Friday, 30 July 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा नववा दिवसही बाधित

** सीबीएसई चा बारावीचा निकाल जाहीर

** पूरबाधित तसंच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांच्या पुनर्वसनावर सरकारचा भर - मुख्यमंत्री

** बीड जिल्ह्यात कोविड रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यात कडक निर्बंधांचे आदेश

आणि

** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश

****

कृषी कायद्यांना विरोध तसंच कथित पेगासस हेरगिरीसह अन्य विविध मुद्यांवरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा नववा दिवसही विशेष कामकाज न होता गोंधळाचाच ठरला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत वारंवार स्थगित झाल्यानंतर अखेर सोमवारपर्यंत तहकूब झालं.

लोकसभेत कामकाज सुरू होताच, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, दम्रुक आणि अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर अडमुठेपणाचा आरोप करत, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका केली.

राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. सभापती व्यंकय्या नायडू यांनी शून्यकाळ चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ वाढल्यानं, सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. या गदारोळातच नारळ विकास मंडळ विधेयक राज्यसभेनं चर्चेविना मंजूर केलं. अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांनी ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा विधेयक तर राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी मर्यादित जबाबदारी भागिदारी सुधारणा विधेयक सदनासमोर सादर केलं. या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं, उपसभापतींनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई चा बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. मंडळाच्या सीबीएसई रिजल्ट डॉट एनआयसी डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीबीएसई डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. यंदा कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता, वैकल्पिक मूल्यांकनाच्या आधारावा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

पूरबाधित क्षेत्र तसंच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचं पुनर्वसन करण्यावर सरकारचा भर असून, हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बोलत होते. नृसिंहवाडी इथं पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला, कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमतानं ठराव मंजूर करावा, असं त्यांनी सांगितलं. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबत उपाययोजना केल्या जातील. तसंच नदीपात्रातली अतिक्रमणं हटवण्याच्या आणि बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाची परिस्थिती आणि महापूर यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

****

गडचिरोली इथं आज दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. विनोद उर्फ मनिराम नरसू बोगा आणि कविता उर्फ सत्तो हरिसिंग कोवाची अशी या दोघांची नावं असून, त्यांच्यावर एकूण  आठ लाख रूपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

                                   ****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांकडून आपले विचार आणि मतं मागवली आहेत. नागरीकांनी माय जीओव्ही पोर्टलवर आपले विचार पाठवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावावेत असे आदेश पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या तालुक्यांचा थेट नगर जिल्ह्याशी संबंध येत असल्यामुळे, तालुक्यांच्या सीमेवरच नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करूनच प्रवेश देण्याची सूचना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आता बीड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने अँन्टीजेन टेस्ट जाणाऱ्या येणाऱ्यांची निश्चित केल्यानंतर नक्कीच संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी होईल. तिसरी लाट आलीच तर बीड जिल्हा सर्व व्यवस्थेनं सुसज्ज आहे. ओटू बेड पासून, नॉन कोविड बेड पासून, ओटू बेड, नॉन ओटू बेडपासून, व्हेंटीलेटरपासून सर्व यंत्रणा बीड जिल्ह्याच्या आज तयार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन कोविड बाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोविड संसर्गानं तीन हजार ४९१ रुग्ण दगावले आहेत.जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ३४४ झाली असून एक लाख ४३ हजार ५५० रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.

दरम्यान, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत केल्या. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बालकांसाठी ६३१ खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून यामध्ये ४५ व्हेंटीलेटरयुक्त रुग्णखाटांचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. 

****

उमेद स्वयंसहाय्यता समुहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी आर्थिक आणि बौद्धिक मदत करावी असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं. ते आज जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. स्वयंसहाय्यता समुहातील महिलांना उपजीविकेच्या वेगवेगळ्या संधी शोधुन उत्पन्नवाढीसाठी मदत करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात जपानच्या यामागुची हिला सिंधूनं २१-१३, २२-२० असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं. 

भारतीय महिला हॉकी संघानं उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडचा एक - शून्य असा पराभव केला. पुरुष हॉकी संघाचा आज जपान विरुद्ध सामना होणार आहे. 

तीरंदाजीत दीपीका कुमारीला उपान्त्य फेरीत दक्षिण कोरियाच्या आन सान कडून शून्य - सहा असा पराभव पत्करावा लागला.

भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात तीने चीनी तैपेईच्या चेन निन चेन हिचा चार - एक असा पराभव केला.

नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकेर आणि राही सरनोबत अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाही. मनु १५व्या, तर राही ३५व्या स्थानावर राहीली.

ॲथलेटिक्स मध्ये महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताची द्युती चंद सातव्या स्थानावर राहीली. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत एम पी जबीर देखील सातव्या स्थानावर राहीला. तीन हजार मिटर स्टिपलचेस मध्ये भारताच्या अविनाश साबळेनं नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सातवं स्थान मिळवलं, मात्र अविनाश ला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं.

****

जालना जिल्हा परिषद कार्यालयावर आज शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कामगारांना प्रतिमाह ११ हजार रुपये मानधन देऊन सेवत कायम करावं, सेंट्रल किचन पध्दत रद्द करावी यासह अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात पोषण आहार कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिक्षणाधिकाऱ्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून मागण्यांचं निवेदन स्वीकारलं.

****

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात देवगाव फाटा इथल्या नुकसानग्रस्त शेतकरी रमेश तांबे यांच्या शेतातील पीक नुकसानीची पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज पाहणी केली. इतर भागात झालेल्या पीक नुकसानीची त्यांनी माहिती घेतली.

//********//

 

No comments: