आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ ऑक्टोबर
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून, आज त्यांच्या हस्ते राज्यातल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचं
उद्घाटन होत आहे. वाराणसीसाठी पाच हजार २०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास
प्रकल्पांचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.
****
सर्व राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांमध्ये खाद्यतेलाचा साठा आणि किमतींवरील मर्यादेच्या आदेशावर केलेल्या कारवाईचा,
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग आज आढावा घेणार आहे. खाद्यतेलाच्या किंमती आणि उपलब्धतेवर
विभाग लक्ष ठेवून आहे, खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठवण क्षमतेच्या दोन महिन्यांपेक्षा
जास्त काळ साठा न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचं, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने
सांगितलं.
****
राज्यात विभागीय स्तरावर
कर्करोग रुग्णालयं उभारण्याचा विचार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं
आहे. ते काल जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. स्तनाच्या कर्करोगाचं वाढतं प्रमाण आणि
त्याबाबतच्या जोखीमीचा अहवाल पाहता, हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.
****
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त
लोकांमध्ये एकात्मतेची भावना आणि देशप्रेम जागृत करण्यासाठी सुरू झालेली केंद्रीय राखीव
पोलिस दलाच्या पोलिसांची सायकल फेरी, काल नंदुरबार इथं दाखल झाली. १२ ऑक्टोबर रोजी
गडचिरोली इथून निघालेली ही सायकल फेरी, कालच गुजरातच्या दिशेनं रवाना झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या
येसेगाव इथं ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाअंतर्गत कायदेविषयक आणि जनजागृती
शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं. मजूर आणि शेतमालक यांच्यासंबंधी विविध कायदे, महिलांचे
प्रश्न आदीसंदर्भात शेतकऱ्यांना या कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आलं.
****
सांगली जिल्ह्यात चांदोली
परिसरात काल सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापन केंद्रावर त्याची तीव्रता
दोन पूर्णांक नऊ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. हा धक्का सौम्य स्वरूपात असला तरी
परिसरात तो अधिकवेळ जाणवला. या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही,
वारणा धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment