Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 22 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· पॅनकार्ड
आणि पासपोर्टसाठी आता स्वस्त धान्य दुकानात अर्ज करता येणार.
· राज्यसभा
पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या रजनी पाटील तसंच भाजपचे संजय उपाध्याय यांचे अर्ज दाखल.
· परभणी
तालुक्यात बाभळगाव इथं नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी मंजूरी.
आणि
· नाशिक
जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढल्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी ७४ टक्क्यांवर.
****
कायम खाते क्रमांक -पॅनकार्ड आणि पारपत्र
- पासपोर्टसाठी आता स्वस्त धान्य दुकानात अर्ज करता येईल. केंद्रीय अन्न मंत्रालयातील
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय अन्न मंत्रालय आणि ई-गव्हर्नन्स सर्व्हिस
इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं देशभरातल्या राशन दुकानात कॉमन सर्व्हिस
सेंटर बनवण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना अनेक सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
पासपोर्ट आणि पॅनकार्डसह वीजेचं देयक भरणं, पाण्याचं देयक भरणं आणि निवडणूक आयोगाशी
संबंधित कामं सुद्धा करून दिली जाण्याची शक्यता आहे. या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध
करून देण्याचा पर्याय रेशन दुकानदारांसमोर असणार आहे. यामुळे रेशन दुकानांचं उत्पन्न
वाढायलाही मदत होणार आहे.
****
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस तसंच
भाजप उमेदवारांनी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजप उमेदवार मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांनीही
आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध जिंकण्याचा प्रयत्न असेल, असं काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. उद्या या अर्जांची छाननी होणार असून,
४ ऑक्टोबरला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
****
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे मराठवाडा
विरोधी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्याचा
निधी पळवला आहे, मराठवाड्याला सहाशे कोटी रुपये जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्यासाठी
आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला फक्त रस्त्यांच्या कामासाठी अठराशे कोटी रुपयांचा
निधी देण्यात आला आहे, मात्र शेतकऱ्यांना कोणताही निधी या सरकारनं दिलेला नाही, मुख्यमंत्र्यांनी
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी १७ सप्टेंबरला केलेल्या विकास कामांच्या घोषणांमध्ये मराठवाड्याच्या
तोंडाला पाने पुसल्याची टीका निलंगेकर यांनी केली.
****
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव
पाटील यांची आज जयंती. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन
केलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सुशिक्षित, सुसंस्कृत, नीतीवान,
प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचं मोठं काम केलं असून त्यांचं कार्य पुढील अनेक पिढ्यांना
मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी कर्मवीर पाटील यांच्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त केली आहे.
****
परभणी तालुक्यातील बाभळगाव इथं नवीन औद्योगिक
वसाहत स्थापन करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मंजूरी मिळाली
आहे. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी भूसंपादन प्रक्रियेची नोटीस
शासनातर्फे जारी करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात या नवीन औद्योगिक वसाहतीच्या
कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि
जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीनं शनिवारी २५ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचं आयोजन
करण्यात आलं आहे. या लोकअदालतीत ज्या पक्षकरांना सहभाग नोंदवता येणार नाही अशा पक्षकारांसाठी
ई लोकअदालत होणार असल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
ज्या पक्षकारांना ई लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संबंधीत न्यायालयात
किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद इथं संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
परभणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन
इमारतीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली असून या इमारतीसाठी लागणारा निधी लवकरच उपलब्ध करून
काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. आमदार
डॉ.राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील यांनी आज मुंबई इथं मुख्यमंत्री ठाकरे
यांची भेट घेतली तसंच जिल्ह्यातील काही प्रमुख प्रलंबीत प्रश्न देखील मांडले.
****
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून आज
सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळं गोदावरी
नदीला पूर आला आहे. कालपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं धरणाच्या पाणी पातळीत
वाढ झाल्यानं हा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
देण्यात आला आहे.
दरम्यान, मालेगाव, इगतपुरी, पेठ, सुरगाणा,
दिंडोरी या भागातही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील दारणा धरणातून २ हजार ७०८ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं, कडवा धरणातून ४२४ तर नांदूर मधमेश्वर इथून तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या भागातील २२० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी
धरणात पाण्याची आवक वाढली असून, सध्या धरणाची पाणी पातळी सुमारे ७४ टक्के झाली आहे.
****
मागील दोन दिवसांतील सततच्या पावसामुळं बीड
जिल्ह्यातील मांजरा धरण शंभर टक्के भरलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
दरम्यान, उस्मानाबाद शहरात आज दिवसभर पाऊस
सुरु आहे. या पावसामुळं काढणीला आलेल्या खरीप पिकांचं नुकसान होत आहे.
****
धुळे शहर आणि तालुक्यातील अनेक गावांत आज
दुपारी एक तास मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७ पुर्णांक ५ मिलीमीटर
पावसाची नोंद करण्यात आली.
****
येत्या २४ आणि २५ सप्टेंबरला बंगालच्या खाडीवर
कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही
ठिकाणी राज्यात जोरदार पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान विभागाच्या ज्येष्ठ वैज्ञानिक
डॉक्टर शुभांगी भुटे यांनी वर्तवली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित
जाती आणि नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात
येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेसाठी महा - डीबीटी च्या संकेतस्थळावर
अर्ज विहीत नमुन्यात करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषीविकास अधिकाऱ्यांनी केलं आहे.
//************//
No comments:
Post a Comment