद तसंच स्थानिक प्रशासन त्यांच्या उपलब्ध
निधीतून कामं सुरू करण्यात आली असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीनं
पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार असल्याची घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात जेव्हा
नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं
प्रसंगावधान राखलं पाहिजे. दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते ते योग्य
नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा
टाळावा, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं.
****
नियमित विद्यार्थ्यांसह
शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य कौशल्य विकास मंडळाच्या विविध ३०१ अंशकालीन
तसंच पूर्णवेळ अभ्यासक्रमांची माहिती आता नवीन संकेतस्थळावर मिळणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू
डब्ल्यू डॉट एम एस बी एस डी डॉट एज्यू डॉट इन या नव्या संकेतस्थळाचं तसंच मंडळाच्या
बोधचिन्हाचं कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण
करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत भरीव मदत करावी अशी मागणी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर
यांनी केली आहे. लोकसभेच्या प्रश्नोउत्तराच्या तासात निंबाळकर यांनी हा निधी तात्काळ
राज्य सरकारकडे वर्ग करावा अशी मागणी केली. उस्मानाबाद जिल्हयातल्या चार लाख १६ हजार
शेतकऱ्यांच्या दोन लाख ६२ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रातला पिके अतिवृष्टीमुळे बाधित
झाले आहेत.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटी इथं राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत २०० खाटांचा
स्वतंत्र माता आणि बालसंगोपन - एमसीएच विंग विभाग उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती.
मात्र शासनाने हा विभाग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा
अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी देशमुख यांची आज मुंबईत मंत्रालयात
भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं. घाटी रुग्णालयात मराठवाडा तसंच विदर्भ, खान्देशातल्या
अनेक जिल्ह्यातले गोरगरीब रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे घाटीत एमसीएच विंग झाल्यास
गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल, असं चव्हाण यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार
समितीनं शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना
तूर, सोयाबीन, उडीद, मूग, करडई, हरभरा या मालाच्या बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के रक्कम
तारणकर्ज म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असं आवाहन बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी केलं आहे.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज ६९ किलो
वजनी गटात भारताची मुष्टीयोद्धा लवलिना बोरगैईनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्यपूर्व
फेरीत तीने जर्मनीच्या नादिन एपेट्ज चा पराभव केला.
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विक
साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं ब्रिटनच्या जोडीचा पराभव केला.
भारताच्या पुरुष हॉकी संघानं स्पेनचा
तीन - शून्य असा सहज पराभव केला. आज सकाळी झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथमपासूनच
वर्चस्व राखलं होतं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन टी ट्वेंटी
सामन्यांच्या मालिकेतला आज होणारा दुसरा सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाचा
खेळाडू कृणाल पांड्या याला कोविडची लागण झाल्याचं निदर्शनास आल्यानं, खबरदारीचा उपाय
म्हणून सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या सर्वांची आर टी पी सी आर चाचणी
होणार असून, सर्वजण कोविड संसर्गापासून सुरक्षित असल्याचा अहवाल आला, तर मालिकेतले
राहिलेले दोन्ही सामने उद्या आणि परवा लागोपाठ होतील, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
- बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
//***************//
No comments:
Post a Comment