Thursday, 27 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या भारत आणि मध्य आशियाई देशांच्या शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय मुद्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

****

ड्रोनचं प्रमाणीकरण सोपं, वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारनं ड्रोन प्रमाणपत्र योजना अधिसूचित केली आहे. सुविधाजनक केलेले ड्रोन नियम, हवाई क्षेत्राचा नकाशा, पी आय एल योजना आणि सिंगल विंडो डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म यामुळे भारतातल्या ड्रोन उत्पादनाला मदत होईल, असं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

राज्यातल्या महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग एक फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना या वर्गांना हजेरी लावता येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

****

राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. यात वकील गौरी छाब्रिया, वकील संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका चव्हाण, आभा पांडे आणि उत्कर्षा रुपवते यांचा समावेश आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, राज्य शासनानं नुकतीच याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

****

प्रख्यात शाहीर मेघराज बाफना यांचं काल नाशिक इथं अल्पशा आजारानं निधन झालं; ते ८४ वर्षांचे होते. बाफना यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम केलं होतं. लोककलेच्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांचा राज्य शासनातर्फे गौरव करण्यात आला होता.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरात राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातल्या कर्मचाऱ्यांनी काल भिक्षा आंदोलन केलं. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. आजच्या आंदोलनातून जमा झालेले पैसे निषेध नोंदवण्यासाठी प्रशासनाला पाठवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल ९५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ६७५, तर ग्रामीण भागातले २८३ रुग्ण आहेत.

****

No comments: