Sunday, 30 January 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

 

नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी निकीता जोशी आपलं स्वागत करते

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

ठळक बातम्या

****

** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सर्वपक्षीय बैठक

** सक्त वसुली महासंचालनालयाचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल

** शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुशील खोडवेकरला अटक

** राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ८५ तर कोविड संसर्गाचे २७ हजार ९७१ नवे रुग्ण, मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर दोन हजार ३९५ बाधित

** शहीद दिनानिमित्त महात्मा गांधी यांना देशभर आदरांजली

** आणि**

** राज्यात थंडीची लाट कायम, मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत

****

आता सविस्तर बातम्या

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही उद्या सोमवारी सर्वपक्षीय  बैठक बोलावली आहे. सरकारनंही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळावं यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीला दोन्ही सभागृहातील फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं उद्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. उद्याचं २०२१- २२ वर्षाचं  आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केलं जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करतील. कोविड सुरक्षेशी संबंधित सूचनांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळांमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी १० ते दुपारी आणि लोकसभेचं कामकाज दुपारी ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असेल.

***

सक्त वसुली महासंचालनालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी पूरक आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या आपल्या पसंतीप्रमाणे करण्याविषयी ते आग्रही राहिल्याचं म्हटलं आहे. अशा याद्या बनवून ते अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मुंबई पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्यांशी सल्लामसलतीनं निर्णय घेत असत. उमेदवारांना आपल्या पसंतीच्या स्थळी नियुक्ती वा बदली मिळावी यासाठी त्यांच्याकडून अवैध वसुली होत होती का याविषयी सक्त वसुली संचालनालय तपास करत आहे. यामध्ये १२ भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सचिन वाझेला १६ वर्षांच्या बडतर्फीनंतर पुन्हा मुंबई पोलीस सेवेत घेण्यात आलं. याप्रकरणी देशमुखांचा हात असल्याचा आरोप आहे. अनिल देशमुखांनी मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

***

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी काल भारतीय प्रशासकीय सेवेतील आणखी एक अधिकारी -कृषी विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकरला अटक केली आहे. उद्या सोमवारपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. खोडवेकर  यापूर्वी शिक्षण विभागाचा उपसचिव म्हणून कार्यरत होता. या पदावर असतांना त्याचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचं आढळून आल्यानं त्याला काल अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यासाठी खोडवेकरनं काळ्या यादीमध्ये नाव असलेल्या जीए टेक्नॉलॉजी या कंपनीला शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे याच्या सांगण्यावरुन परीक्षा घेण्याचं कंत्राट पुन्हा दिलं, यासाठी खोडवेकर याला पैसे मिळाल्याचं तपासात उघडकीस झालं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात अटकेत असलेला तुकाराम सुपेचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर हा वेळोवेळी मुंबईत मंत्रालयात जाऊन खोडवेकरची भेट घेत असे, आणि आवश्यक बाबींची पूर्तता करुन घेत असल्याचंही पोलिस तपासात निदर्शनास आलं आहे. पोलिसांनी ठाणे इथल्या राहत्या घरून खोडवेकरला काल ताब्यात घेतलं.

या प्रकरणी यापूर्वी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनीकुमार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम नामदेव सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसंच संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली आहे.

***

पुणे जिल्ह्यात कोविड संसर्गाचं प्रमाण कमी झालं असल्यानं कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते काल बोलत होते. इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करावेत, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत, विद्यार्थी शाळेत देखील मास्कचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावं, असं त्यांनी सांगितलं. पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तसंच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा, त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

***

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले ८५ रुग्ण आढळले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ४५ तर मुंबईतील ३९ रुग्णांचा समावेश आहे. एक रुग्ण अकोला जिल्ह्यातील आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता तीन हजार १२५ एवढी झाली असून, यापैकी एक हजार ६७४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

***

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २ हजार ९७१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७६ लाख ८३ हजार ५२५ झाली आहे. काल ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ५२२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८ शतांश टक्के आहे. काल ५० हजार १४२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७२ लाख २ हजार ७९१ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक १ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ४४ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

***

मराठवाड्यात काल दोन हजार ३९५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तसंच लातूर आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका  रुग्णाचा समावेश आहे,

औरंगाबाद जिल्ह्यात काल ६२६ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ४५३ तर ग्रामीण भागातले १७३ रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ४०६, नांदेड ३८१, उस्मानाबाद ३०८, बीड जिल्ह्यात २३२, परभणी २१५, जालना १४६ आणि हिंगोली जिल्ह्यात ८१ रुग्णांची नव्यानं नोंद झाली.

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८५ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी साडेअकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल. तसंच मायजीओवी डॉट इन या संकेत स्थळावर आणि न्यूज ऑन ए आय आर या अॅपवरही या कार्यक्रमाचं थेट प्रसारण असेल.

***

महात्मा गांधी यांच्या ७४ व्या पुण्यतिथी निमित्त पाळण्यात येणाऱ्या शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय फिल्म्स डिव्हिजन गांधीजींना आदरांजली वाहणार आहे. फिल्म्स डिव्हिजनचं संकेतस्थळ आणि यूट्यूब वाहिनीवर गांधी रिडिस्कव्हर्डहा माहितीपट दाखवला जाणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय कडून होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत या चित्रपटाचं  विशेष प्रक्षेपण केलं जाणार आहे.  वैयक्तिक दृष्ट्या आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता यावर आधारित स्वदेशीचा वापर या महात्मा गांधी यांच्या तत्वावर या चित्रपटात भर दिला आहे फिल्म्स डिव्हीजन डॉट ओ आर जी  या संकेतस्थळावर आज २४ तास या माहितीपटाचं  प्रक्षेपण होणार आहे.

औरंगाबादमध्ये  महात्मा गांधी मिशन -एमजीएमच्यावतीनं आज प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडेनऊ वाजता एमजीएम परिसरातील चिंतनगाह इथं ही सभा होईल. यावेळी एमजीएम गायक वृंदांच्या वतीनं बापूंना सांगितीक आदरांजली अर्पण केली जाईल. तसंच ११९ देशात महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ जारी केलेल्या टपाल तिकीटांच्या संकलनाचं प्रकाशन या वेळी करण्यात येणार आहे.

***

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या केलेल्या कार्यक्रमांचं २ ते ३ मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडीओ, छायाचित्र आणि इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर हॅशटॅग नई तालीम 2022चा वापर करून अपलोड करावा. तसंच त्या पोस्टची लिंक शालेय शिक्षण विभागाच्या संकेत स्थळावर पाठवावी.  शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

 

हुतात्मा दिनानिमित्त आज देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली जाणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठं तसंच विद्यार्थी आणि सामान्य  नागरिकांनीही या मौनमध्ये सहभागी व्हावं असं सामान्य प्रशासन विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. 

***

राज्यात थंडीची लाट कायम आहे. परभणी इथं काल सर्वात निचांकी ५ पूर्णांक  ६ दशांश तापमानाची नोंद झाली. यावर्षीचं हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या हवामान खात्यानं दिली आहे. तर त्यापाठोपाठ औरंगाबाद इथं ८ अंश सेल्सिअस आणि लातूर इथं ८ पूर्णांक ६ दशांश सेल्सीयश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात सर्वदूर थंडीची लाट पसरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या थंडीमुळे ताप, सर्दी, खोकला आदी तक्रारी घेऊन रुग्ण मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल होत आहेत.

***

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील बोरगाव आणि दोन गावं नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. एक कोटी ४० लाख ९३ हजार रूपयांची ही योजना आहे. येत्या तीन महिन्यात या योजनेचं काम पुर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील जांब खुर्दच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकासही राज्य शासनानं मान्यता प्रदान केली आहे. ५१ लाख ७४ हजार रुपयांची ही पाणीपुरवठा योजना नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पुर्ण केली जाणार आहे. योजनेचं काम पुर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत ती ग्रामपंचायतला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

***

उस्मानाबाद जिल्ह्यात  कळंब तालुक्यातील २८ गावांतील ३० किलोमीटर लांबीच्या शेत- पाणंद रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारच्या नियोजन विभागानं मंजुरी दिली आहे. अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली. मातोश्री गामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गंत ही काम केली जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून शेतरस्त्यांची तर ग्रामस्थांकडून पाणंद रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी वारंवार केली जात होती.

***

 

No comments: