Tuesday, 2 November 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.11.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि

****

देशानं कोविड प्रतिबंधक सीकरण मोहिमेत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक

·      अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला

·      दिवाळीत बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी काळजी निर्माण करणारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·      हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

·      वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षेचा निकाल जाहीर

·      देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात प्रारंभ

·      राज्यात ८०९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात २८ बाधित

आणि

·      जालन्याचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचं निधन

****

१०० कोटी रूपयांच्या खंडणी वसुल प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल रात्री उशीरा सक्तवसुली संचालनालय - ईडीनं अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले देशमुख अखेर काल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. त्यांना ईडीनं आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावलं होतं. ईडीच्या चौकशीपासून आपल्याला दिलासा मिळावा यासाठी, देशमुख यांनी दाखल केलेली याचिका गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. देशमुख यांच्या विरोधात मुंबईतल्या हॉटेल मालकांकडून शंभर कोटीची वसुली केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

दरम्यान, आपण ईडीला सहकार्य करत नसल्याचं वृत्त चुकीचं असून, ईडीनं छापे टाकले तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबानं पूर्ण सहकार्य केल्याचं, देशमुख यांनी म्हटलं आहे. परमबीर सिंग यांनी आपल्याविरोधात आरोप केले मात्र तेच सध्या फरार असल्याचं देखील देशमुख म्हणाले.

****

अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारा जयदीप राणा याचा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी काल ट्विटरवर प्रसिद्ध केला. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधल्या नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबईत वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून, दिवाळीनंतर याबाबतचे पुरावे जाहीर करणार असल्याचं सांगितलं.

****

दिवाळीच्या निमित्तानं लोक बाजारपेठांमध्ये करत असलेली गर्दी काळजी निर्माण करणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे हे लक्षात ठेऊन कोरोना प्रतिबंधक नियमांचं सक्तीनं पालन करायला हवं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी दिवाळी संमेलनानिमित्त ते काल बातमीदारांशी बोलत होते. संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहेत, मात्र नागरिकांनीदेखील अधिक जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोरोना विषाणूचं स्वरुप सातत्यानं बदलत आहे, अशावेळी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असं ते म्हणाले. कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग मंदावला आहे, नागरिकांनी लस घ्यायला पुढे यावं यासाठी प्रयत्न करायची गरजही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल हज २०२२ ची घोषणा केली. हज २०२२ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२ आहे. कोविड- 19 लसीकरण निकषाच्या आधारे हज यात्रेकरुंची निवड प्रक्रिया होणार असून, सर्व यात्रेकरुंसाठी ई-मसिहा डिजिटल आरोग्य कार्ड अनिवार्य असल्याचं, नक्वी यांनी म्हटलं आहे.

****

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीट निकाल काल जाहीर झाला. राष्ट्रीय परिक्षा संस्था - एनटीएच्या संकेतस्थळावर उमेदवारांना निकाल पाहता येईल, तसंच उमेदवारांना त्यांच्या ईमेलवर देखील निकाल पाठवण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत.  निवडणुकीसाठी शनिवारी ३० ऑक्टोबर सरासरी ६३ पूर्णांक ९५ टक्के मतदान झालं होतं. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुभाष साबणे आणि वंचित बहूजन आघाडीचे उत्तम इंगोले यांच्यासह बारा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

राज्यात काल नवे ८०९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ११ हजार, ८८७ झाली आहे. काल १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार २२६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ९०१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ४८६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १ हजार ५८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २८ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी आठ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात पाच, लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर जालना जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

आज धनत्रयोदशी. निरामय जीवनासाठी आज धन्वंतरी पूजन केलं जातं. काल वसुबारसेला घरोघरी गाय वासराची पूजा करण्यात आली. त्यांना कृतज्ञतापूर्वक औक्षण करून, गोडाचा घास भरवण्यात आला.

****

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचं काल सकाळी औरंगाबाद इथं खासजी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल, ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी त्यांच्या मूळगावी भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव सुतार इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. १९७७ साली जनता पक्षाकडून दानवे यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. निष्कलंक खासदार, तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून ते परिचित होते. दानवे यांच्या पत्नी केशरबाई दानवे यांचं चार दिवसांपूर्वी हृदय विकारानं निधन झालं होतं.

****

आझादी का अमृत महोत्सव निमित्तानं नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात, काल गाजर गवत निर्मुलन तसंच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानात विद्यापीठ तसंच नांदेड शहरातल्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनीही या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

****

 

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यासाठी, शासनाकडून ४२५ कोटी सात लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यापैकी ३५७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी, जिल्ह्यातल्या विविध बँकांकडे वर्ग करण्यात आला असून, दोन दिवसांमध्ये हे अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश, पालकमंत्री राजेश टोपे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

****

लातूर इथं एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह ३८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आमदार पवार यांनी एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आगाराच्या प्रवेशद्वाराला लोखंडी साखळी लाऊन निदर्शनं केली. आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाच्या ७५ टक्के रक्कम थेट बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. सोनपेठचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी ही माहिती दिली. सोनपेठ तालुक्यातल्या ३४ हजार खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम शासनाकडून प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती, चव्हाण यांनी दिली.

****

आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातल्या विंझर इथल्या, अमृतेश्वर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविज्ञालयातले इतिहास विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब केंदळे यांचं, “समाजसुधारणा आणि भारतीय राष्ट्रवाद”, या विषयावरचं व्याख्यान आज आपण ऐकणार आहात. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात सामाजिक, धार्मिक चळवळीला अनन्यसाधारण असं महत्व असून, याकाळातच भारताच्या राष्ट्रवादाला आकार प्राप्त झाल्याचं डॉ केंदळे यांनी नमूद केलं आहे. ते म्हणाले….

भारताच्या सुरुवातीच्या धार्मिक चळवळी लोकांचा धार्मिक दृष्टीकोन अशा पद्धतीनं बदलू पहात होती. की सर्व धर्मियांमध्ये राष्ट्रीय ऐक्य निर्माण होवून स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल आणि जातीव्यवस्था नष्ट करता येईल. राजाराम मोहन रॉय हे समाजसुधारणांचे अग्रणी होते. त्यांनी समाज सुधारणांच्या आणि धार्मिक सुधारणांची  परंपरा भारतामध्ये सुरु केली. महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा स्थापन केली, अस्पृश्यांसाठीही त्यांनी शाळा काढली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, भिमराव आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील,पंडिता रमाबाई, रघुनाथ धोंडो कर्वे इत्यादींनी समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. 

आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून या व्याख्यानाचं प्रसारण होणार आहे. औरंगाबाद ए आय आर न्यूज - आकाशवाणी समाचार औरंगाबाद या युट्यूब चॅनलवरही हे व्याख्यान श्रोत्यांना ऐकता येईल.

****

जालना जिल्ह्यात मिशन कवचकुंडल मोहीमेच्या दोन टप्प्यात साडे पाच लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून, ही समाधानाची बाब असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. जिल्ह्यातल्या कुंभार पिंपळगाव, घोन्सीतांडा, अंबडगाव आणि ढोलखेडा या गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झालं असून, या गावांचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही टोपे यांनी दिल्या.

****

बीड जिल्ह्यातले दुकानदार तसंच व्यावसायिकांनी स्वत:चं आणि आपापल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण करावं, अन्यथा दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशारा, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असून, दुकानदार हे सुपर स्प्रेडर ठरू नये, यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचं पालन करण्याची सूचना त्यांनी केली.

**** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...