Friday, 1 October 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वच्छता हे प्रत्येकाचं, प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष, प्रत्येक पिढीचं अभियान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज स्वच्छ भारत शहरी अभियानाचा दुसरा टप्पा, अमृत अभियान दोन आणि शहर कायाकल्प आणि परिवर्तनासाठीच्या, अटल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. प्रत्येक शहर कचरामुक्त करणं, हा स्वच्छ भारत शहरी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, जल सुरक्षित शहर बनवणं, आणि नद्यांमध्ये सांडपाणी न मिसळणं याकडे लक्ष देणं, हे अमृत अभियानाच्या पुढच्या टप्प्याचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शहरांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.   

****

येणाऱ्या सणासुदीच्या काळात नागरिकांनी गर्दी टाळावी, शारिरीक अंतर राखावं आणि मास्कचा वापर करावा, असं आवाहन, केंद्रीय आरोग्य विभागानं केलं आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना, सण साजरे करतांना कोविड नियमांचं पालन करावं असंही सांगितलं आहे. महाराष्ट्रात ४० हजारांपेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण असल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

****

सार्वजनिक क्षेत्रातल्या १२ बँकांमधल्या कारकुनी पदांसाठी आणि भविष्यातल्या रिकाम्या जागांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, यापुढे हिंदी आणि इंग्रजीसोबतच, १३ स्थानिक भाषांमध्ये करण्याची शिफारस, केंद्रीय अर्थमंत्रालयानं केली आहे. सार्वजनिक बँकांच्या क्षेत्रात कारकुनी पदांवरच्या नियुक्त्या स्थानिक भाषांमध्ये करण्याच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी, मंत्रालयानं नियुक्त केलेल्या एका समितीच्या शिफारसींच्या आधारे, हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

हरित ऊर्जा धोरणाच्या अंमलबजावणीसाठीच्या कार्यप्रणालीची घोषणा महाराष्ट्र सरकार लवकरच करणार आहे. या प्रणालीत कामांची गती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणं, प्रकल्पांच्या जलद नोंदणीची सुविधा, सर्व परवानग्या आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास सहाय्य इत्यादी सेवांचा यात समावेश असेल, अशी माहिती ऊर्जा विभागाचे प्रमुख सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी येत्या एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान पात्र नागरिकांना मतदार यादीत नावं नोंदवण्याची, आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावं वगळता येणार आहेत. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं, जिंल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी समन्वयानं व्यापक आणि प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहेत. निवडणूक आयोगातर्फे या काळात, विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

****

औरंगाबाद पोलिसांकडून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी १०० हा क्रमांक देण्यात आला होता, पण आता पोलिसांचा क्रमांक बदलला आहे. नागरिकांना पोलिसांच्या मदतीसाठी ११२ क्रमांक लावावा लागणार आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेअंतर्गतही आता मदत पुरवली जाईल. प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शहरातल्या सतरा पोलीस ठाण्यांतल्या कर्मचाऱ्यांना, विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

****

परभणी शहरात कोविड प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आणि गैरसमज दुर करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं जनजागृती केली जात आहे. आयुक्त देविदास पवार आणि मौलाना मुफ्ती हे देखील थेट घरोघरी, बाजारपेठत जाऊन नागरीकांना लसीकरण करुन घेण्याचं आवाहन करत आहेत.

****

श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरात २०० मीटरपर्यंत, सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचं आणि नियमांचं पालन करुन सहकार्य करावं, असं आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदारांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून, सध्या धरणातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातल्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सात दरवाजे आज बंद करण्यात आले. सध्या धरणाच्या आठ दरवाजातून दोन हजार ५३६ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीचा पूर हळूहळू कमी होत आहे.

****

मान्सूनचा परतीचा प्रवास सहा ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. एक जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस झाला, तर राज्यात सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त पाऊस झाला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...