Saturday, 29 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भात कोणतेही निकष निश्चित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार,  अपुऱ्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी गोळा करण्यास राज्य बांधील- न्यायालयाचं स्पष्टीकरण

·      भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाडून रद्द

·      शिक्षक पात्रता परीक्षा २०२०मध्ये सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचा प्रकार उघडकीस

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ११० तर कोविड संसर्गाचे २४ हजार ९४८ नवे रुग्ण, मराठवाड्यात नऊ जणांचा मृत्यू तर दोन हजार ७३२ बाधित

·      'औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी अभियानास प्रारंभ

·      आध्यात्मिक गुरु सामाजिक कार्यकर्ते भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन आरोपींना सहा वर्षांची कारावासाची शिक्षा

आणि

·      उस्मानाबाद जिल्ह्यातील मुद्रा योजना तसंच महिला बचत गटांचे कर्ज प्रस्ताव त्वरित निकाली काढण्याच्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांच्या सूचना

****

शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या उमेदवारांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात कोणतेही निकष निश्चित करण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. या संदर्भात संबंधित राज्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या अपुऱ्या प्रतिनिधित्वाची आकडेवारी गोळा करण्यास बांधील, असल्याचं न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या पीठानं स्पष्ट केलं. पदोन्नतीमधल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. आरक्षण देण्यासाठी आकडेवारी गोळा करतांना त्यासाठी केडर हा निकष ठेवला पाहिजे. अशी आकडेवारी ही संपूर्ण संवर्ग किंवा गटाशी संबंधित म्हणून गोळा करू नये, पदोन्नती ही ज्या पद किंवा श्रेणीसाठी आहे त्यासाठी आकडेवारी गोळा केली जावी अशी सूचनाही न्यायालयानं केली. जर आकडेवारी संपूर्ण सेवेशी संबंधित असेल तर ती निरर्थक असेल असंही न्यायालयानं नमूद केलं.

****

भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. इतर मागासवर्गीयांचं- ओबीसी राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं आहे. अशाप्रकारच्या निलंबनामुळे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना ६० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित करणं म्हणजे बडतर्फ केल्यासारखं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत, न्यायालयाचे आभार मानले आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर विधीमंडळाचे अधिकार आणि न्यायालयाचा आदेश याबाबत विधीमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. १२ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा विधीमंडळाचा होता, राज्य सरकारचा नाही, असंही मलिक यांनी सांगितलं.

****

शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी-२०२०मध्ये सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  २०१९-२०२० मध्ये राज्यातल्या १६ हजार ७०५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली होती. त्या सर्व उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. या तपासणीत सात हजार ८८० अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, यांच्यासह जवळपास ३५ जणांना आतपर्यंत अटक करण्यात आली आहे. अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग तसंच राज्य शासानाकडे सादर करण्यात येणार असून याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले ११० रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता तीन हजार ४० एवढी असून, यापैकी एक हजार ६०३ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****


राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २४ हजार ९४८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७६ लाख ५५ हजार ५५४ झाली आहे. काल १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ४६१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल ४५ हजार ६४८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७२ लाख ४२ हजार ६४९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६६ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल दोन हजार ७३२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, बीड दोन तर हिंगोली तसंच जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे,

औरंगाबाद जिल्ह्यात काल ६८७ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ४९३ तर ग्रामीण भागातले १९४ रुग्ण आहेत. परभणी ६५४, नांदेड जिल्ह्यात ३५३, लातूर ३२६, बीड जिल्ह्यात १५०, उस्मानाबाद १७२, जालना २८२ आणि हिंगोली जिल्ह्यात १०८ रुग्णांची नव्यानं नोंद झाली.

****

औरंगाबाद महानगरपालिकाअंतर्गत सर्व शाळांचे ८ वी, ९वी तसंच ११ वीचे वर्ग परवा सोमवारपासून सुरू होणार आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी काल या संदर्भातले आदेश जारी केले. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं आवश्यक असून, १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांनीही लसीची पहिली मात्रा घेतलेली असणं आवश्यक असणार आहे. सर्वांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

परभणी जिल्ह्यातल्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा तसेच निवासी शाळाही  सोमवारपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मान्यता दिली आहे. याबाबत काल नव्याने आदेश जारी करण्यात आले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या उद्या प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उद्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्यानंतर अकरा वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, मन की बात चा हा ८५ वा भाग असेल.

****

औरंगाबाद शहर आणि मराठवाडा विभागात पर्यावरण पूरक इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी, मराठवाडा ऑटो क्लस्टरनं 'औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी (ईव्ही),' या अभियानाची सुरवात केली आहे. औरंगाबाद शहर हे महाराष्ट्र राज्यातील आघाडीचं औद्योगिक उत्पादन आणि ऑटोमोबाईल हब म्हणून नावारूपास आलेलं आहे, या अभियानाच्या मदतीनं ईव्ही हब बनण्यास प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती ऑटो क्लस्टरचे संचालक आशिष गर्दे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी उपक्रमात, नवीन तंत्रज्ञानासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करून, सार्वजनिक ठिकाणी सुलभ प्रवेशासह २० हून अधिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचं गर्दे यांनी सांगितलं.

****

आध्यात्मिक गुरु आणि सामाजिक कार्यकर्ते भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर इथल्या न्यायालयानं तीन आरोपींना दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये भय्यू महाराजांचा सेवक विनायक दुधाळे, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक यांचा समावेश आहे. हे तिघं पैशासाठी महाराजांचा छळ करत असल्याचं तसंच त्यांनी महाराजांना ब्लॅकमेल केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. १२ जून २०१८ रोजी महाराजांनी कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली साडे तीन वर्ष चाललेल्या या प्रकरणात, न्यायालयानं ३२ जणांची साक्ष नोंदवली, तसंच १५० पुरावे तपासून तिघा दोषींना सहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली कर्ज प्रकरण तसंच महिला बचत गटांचे कर्ज प्रस्ताव त्वरित निकाली काढण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्या आहेत. आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हा बाहेर काढण्यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत  डॉक्टर कराड दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जिल्ह्यातल्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास यासह पायाभूत सुविधांचा कराड यांनी यावेळी आढावा घेतला. किसान क्रेडिट कार्ड योजना, तसंच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी अर्थसहाय्य करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट इथं उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सिटी स्कॅन मशिन खरेदीसाठी तीन कोटी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक उप आदिवासी  योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधी वाटपाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी काढले आहेत.

****

नागरिकांनी चांगले आरोग्य आणि प्रतिष्ठेसाठी स्वच्छतागृहाचा नियमित वापर करण्याचं आवाहन परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. टाकसाळे यांच्या हस्ते काल सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव इथं सार्वजनिक स्वच्छतागृहाचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

****

राज्य परिवहन महामंडळांतर्गत काल परभणी विभागात अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले. काल  परभणी विभागात ६ आगारातून १७८ बसेसच्या फेऱ्या झाल्या. त्यातून साडे पाच हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण -म्हाडा ची तांत्रिक तसंच अतांत्रिक संवर्गातली ५६५ पदं भरण्याकरता सरळ सेवा भरतीद्वारे ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ३१ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

****

 

No comments: