Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जुलै २०२१ दुपारी १.०० वा.
****
कोविड महामारीच्या काळात
देशात अनेक नव्या उपाययोजना राबवण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र
सिंह यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात पीपीई किट आणि व्हेंटिलेटरचं उत्पादन सुरु करण्यात
आलं, पीपीई किटचं निर्जंतुकीकरण करण्याची नवी प्रक्रिया शोधून काढण्यात आली, असं त्यांनी
एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. दरम्यान, लोकसभेत विविध मुद्यांवरुन आजही विरोधकांचा
गदारोळ सुरु आहे. त्यातच प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं
लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही कामकाज सुरू
झाल्यावर पेगॅसस, कृषी कायदे यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे
कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
****
मागच्या चार आठवड्यांच्या
कालावधीत, देशभरातल्या २२ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा
कल दिसून आला. हे २२ जिल्हे महाराष्ट्रासह केरळ, मणीपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, आसाम
आणि त्रिपूरा या राज्यांमधले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. यामध्ये
महाराष्ट्रातल्या बीड आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक
लसीच्या ४४ कोटी ६१ लाख ५६ हजार ६५९ मात्रा वितरीत करण्यात
आल्या आहेत. काल देशभरात ४० लाख दोन हजार ३५८ लोकांना लस टोचण्यात आली.
दरम्यान, देशात काल नव्या
४३ हजार ६५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६४० रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी १४ लाख ८४ हजार ६०५ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २२ हजार २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ४१
हजार ६७८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी सहा लाख ६३ हजार १४७ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
सारथी मार्फत मराठा, कुणबी
समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी
पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत
१८ ऑगस्ट ही आहे. अधिक माहिती सारथीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती व्यवस्थापकीय
संचालक अशोक काकडे यांनी दिली.
****
राज्यातल्या कृषी अभ्यासक्रमाच्या
विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्त्याचे वाटप
या शैक्षणिक वर्षात महा डीबीटी आणि सेवा प्रणालीद्वारे होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातला
आदेश काल प्रसिद्ध केला. विविध व्यावसायिक कृषी विषयक पदवी अभ्यासक्रम आणि कृषी विज्ञान
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार
आहेत. उद्यापासून पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरु
होणार आहेत, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी
दिली. दहा ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा होतील. पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या
परीक्षा १७ ऑगस्टपासून घेण्यात येतील, तर अभियांत्रिकी, फार्मसी, विधीसह सर्व व्यावसायिक
अभ्यासक्रमाच्या परीक्षा, २० ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.
****
पहिला अर्जुन पुरस्कार प्राप्त
खेळाडू ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं आज पुणे इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे
होते. नाटेकर यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
विजेतेपदं मिळवली आहेत. भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू
होते.
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत
आज बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी वी सिंधूनं उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या
सामन्यात तीने हाँगकाँगच्या नगन यी चेऊंगचा २१-नऊ, २१-१६ असा पराभव केला.
तिरंदाजीमध्ये उप-उपान्त्यपूर्व
फेरीत भारताच्या तरुणदीप रायचा इस्रायलच्या खेळाडूकडून पराभव झाला.
हॅाकी मध्ये भारतीय महिला
संघाला ग्रेट ब्रिटनकडून एक-चार असा पराभव पत्करावा लागला.
रोईंग मध्ये अर्जुन लाल जाट
आणि अरविंद सिंग पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल प्रकारात अंतिम फेरीत पोहोचू शकले नाही.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान
काल रद्द झालेला टी ट्वेंटी सामना आज खेळला जाणार आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू
कृणाल पंड्या याला कोविड संसर्ग झाल्यानं, कालचा नियोजित सामना रद्द करावा लागला होता.
खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या सर्वांची आरटी
पीसीआर चाचणी होत असून, सर्वजण कोविड संसर्गापासून सुरक्षित असल्याचा अहवाल आला, तर
मालिकेतले राहिलेले दोन्ही सामने आज आणि उद्या लागोपाठ होणार असल्याचं, भारतीय क्रिकेट
नियामक मंडळ - बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment