Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 July 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** विरोधकांच्या गदारोळामुळे
संसदेचं कामकाज आजही बाधित; दोन्ही सदनात चर्चेविना विधेयकं मंजूर
** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पी
व्ही सिंधू बॅटमिंटनच्या तर दीपिकाकुमारी तीरंदाजीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत दाखल
** हिंगोली जिल्ह्याच्या मतदार
यादीत छायाचित्र नसलेल्या दहा हजारावर मतदारांची नावं बाद
आणि
** अंबाजोगाई इथं स्वाराती
रुग्णालयाच्या कोविड लसीकरण विभागात १५ मिनिटं आरोग्य मार्गदर्शन उपक्रमाला प्रारंभ
****
पेगासस हेरगिरी आणि कृषी कायद्यांना
विरोधाच्या मुद्यावर विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत
कामकाज सुरू होताच, विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून फलक झळकावत
घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला. गदारोळ
घालणाऱ्या काही सदस्यांनी विधेयकाच्या प्रती फाडून अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावल्या,
त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी सदनाचं कामकाज आधी साडे बारा वाजेपर्यंत,
आणि त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी पुरवणी मागण्या सदनासमोर ठेवल्या, सदनानं त्यांना मंजुरी दिली.
दिवाळखोरी सुधारणा विधेयकही सदनानं चर्चेविना मंजूर केलं, त्यानंतरही गदारोळ सुरूच
राहिल्यानं, सदनाचं कामकाज चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेतही पहिल्या तहकुबीनंतर
सदनाचं कामकाज दुपारी बारा वाजता सुरू झाल्यावर उपसभापती हरिवंश यांनी गदारोळातच प्रश्नकाळ
पूर्ण करून सदनाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं, कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर
बाल न्याय सुधारणा विधेयक चर्चेविना संमत झालं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं,
सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
गेल्या सहा वर्षांत देशात
प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीत वाढ झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री
सोमप्रकाश यांनी दिली. २०२०-२१ या वर्षांत एकूण विदेशी गुंतवणूक ८१ अब्ज ९७ कोटी ३०
लाख अमेरिकी डॉलर असल्याची माहिती सोमप्रकाश यांनी दिली.
देशातली काही छोटी रेल्वे
स्थानकं सोडून इतर सर्व रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला
असल्याचं, रेल्वे तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं.
सध्या ६ हजार ४५ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध असल्याची माहिती वैष्णव यांनी
दिली.
कोविड बिप या उपकरणाबद्दल
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जीतेंद्र प्रसाद यांनी लोकसभेला माहिती दिली.
ECIL आणि ESIC यांनी विकसित केलेल्या या उपकरणामुळे रुग्णाचं तापमान, हृदय गती तसंच
प्राणवायूचं प्रमाण यावर देखरेख ठेवता येते. या उपकरणाचा रुग्णालयांसह घरगुती वापरही
मोठ्या प्रमाणात होत असल्याचं, सिंग यांनी सांगितलं. श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडे
या दहा हजार उपकरणांची मागणी आली असल्याची माहिती सिंग यांनी दिली.
पुढच्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत
चंद्रयानाचं प्रक्षेपण होण्याची शक्यता असल्याचं, अंतराळ राज्य मंत्री डॉ जीतेंद्र
सिंग यांनी लोकसभेत सांगितलं. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
****
राज्य लोकसेवा आयोगामार्फत
भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी मंजूर रिक्त पदं
भरण्यासाठी संबंधित विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससीकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
ही पदं भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन, कोणत्याही घटकांवर अन्याय
होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.
****
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत
आज बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी वी सिंधूनं उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या
सामन्यात तीने हाँगकाँगच्या नगन यी चेऊंगचा २१-नऊ, २१-१६ असा पराभव केला.
तीरंदाजीमध्ये महिलांच्या
एकेरी सामन्यात दीपिका कुमारी हिनं भूतानच्या कारमा हिला ६ - शून्य अशा फरकाने हरवत
उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर पुरुषांच्या एकेरीच्या उप - उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या तरुणदीप राय
आणि प्रविण जाधवचा पराभव झाला. हॅाकी मध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनकडून एक-चार
असा पराभव पत्करावा लागला. रोईंग मध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग पुरुषांच्या
लाईटवेट डबल स्कल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही.
****
औरंगाबाद इथं प्रस्तावित क्रीडा
विद्यापीठ पुणे इथं स्थापन करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारविरोधात एमआयएम पक्ष
आणि विविध क्रीडा संघटनांच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं सर्व सोयीसुविधा देवून विद्यापीठासाठी जागाही
निश्चित केली होती. मात्र, हे विद्यापीठ पुणे इथं स्थापन करण्याचा राज्य शासनाने घेतलेला
निर्णय हा औरंगाबादसह मराठवाड्यातल्या गुणवत्ताधारक खेळाडूंसाठी अन्यायकारक असल्याचं
आंदोलन कर्त्यांनी यावेळी म्हटलं. यामागणीचं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना
सादर करण्यात आलं.
****
मतदार याद्यांमध्ये छायाचित्र
नसलेल्या मतदारांना विहीत मुदतीत छायाचित्र जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु
हिंगोली जिल्ह्यात या मुदतीनंतरही छायाचित्र न देणाऱ्या १० हजार ८४३ मतदारांचं नाव
मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे. अशा मतदारांनी पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी
सहा क्रमांकाचा अर्ज भरून द्यावा, असं आवाहन निवडणूक विभागानं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा
तालुक्यात गांजाची लागवड करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत, गांजाची
झाडं तसंच गांजाचा साठा जप्त केला. आव्हई गाव परिसरात ही कारवाई करण्यात आली.
****
अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद
तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातल्या कोविड लसीकरण विभागात १५ मिनिटं आरोग्य
मार्गदर्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विभागात दररोज सुमारे एक हजार नागरिकांना
कोविड लस देण्यात येते. लस घेतल्यानंतर सुमारे अर्धा तास प्रत्येकाला देखरेखीखाली थांबावं
लागतं. या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशानं आरोग्य मार्गदर्शन उपक्रम
सुरू करण्यात आला आहे. या वेळेत योगाभ्यास तसंच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात येणार
आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत
करण्याचे आवाहन केलं होतं. या आवाहनास प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा-लोहारा इथून शिवसेनेच्यावतीनं रायगड जिल्ह्यातल्या
पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, किराणा आणि संसारोपयोगी साहित्य
पाठवण्यात आलं.
****
आठवी ते बारावीचे वर्ग नियमित
सुरू करण्यासाठी गाव पातळीवर समितीने निर्णय घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शासनाने परवानगी
दिली आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ५३ शाळाच सुरू झाल्या आहेत. यापूर्वी
फक्त आठ शाळांनी नियमित तासिका सुरू केल्या होत्या. तर काल मंगळवारपासून आणखी ४५ शाळा
सुरू झाल्या आहेत.
****
प्रत्येक माणसाने वर्षाला
किमान दहा झाडे लावावीत, असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे. जिंतूर इथल्या डीएसएम महाविद्यालय परिसरात महसूल विभागाच्या ४० एकर गायरान जमिनीत हरित
ज्ञानगिरी या संकल्पनेतून ३० हजार वृक्ष लागवडीचं उद्घाटन दीपक मुगळीकर यांच्या हस्ते
करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत
होते.
****
हरित लातूरचं स्वप्न साकार करण्यासाठी
कीर्ती उद्योग
समुहानं महानगरपालिकेला साडेपाच हजार झाडांची रोपं दिली आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने मनपा या
झाडांची लागवड आणि संवर्धन करणार आहे, शहरात प्रत्येक नागरिकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार
घेण्याचं आवाहन महापौर विक्रांत
गोजमगुंडे यांनी केलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर इथले वीरमरण आलेले सैनिक निलेश महाजन यांच्या पार्थिव देहावर आज धुळे जिल्ह्यातल्या सोनगीर इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
आले.
//********//
No comments:
Post a Comment