आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ जुलै
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघानं स्पेनचा तीन -
शून्य असा सहज पराभव केला. आज सकाळी झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं प्रथमपासूनच
वर्चस्व राखलं होतं.
दरम्यान, ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानू यांना मणिपूर सरकारने
पोलिस विभागात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी प्रवेशासाठीची जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा
तीन ऑक्टोबरला होणार असल्याचं शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी जाहीर केलं आहे.
सर्व कोरोना नियमांचं पालन करत ही परीक्षा आयोजित केली जाईल, असं प्रधान यांनी त्यांच्या
ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटकातील नेतृत्व बदलाच्या गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चांच्या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी. एस. यदियुरप्पा यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला आहे. नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव जाहीर
होईल, याबाबत उत्सुकता आहे.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने एक कोटींचा टप्पा पार केला
आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, एक कोटी ६४ हजार ३०८
एवढी झाली आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती
दिली. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचं
कौतुक केलं.
****
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय
औद्योगिक संस्था महासंघाची काल बैठक झाली. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न मार्गी
लावण्यासाठी पुढाकार घेणार, वीजपुरवठ्याशी संबंधित विविध योजनांचा लाभ आणि अखंड वीज
पुरवठा मिळावा यासाठी कृती दल स्थापन करणार असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी पोलिस ठाण्यातला पोलिस उपनिरिक्षक राहुल पांडुरंग
लोखंडे यास ८० हजार रुपये लाच घेतांना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराचा अटकपूर्व
जामीन रद्द करू नये आणि गुन्ह्यातली वाहनं जप्त करू नये, यासाठी लोखंडे यानं लाच मागितली
होती.
****
No comments:
Post a Comment