Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 July 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** पेगॅसस, कृषी कायद्याच्या
मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात पुन्हा व्यत्यय
** कोरोना विषाणू संसर्गाचे
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ३८ शतांश टक्के
** कोरोना विषाणू संसर्गाचे
जालन्यामध्ये २५ आणि औरंगाबादमध्ये आठ नवे रुग्ण
आणि
** आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी
जपाननं सहकार्य करावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे
****
पेगॅसस, कृषी कायदे यासह इतर
मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात
आजही दिवसभर व्यत्यय आला. लोकसभेत कामकाज सुरु होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल विरोधी
पक्ष सदस्यांनी सभागृहात केलेल्या वर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. तर विरोधी पक्षनेते
संसदेची प्रतिष्ठा राखत नसल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला.
त्यावरुन गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज सुरवातीला दोन वेळा, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत
स्थगित करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ वाढतचं राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी
स्थगित करण्यात आलं. राज्यसभेतही कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या
सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी एका तासासाठी, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत
आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण
देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते
आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी संबंधित विविध उपक्रमांची ऑनलाईन सुरुवात करताना बोलत
होते. त्यांनी यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण तज्ञांशी संवादही साधला. गेल्या
एक वर्षात नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप परिश्रम घेण्यात आले
असल्याचं ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा
भाग बनला आहे. विद्यार्थी गरीब असो किंवा श्रीमंत शिक्षण घेताना ते हसत खेळतच मिळेल,
नव्या शिक्षण धोरणामुळे डीजीटल इंडियाला नवी गती मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक
युवक आपल्या आवडीनुसार शिक्षणाची शाखा निवडू शकणार असून "सफल"च्या माध्यमातून
विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं मूल्यमापन शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना
काळात शिक्षण क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण झाली, मात्र विद्यार्थ्यांनी ते सहजपणे
स्वीकारल्याची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली.
****
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय
पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इतर मागासवर्गीय
- ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलघटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय
केंद्र सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा
निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं जाहीर
केलं आहे. या निर्णयाचा इतर मागासवर्गीयांमधील दिड हजार पदवीच्या आणि दोन हजार पाचशे
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बलघटकातल्या
पाचशे पन्नास पदवी आणि एक हजार पदव्युत्तर विद्यार्थी अशा एकूण पाच हजार पाचशे पन्नास
विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचे
रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३८ टक्के झाला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या
चोवीस तासांमध्ये या संसर्गाच्या ४३ हजार ५०९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या
देशात चार लाख तीन हजार ८४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातल्या प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं पंचेचाळीस कोटींचा
टप्पा ओलांडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात
कोरोना विषाणू संसर्गाचे २५ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता ६१
हजार ४३५ झाली आहे. या संसर्गातून मुक्त झालेल्या चार रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी
देण्यात आली. आतापर्यंत जालना जिल्ह्यातले ६० हजार १७८ रुग्ण या आजारातून बरे झाले
असून सध्या ७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयात आज कोरोना विषाणू संसर्गाचे आठ नवे रुग्ण दाखल झाले. या रुग्णालयातून
एका रुग्णाला बरे झाल्यानंतर सुटी देण्यात आली.
****
राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या
प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केलं जात असून त्याच पार्श्वभूमीवर
विशेषत: कर्करोग उपचारावर सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावं, अशी मागणी आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी केली आहे. त्यांनी जपानचे मुंबईतले वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता
यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं कर्करोग उपचार रुग्णालय
उभारणीकरता सहकार्य करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्यात वास्तव्याला असलेल्या
जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री
टोपे यांनी यावेळी दिली.
****
पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला
यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांच्या दूरध्वनींचं ध्वनीमुद्रण केलं होतं तर त्यांनी
त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्र्न राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. शुक्लांच्या
वकिलांनी न्यायालयामध्ये शासकीय परवानगी घेऊन हे ध्वनीमुद्रण करण्यात आल्याचं सांगितलं
आहे. दिशाभूल करुन ही परवानगी घेण्यात आली आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. त्यांनी
नेत्यांच्या दूरध्वनींचं ध्वनीमुद्रण करण्यासाठी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या
घेतल्या होत्या, असा दावाही मलिक यांनी केला आहे.
****
बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण
देणाऱ्या ‘ठेव विमा आणि पत हमी महामंडळ’ विधेयकाच्या मसुद्याला, केंद्रीय मंत्रीमंडळानं
मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस देविदास तुळजापुरकर
यांनी अर्थ संकटातील बँकामधील पाच लाखांच्या ठेवींना संरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या
या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ते म्हणाले…
डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडीट गॅरन्टी
कॉर्पोरेशन या कायद्यातल्या दुरुस्तीला मंजूरी दिलेली आहे. त्यामुळे जी विम्याची रक्कम
ही एक लाखांपर्यंत होती, ती आता पाच लाखांवर गेलेली आहे. याशिवाय पुर्वी पूर्ण ते प्रोसेडिंग
संपल्यानंतर ते पैसे ठेवीदाराला मिळत होते. आता मात्र नव्वद दिवसात ते पैसे त्या बुडणाऱ्या
बँकेतल्या ठेवीदाराला मिळू शकणार आहे. यामुळे जवळजवळ ९८ टक्के जे छोटे ठेवीदार आहेत,
त्यांना एक मोठा रिलिफ मिळणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात जल जीवन मिशन
अंतर्गत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीनं गाव विकास कृती आराखडा निर्मितीसाठी
विशेष अभियान सुरु आहे. याअंतर्गत खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन, सांडपाणी,
घन कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत स्वच्छता टिकून राहावी यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
या आराखडा निर्मितीसाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, आशा आणि अंगणवाडी
सेविका यांना ऑनलाईन पद्धतीनं काल आणि आज प्रशिक्षण देण्यात आलं. गावातील प्रमुख पिकं,
येणाऱ्या काळात गावाला लागणारं पाणी, गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या अशा विविध
घटकांचं नियोजन यात करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय रूग्णालय घाटीच्या आवारातील संरक्षण भिंत तसचं ड्रेनेज लाईन बांधकामासाठी
आठ कोटी रूपये शासनानं मंजूर केलं असल्याचं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनी म्हटलं आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बांधकामासाठी
निधीची तरतूद करावी यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत होतो, अशी माहितीही त्यांनी
एका निवेदनाद्वारे दिली आहे.
****
राज्य शासनाचा २०२१ चा ‘महाराष्ट्र
भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक
कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी
सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या ऑक्टोबर किंवा
नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.
//********//
No comments:
Post a Comment