Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2021
Time 7.10AM to 7.20AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जुलै २०२१
सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात व्यत्यय;
गदारोळातच काही विधेयकांना मंजुरी.
·
संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या पाठीशी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
·
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचं नवीन
सत्र, ३० ऑगस्ट पासून सुरु होणार.
·
राज्यात सहा हजार २५८ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर ३६२
नवीन बाधित.
·
अवैध वाळू उपसा मामल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी भूमच्या उपविभागीय
अधिकारी मनीषा राशिनकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.
आणि
·
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलिना बोरगैई उपान्त्य फेरीत
तर पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर तीन - शून्यनं विजय.
****
पेगॅसस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि अन्य मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या
सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे, कालही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय
आला. या गदारोळातच काही विधेयकं मंजूर करण्यात आली, तसंच कोविड परिस्थितीवर चर्चा झाली.
लोकसभेचं कामकाज नऊ वेळा तर राज्यसभेचं कामकाज चार वेळा स्थगित केल्यानंतर दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं.
लोकसभेत कामकाज सुरु झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास
चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याच मुद्द्यांवर चर्चा होऊ शकली नाही. याबाबत
बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राज्यसभेतही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे
कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आलं. या बाबत अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र
नाराजी व्यक्त केली. संसदेतलं हे वागणं देशाहितामध्ये अडचणी निर्माण करत असून, सदस्यांनी
याविषयी आत्मपरीक्षण करावं असं ते म्हणाले.
या गदारोळातच अगदी काही वेळ चर्चा होऊन नौवहनासाठी सागरी मदतीसंबंधीचं विधेयक
राज्यसभेत मंजूर करण्यात आलं.
कोरोना विषाणू वरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर औषधाची मागणी
देशात वाढल्यानंतर, त्याची निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली होती; पण आता या औषधाची
मागणी घटत असून, उत्पादन वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर, रेमडेसिविरचा समावेश मर्यादित
निर्यातीसाठीच्या घटकांमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख
मांडवीय यांनी काल लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. सर्व जेनेरिक
औषधांना आवश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट केल्याचंही त्यांनी अन्य एका लेखी उत्तरात
सांगितलं.
पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणण्याचा कुठलाही प्रस्ताव
जी एस टी परिषदेच्या विचाराधीन नाही असं केंद्र सरकारनं काल स्पष्ट केलं. अर्थ राज्य
मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापासून पुढच्या २५ वर्षांसाठी एक विशेष
कार्य योजना आखण्याचे निर्देश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. भारतीय जनता
पक्षाच्या संसदीय गटाच्या बैठकीत हे निर्देश दिल्याचं, संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम
मेघवाल यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षात अधिक उत्तम उद्दीष्ट
साध्य करण्यासाठी नागरिकांकडून विचार मागवण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
फक्त राज्य किंवा केंद्र सरकारच नव्हे, तर संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या पाठीशी
आहे, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. चिपळूण इथं पूर परिस्थितीची
पाहणी केल्यानंतर, ते काल बोलत होते. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना
आणि व्यापाऱ्यांना मदत करणं महत्त्वाचं आहे. केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली
जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या आढावा बैठकीत राज्यपालांनी, प्रशासनाकडून
आतापर्यंतच्या झालेल्या बचाव आणि मदत कार्याबाबतची सविस्तर माहिती घेत, पूरग्रस्त प्रत्येक
नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करण्याची सूचना केली. रायगड जिल्ह्यातल्या
दरडग्रस्त तळई गावालाही राज्यपालांनी काल भेट दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना,
केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत भरीव मदत करावी, अशी मागणी
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात
निंबाळकर यांनी, हा निधी तात्काळ राज्य सरकारकडे वर्ग करावा अशी मागणी केली. उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या ४ लाख १६ हजार शेतकऱ्यांच्या, दोन लाख ६२ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावरची
पिकं अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचं नवीन
सत्र, ३० ऑगस्ट पासून सुरु होणार असून, एक ऑक्टोबर पासून तासिका सुरु करण्यास मान्यता
देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेची कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या
अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. भारतीय संविधान
हा विषय पदवी स्तरावर सुरु करण्यास मान्यता, वनस्पतीशास्त्र तसंच इलेक्ट्रॉनिक्स या
विषयाच्या सुधारित पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मंजुरी, एम.फिल, पीएच.डी अभ्यासक्रमाकरता
सुधारित नियमावलींना मंजुरी, आदी निर्णयांचा यात समावेश आहे.
****
राज्यात काल सहा हजार २५८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ७६ हजार ५७ झाली आहे. काल २५४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार
८५९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल १२ हजार ६४५ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ५८ हजार ७५१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ५४ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
८२ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३६२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या चार, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २०० रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७४,
लातूर ४१, औरंगाबाद ३२, नांदेड सहा, जालना पाच, हिंगोली तीन, तर परभणी जिल्ह्यात काल
एक नवीन रुग्ण आढळला.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत जीर्ण तसंच धोकादायक शाळांच्या
वर्गखोल्या तसंच इमारती पाडण्याचा निर्णय, जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. पाथरी
तालुक्यात सिमुरगव्हाण, धामणगांव आणि वाघाळा, सोनपेठ तालुक्यातील उखळी, विटा, शिर्शी,
तसंच शेळगाव, सेलू तालुक्यात वालूर, शिंदे टाकळी, जिंतूर तालुक्यातील आसेगांव, परभणी
तालुक्यातील जांब, मानवत, कोल्हा, पालम तालुक्यात पेठशिवणी, इथल्या शाळांच्या धोकादायक
वर्गखोल्या तसंच इमारती पाडण्यात येतील. या ठिकाणी नवीन इमारती उभारण्यासंदर्भातही
जिल्हा परिषदेनं कार्यवाही सुरु केली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे
संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हा उपनिबंधकांनी
दिले आहेत. मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने
धान्य खरेदी करणं, धान्य कडता आणि सॅम्पल, ग्रेडिंग व्यवस्था नसणं, आदी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेत
बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. उमरगा इथले उपनिबंधक यांची मुरूम
कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या पूर्णा शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता
मोहीम राबवून औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातल्या विविध भागातल्या
नागरिकांनी या मागणीचं सामुहिक स्वाक्षऱ्यांचं निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केलं
आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम इथल्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकरला अवैध वाळू
उपसाच्या मामल्यात एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी काल पकडण्यात आलं. अवैध वाळू
उपसाप्रकरणी एक टिप्पर तसंच जेसीबी, तीन ट्रॅक्टर हे वीना कारवाई वाळू वाहतुकीसाठी
चालू ठेवण्यासाठी, त्यांनी ही लाच मागितली होती. उपविभागीय कार्यालयातील कोतवाल विलास
जानकर याच्यामार्फत वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या कामनगाव इथले शेतकरी संजय देशमुख यांनी,
आपल्या शेतातल्या कोरड्या पडलेल्या दोन बोअरवेल जवळ खड्डा करून, वाहून जाणारं पावसाचं
पाणी अडवून, जलपुनर्भरण केलं. यामुळे त्यांच्या विहिरीची पाणीपातळी वाढली. या विहिरीच्या
पाण्यावर ठिबक सिंचन करून, दोन एकर शेत जमीनीवरील सिताफळ आणि दोन हजार बांबूंचं बेट
जोपासलं आहे. या विषयी अधिक माहिती देताना संजय देशमुख म्हणाले –
दोन वर्षांपूर्वी मी दोन्ही बोअरवेलमधे पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी
बोअरवेलच्या बाजुला जेसीबी च्या सहाय्यानं मोठे खड्डे करून घेतले. केसिंग पाईपला ड्रील
मशिनने छिद्र पाडले. पाईपवर आधी मी नेट बांधून घेतली. नंतर खडी, रेती आणि कोळसा यांचे
व्यवस्थित थर लावून घेतले. शेतातील वाहून जाणारं पाणी एकत्र करून बोअरवेलमधे सोडलं.
अशा प्रकारे लाखो लीटर पाण्याचं भूगर्भात पुनर्भरण झालं. आजघडीला माझ्या विहिरीला उन्हाळ्यातसुद्धा
बऱ्यापैकी पाणी येतंय. आपणही अशा प्रकारे जल पुनर्भरण करून पाण्याची पातळी वाढवू शकतो
आणि पर्यावरणाला हातभार लावू शकतो.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत काल ६९ किलो वजनी गटात भारताची मुष्टीयोद्धा लवलिना
बोरगैईनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला. उपान्त्यपूर्व फेरीत तिने जर्मनीच्या नादिन एपेट्ज
चा पराभव केला.
बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या
जोडीनं ब्रिटनच्या जोडीचा पराभव केला.
भारताच्या पुरुष हॉकी संघानं स्पेनचा तीन - शून्य असा सहज पराभव केला.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत आज सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांत भारतीय
खेळाडुंचे सामने होणार आहेत. बँडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि साई प्रणितचा सामना
आहे. तिरंदाजीत तरूणदीप रॉयचा बाद फेरीतला सामना असेल तसंच दिपिका कुमारी आणि प्रवीण
जाधव यांचेही सामने होतील. मुष्ठियुद्धात पुजा राणीचाही सामना आज होणार आहे.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तूर, सोयाबिन, उडीद, मूग, करडई, हरभरा, या मालाच्या
बाजार भाव किमतीच्या ७५ टक्के रक्कम, तारणकर्ज म्हणून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी
केलं आहे.
****
पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती वापराच्या गॅस दरवाढी विरोधात नांदेड जिल्ह्यातल्या
लोहा इथं काल तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. पक्षाच्या
वतीनं तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आलं.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय-घाटी इथं राष्ट्रीय आरोग्य
अभियानामार्फत, २०० खाटांचा स्वतंत्र माता आणि बालसंगोपन - एमसीएच विभाग उभारण्यास
देण्यात आलेली मंजुरी रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा
पुनर्विचार व्हावा अशी मागणी, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी,
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. चव्हाण यांनी देशमुख यांची
काल मुंबईत मंत्रालयात भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं. घाटी रुग्णालयात मराठवाडा
तसंच विदर्भ, खान्देशातल्या अनेक जिल्ह्यातले गोरगरीब रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे
घाटीत एमसीएच विंग झाल्यास गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होईल, असं चव्हाण यांनी या
निवेदनात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी
मतदार संघाच्या वतीने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्नधान्य,
ब्लँकेट्स आणि जनावरांसाठी चारा आदी साहित्य रवाना करण्यात आलं. आमदार डॉक्टर राहुल
पाटील यांच्या उपस्थितीत काल हे साहित्य घेऊन दोन ट्रक रवाना झाले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या आवाहनानुसार
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम, वाशी आणि परंडा इथून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जीवनावश्यक
वस्तूंची मदत पाठवण्यात आली. वैशाली मोटे आणि जिल्हा कार्याध्यक्ष मनिषा पाटील यांच्या
उपस्थितीत हे साहित्य रवाना करण्यात आलं.
****
येत्या दोन दिवसात कोकणात बहुताश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच
ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे. त्याकाळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
आहे. तर महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment