Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता
नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप
कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19 ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोरोना विषाणू संसर्गाशी जिद्दीनं दिलेल्या लढ्याप्रमाणेच स्वच्छ
महाराष्ट्र घडवण्यासाठी लढा देण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यातल्या सरपंचांना
आवाहन
·
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरीव
मदत करणार, असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार- महसूल राज्यमंत्री अब्दुल
सत्तार
·
मराठवाड्यात साडे दहा लाख हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांचं नुकसान,
१७ तलाव फुटले
· शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची रेल्वे राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांचा मागणी
आणि
·
राज्यात तीन हजार ६३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर १४६ बाधित
****
कोरोना
विषाणू संसर्गाशी आपण ज्या जिद्दीनं लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले, त्याच
ईर्षेनं स्वच्छ महाराष्ट्र घडवण्यासाठी लढा द्यावा, असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी राज्यातल्या सर्व सरपंचांना केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानातर्गंत, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं, 'सरपंच
- पाणी आणि स्वच्छता संवाद' उपक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी
राज्यातल्या २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून
संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना, `स्वच्छता
हेच अमृत` हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करण्याचं आवाहनही, त्यांनी यावेळी
केल. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही, त्यामुळे आपलं आयुष्य वाढल्याशिवाय
राहणार नाही, असंही ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गमुक्ती बरोबरच कचरा मुक्त आणि
निरोगी गाव अशा अभियानानं आपण पुढं गेलं पाहिजे, भावी पिढीनं सरपंचाची आठवण काढली पाहिजे
इतकं चांगलं काम आपण करून दाखवावं, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त
केली.
****
अतिवृष्टीमुळे
नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरीव मदत करणार असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत
याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
ते काल नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्यात वीस लाख हेक्टर वरच्या
पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल,
ती सर्व मदत सरकार करणार आहे. काही पैसे केंद्र सरकार कडून येणे बाकी आहे. पन्नास हजार
कोटी त्याच्यामध्ये ३२ हजार कोटी रुपये हे जीएसटीचे आहे. आणि हे एकदा राज्यात आले.
तर निश्चित किंवा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जही घेण्याची परिस्थिती आली तर कर्जही
घेवू परंतू हवालदिल झालेला शेतकरी याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने नेते निर्णय घेतील
आणि किती हेक्टरने द्यायचे आहे नुकसान त्याची घोषणा येणाऱ्या कॅबिनेट पर्यंत होईल.
****
मराठवाड्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १२ लाख चार हजार शेतकऱ्यांच्या
दहा लाख ५६ हजारांहून अधिक हेक्टर्स क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक
अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे,
१७ तलाव फुटले आहेत, तर २९३ ठिकाणी महावीतरणचं नुकसान झालं आहे. सर्वच ठिकाणी मदतकार्य
सुरु असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****
जालना
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या सुमारे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या,
दोन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचं काम महसूल आणि कृषी विभागानं सुरू
केल्याची माहिती, जिल्हा कृषी अधिकारी भास्कर रणदिवे यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर
तालुक्यातल्या बावणे पांगरी, तुपेवाडी आणि अन्य गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या
नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांच्याकडून
नुकसानीचा आढावा घेत, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या
सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे जालना, औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातलं खरिपाचं पिके
उद्ध्वस्त झालं आहे, अशा परिस्थितीत शासनानं पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण करण्याऐवजी,
शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही दानवे यांनी
यावेळी केली.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला
आहे. यात शेती, रस्ते, पूल, तलाव, घरांची पडझड आणि किती जीवित हानी झाली या माहितीचा
समावेश आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या दोन लाख ८८ हजार १३७ शेतकऱ्यांचं नुकसान झालं
आहे, तर दोन लाख ६६ हेक्टर जमीन बाधित झाली आहे. जिल्ह्यातल्या १०९ पुलांची दुरुस्ती
करावी लागणार असून, पाच तलाव फुटले आहेत. दोन व्यक्तीसह ११४ जनावरांचा मृत्यू झाला,
एक हजार ८७ घरांची पडझड झाली, तर ९३ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
****
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाई,
माजलगाव, वडवणी, धारूर, गेवराई या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी
केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, मदतीचं आश्वासन दिलं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाची सर्व दारं काल दुपारी
बंद करण्यात आली असून, पूर्णा नदीला आलेला पूर हळूहळू ओसरेल असं चित्र दिसत आहे. खडकपूर्णा
प्रकल्पातून येलदरी जलाशयात पाण्याची आवक कमी झाल्यानंतर पाटबंधारे खात्यानं सर्व दरवाजे
बंद केले आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या सावंगी खुर्द इथं पुरात अडकलेल्या सहा जणांची काल
सुटका करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात ९९ टक्क्यांच्या वर पाणीसाठा आहे. धरणातून
सध्या ४७ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. नांदेड जिल्ह्यातल्या
डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरणातून सध्या दोन लाख १७ हजार १८१ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
****
राज्यात काल तीन हजार ६३ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५० हजार, ८५६ झाली आहे. काल ५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार
६७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक
१२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार १९८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७१
हजार ७२८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९७ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार, ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १४६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तीन, बीड जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी ४८ नवे रुग्ण आढळले. बीड ३१, लातूर आणि जालना
जिल्ह्यात प्रत्येकी सात, नांदेड तीन, तर परभणी जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले.
हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीना तातडीनं कळवण्याचं आवाहन,
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलं आहे. यंदा सहा लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी पिक
विमा भरुन आपलं पिक संरक्षित केलं आहे. मात्र नुकसानीची माहिती कळवण्याऱ्यांची संख्या
अवघी दोन लाख २७ हजार एवढीच आहे. सरसकट मागणीची दखल सरकार घेईल असा विश्वास व्यक्त
करुन खासदार राजेनिंबाळकर यांनी, भरीव मदत पिकविम्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी आपण
कुठेही कमी पडता कामा नये, यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ भरुन देण्याची
गरज असल्याचं सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा
यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत,
अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष
देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
एकोणिसाव्या
शतकात आदिवासींनी ब्रिटींशाच्या विरोधात गनिमा कावा युद्ध तंत्राचा वापर केला. आदिवासी
जमातीने आपल्या लढ्यातून भारतीयांसमोर एक आदर्श उभा केला असल्याचं मत, पुण्याच्या एस.
एम. जोशी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.दिनकर मुरकुटे यांनी व्यक्त केलं आहे.
आकाशवाणी
औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, ‘ब्रिटीशांच्या विरोधात आदिवासींचा विद्रोह’,
या विषयावर व्याख्यान
देतांना ते बोलत होते. भारतातल्या
आदिवासींनी ज्या पद्धतीनं संघटीतपणे प्रयत्न करुन ब्रिटीश साम्राज्यवादाला विरोध केला
याबद्दल माहिती देतांना ते
म्हणाले….
ब्रिटीश राजवटीचे पुतळे जाळले जात असत
मोठ्या प्रमाणावर आणि मुंडा आदिवासी अगदी उत्साहानं ब्रिटीश राजवटीबद्दलची घृणा उत्पन्न
करणार्या अनेक गितांपैकी या गिताकडे आकर्षित होत असत, आणि ते गीत होतं, ‘कटोंग बाबा
कटोंग, साहेब कटोंग, रारी कटोंग कटोंग’. त्याचा अर्थ होतो,‘कापा बाबा कापा युरोपियनांना
कापा, युरोपियन लोकांनी खांडोळी करा’.‘कटोंग बाबा कटोंग, साहेब कटोंग कटोंग, रारी कटोंग
कटोंग’.
आज सायंकाळी
सहा वाजून ३५ मिनिटांनी
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून त्यांचं हे व्याख्यान प्रसारीत
होणार आहे. आकाशवाणी समाचार औरंगाबाद या युट्युब चॅनेलवरही
श्रोत्यांना हे व्याख्यान ऐकता येईल.
****
हवामान -
येत्या
दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या
काळात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील तर दक्षिण कोकणात तुरळक
ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment