Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2021
Time 7.10AM to 7.20AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
जुलै
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा नववा दिवसही विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित.
·
सीबीएसई चा बारावीचा निकाल जाहीर; ९९ पूर्णांक ३७ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
·
आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार - मुख्यमंत्र्यांचे
संकेत.
·
शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन.
·
राज्यात सहा हजार ६०० नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल दहा जणांचा मृत्यू तर
नव्या ३३७ बाधितांची नोंद.
·
बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावण्याचे
पालकमंत्र्यांचे निर्देश.
आणि
·
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि मुष्टीयोद्धा लवलीना
बोरगोहेन उपांत्य फेरीत दाखल.
****
कृषी कायद्यांना विरोध तसंच कथित पेगासस हेरगिरीसह अन्य विविध मुद्यांवरून,
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा नववा दिवसही, विशेष कामकाज न होता गोंधळाचाच ठरला.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यानं, लोकसभा तसंच राज्यसभेचं कामकाज दुपारपर्यंत
वारंवार स्थगित झाल्यानंतर अखेर सोमवारपर्यंत तहकूब झालं.
लोकसभेत कामकाज सुरू होताच, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि अन्य विरोधी
पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर
अडमुठेपणाचा आरोप करत, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका केली. विरोधी पक्ष मागणी
करत असलेल्या मुद्यांवर सरकारने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. या गदारोळातच सामान्य
विमा कामकाज विधेयक सदनासमोर सादर करण्यात आलं. प्रश्नोत्तराच्या तासात काही प्रश्नांवर
चर्चा झाली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांना कामकाज सोमवारपर्यंत स्थगित
करावं लागलं.
राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळातच
नारळ विकास मंडळ विधेयक राज्यसभेनं चर्चेविना मंजूर केलं. अर्थ राज्य मंत्री भागवत
कराड यांनी, ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा विधेयक, तर राज्यमंत्री राव इंद्रजीत
सिंह यांनी, मर्यादित जबाबदारी भागीदारी सुधारणा विधेयक सदनासमोर सादर केलं. मात्र
गदारोळ वाढत गेल्यानं, वारंवारच्या तहकुबीनंतर उपसभापतींनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित
केलं.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई चा बारावीचा निकाल काल जाहीर झाला.
यात ९९ पूर्णांक ३७ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत मुलींचं
उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९९ पूर्णांक ६७ शतांश टक्के, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं
प्रमाण, ९९ पूर्णांक १३ शतांश टक्के इतकं आहे. केंद्रीय विद्यालयाचा निकाल १०० टक्के,
तर जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल, ९९ पुर्णांक ९४ शतांश टक्के इतका लागला आहे. यंदा
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता, वैकल्पिक मूल्यांकनाच्या आधारावर
हा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा
बारावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
पूरबाधित क्षेत्र तसंच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचं पुनर्वसन करण्यावर
सरकारचा भर असून, हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर
बोलत होते. दरडी तसंच खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून, त्याबाबत उपाययोजना
केल्या जातील तसंच नदीपात्रातली अतिक्रमणं हटवण्याच्या आणि बांधकामांना परवानगी न देण्याच्या
सूचनाही दिल्या असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती तसंच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे, रस्त्यांचं
सुमारे एक हजार ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सार्वजनिक बांधकाम
मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. सर्वाधिक नुकसान एकट्या कोकण विभागात झालं
असून, त्याखालोखाल पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागात नुकसान झालं
आहे. २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती,
तर लहानमोठे १४० पूल पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत
वाढ होण्याची शक्यता, चव्हाण यांनी वर्तवली.
****
पूरग्रस्त भागात विज बिलास स्थगिती देण्यात आली असून, या भागात वीज बिलाची वसुली
करू नका असे स्पष्ट आदेश दिले असल्याची माहिती, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
सांगली जिल्ह्यात पुरामुळे वीज पारेषण आणि वितरण कंपनीच्या नुकसानीची पाहणी राऊत यांनी
केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वीज बिल माफ करण्याचा अधिकार आपल्याला
नाही, त्याबाबत मंत्रिमंडळात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट
केलं.
दरम्यान, पूरग्रस्त भागात वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत उपकेंद्र, वीज वाहिन्या
आणि रोहित्र यांचे अंदाजे ३४ कोटी ६८ लाख रूपये इतकं नुकसान झाल्याची माहिती, राऊत
यांनी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी नागरिकांकडून
आपले विचार आणि मतं मागवली आहेत. नागरिकांनी माय जीओव्ही पोर्टलवर आपले विचार पाठवावे,
असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख
यांचं काल निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला या एकाच
मतदारसंघातून ते सर्वाधिक ११ वेळा विधानसभेवर निवडून आले होते. २००९ च्या निवडणुकीत
विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख
हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४
वर्षे सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सांगोला इथं अंत्यसंस्कार
होणार आहेत.
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित
पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी आमदार नरसय्या आडम यांनी देशमुख यांच्या
निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
प्रसिद्ध लेखिका आणि प्रख्यात मराठी शिक्षिका सुषमा अभ्यंकर यांचं काल नाशिक
इथं वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९५ वर्षांच्या होत्या. ‘सदाफुली’ या बालनाट्य संस्थेची
स्थापना करून त्यांनी अनेक बालनाट्यं रंगभूमीवर आणली. या संस्थेसाठी लिहिलेल्या बालनाट्याच्या
दोन संहितांना, राज्य शासनाचे उत्कृष्ट वांङमय निर्मितीचे दोन पुरस्कार मिळाले आहेत.
काल नाशिक इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
राज्यात काल सहा हजार ६०० नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ९६ हजार ७५६ झाली आहे. काल २३१ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३२ हजार
५६६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल सात हजार ४३१ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६० लाख ८३ हजार ३१९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ६१ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
७७ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३३७ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर दहा जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, बीड जिल्ह्यातल्या चार, तर परभणी
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८० रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७२,
लातूर ४१, औरंगाबाद २८, जालना नऊ, हिंगोली तीन, तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी
दोन रुग्ण आढळले.
****
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आष्टी,
पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावावेत असे आदेश, पालक मंत्री धनंजय
मुंडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते
बोलत होते. या तालुक्यांचा थेट नगर जिल्ह्याशी संबंध येत असल्यामुळे, तालुक्यांच्या
सीमेवरच नागरिकांची कोरोना विषाणू चाचणी करूनच प्रवेश देण्याची सूचना करण्यात आल्याचं,
त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती
आता बीड जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने, आरोग्य विभागाच्या वतीने आणि पोलिस प्रशासनाच्या
वतीने अँन्टीजेन टेस्ट जाणाऱ्या येणाऱ्यांची निश्चित केल्यानंतर नक्कीच संख्या ही मोठ्या
प्रमाणात कमी होईल. तिसरी लाट आलीच तर बीड जिल्हा सर्व व्यवस्थेनं सुसज्ज आहे. ओटू
बेड पासून, नॉन कोविड बेड पासून, ओटू बेड, नॉन ओटू बेडपासून, व्हेंटीलेटरपासून सर्व
यंत्रणा बीड जिल्ह्याच्या आज तयार आहेत.
****
कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कारणांचा अभ्यास करून, आवश्यक उपाययोजनांबाबत
आरोग्य यंत्रणांनी कार्यवाही करावी, असं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी
म्हटलं आहे. ते काल आढावा बैठकीत बोलत होते. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना
करण्यासाठी जिल्ह्यात बालकांसाठी ६३१ खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, यामध्ये ४५ व्हेंटिलेटरयुक्त
रुग्णखाटांचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत
प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिला
सिंधूनं २१-१३, २२-२० असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं.
मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या
सामन्यात तिने चीनी तैपेईच्या चेन निन चेन हिचा चार - एक असा पराभव केला.
भारतीय महिला हॉकी संघानं उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या
सामन्यात भारतीय संघानं आयर्लंडचा एक - शून्य असा पराभव केला. आज भारतीय महिला संघाचा
शेवटचा गट सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानला शेवटच्या गट सामन्यात पाच-तीन ने पराभूत केलं.
पुरुष संघाने याआधीच उपांत्यपूर्व फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे.
थाळीफेक स्पर्धेत सीमा पुनिया सहाव्या क्रमांकावर राहिली. तीरंदाजीत दीपीका
कुमारीला उपान्त्य फेरीत दक्षिण कोरियाच्या आन सान कडून शून्य - सहा असा पराभव पत्करावा
लागला.
नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकेर आणि राही सरनोबत
अंतिम फेरीत स्थान मिळवू शकल्या नाही. मनु १५व्या, तर राही ३५व्या स्थानावर राहिली.
ॲथलेटिक्स मध्ये महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतची द्युती चंद
सातव्या स्थानावर राहिली. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत एम पी जबीर देखील
सातव्या स्थानावर राहीला.
नेमबाजीत आज महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारात पात्रता फेरीत तेजस्वीनी सावंत
आणि अंजूम मौदगील खेळणार आहेत. तर मुष्टीयुद्ध प्रकारात अमित पंघाल आणि पूजा राणी यांचे
सामने होणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात बनावट दूध तयार करणारं रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणलं आहे.
जामखेड तालुक्यात खर्डा तसंच नागोबाची वाडी इथं थेट कारवाई करून, दूध तयार करण्याचे
अड्डे उध्वस्त करण्यात आले. दुध संकलन केंद्रातलं सुमारे दोन हजार ११८ लीटर बनावट दूध
नष्ट करण्यात आलं असून, दूध तयार पावडर, रसायनं तसंच अन्य साहित्यं, असं सुमारे दोन
लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या
नेतृत्वात अन्न आणि औषध विभागानं ही कारवाई केली.
****
स्थानिक स्वराज्य संस्था तसंच शासनाच्या सुविधांचा अधिकाधिक कुशलतेने वापरावर
भर दिला पाहिजे, असं परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. जिंतूर नगर परिषदेनं
उभारलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचं उद्घाटन मलिक यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते
बोलत होते. या संस्थांच्या मोठ्या वास्तू वर्षातून फक्त काही दिवसापुरत्याच वापरण्याऐवजी,
युवकांच्या गरजेनुरुप प्रशिक्षणासाठी उपयोगात आल्या पाहिजेत, असं मलिक म्हणाले. दरम्यान,
जिंतूर तालुक्यात देवगाव फाटा इथल्या नुकसानग्रस्त शेतकरी रमेश तांबे यांच्या शेतातील
पीक नुकसानीची, पालकमंत्री मलिक यांनी काल पाहणी केली. इतर भागात झालेल्या पीक नुकसानीची
त्यांनी माहिती घेतली.
****
जालना इथं शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीनं काल जिल्हा परिषद कार्यालयावर
मोर्चा काढण्यात आला. पोषण आहार कामगारांना प्रतिमाह ११ हजार रुपये मानधन देऊन सेवत
कायम करावं, सेंट्रल किचन पध्दत रद्द करावी, यासह अन्य मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या
या मोर्चात, पोषण आहार कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिक्षणाधिकाऱ्यांनी
संघटनेच्या शिष्टमंडळाकडून मागण्यांचं निवेदन स्वीकारलं.
****
उमेद स्वयंसहाय्यता समुहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी आर्थिक आणि बौद्धिक
मदत करावी, असं आवाहन, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता
यांनी केलं. ते काल जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. स्वयंसहाय्यता
समुहातील महिलांना उपजीविकेच्या वेगवेगळ्या संधी शोधुन उत्पन्नवाढीसाठी मदत करावी असं
आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
No comments:
Post a Comment