Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
देशाच्या अनेक
भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि
१५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी
कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच
चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन
क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
देशाचा
आर्थिक विकास दर साडे आठ टक्के राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त.
·
राष्ट्रपतींच्या
अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ; उद्या अर्थसंकल्प.
·
दहावी
तसंच बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णया विरुध्द विद्यार्थ्यांचं राज्यभरात
आंदोलन.
आणि
·
पंतप्रधान
आवास योजनेत शासकीय पैशांचा गैरवापर तसंच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा केल्याचा
खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप.
****
चालू आर्थिक वर्षात देशाचा
आर्थिक विकास दर साडे आठ टक्के राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त
करण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांनी लोकसभा तसंच राज्यसभेसमोर आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यात
देशाचा आर्थिक विकास दर आठ ते साडे आठ टक्के राहणार असल्याचं म्हटलं आहे. हा अहवाल
लोकसभा सदस्यांनी संसदेच्या डिजिटल ॲपवर पाहण्याचं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
यांनी केलं आहे.
त्यापूर्वी आज सकाळी राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला.
सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था
झाल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाने
साथ रोगाविरुद्धच्या लढ्यात भारताची क्षमता सिद्ध केल्याचं सांगत, संपूर्ण जगाला महामारीपासून
मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात भारतीय लस महत्त्वाची भूमिका बजावत
असल्याचं, राष्ट्रपती म्हणाले.
या लढ्यात आरोग्यसेवा आणि
आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.
दरम्यान, उद्या एक फेब्रुवारीला
सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या
वर्षीप्रमाणेच यंदाही संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज दोन सत्रांमध्ये होणार आहे. आगामी
२ ते ११ फेब्रुवारी या पूर्वार्धात दोन्ही सभागृहांचं प्रत्येकी ५ तास कामकाज होईल.
राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ तर लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत
चालणार आहे.
अधिवेशनापूर्वी संसद परिसरात
बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचं असून,
लोकांसाठी जास्तीत जास्त फलद्रुप करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण मोहिमेनं १६६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या लसीच्या १६६
कोटी तीन लाख ९६ हजार २२७ मात्रा देण्यात आल्या आहेत. तर एक कोटी १८ लाख ५८ हजार १९०
पात्र नागरिकांनी आतापर्यंत कोविड लसीचा बूस्टर डोस घेतला आहे.
****
राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर
१५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज कराड इथं पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर राज्यात
कोविडचा आढावा आणि कुलगुरूंशी चर्चा करून पुढील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेल्या नाहीत. त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल, असेही
त्यांनी सांगितलं.
****
राज्यात इयत्ता दहावी आणि
बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णया विरुध्द आज औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे,
मुंबई, नागपूर, अकोला इथं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. कोविड काळात ऑनलाइन शिक्षण
देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण तसंच मागास भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने
शिक्षण घेता आलेलं नसल्यानं, दहावी तसंच बारावीच्या परीक्षा यंदा रद्द करण्याची मागणी
विद्यार्थ्यांनी केली आहे. पुढील वर्षी ऑफलाईन शाळा सुरू केल्यानंतरच परीक्षा घ्यावात,
असं या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज
भरण्यासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत आज संपणार
होती, मात्र कोविड काळात कोणताही विद्यार्थी सदर अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी
हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. पवार यांनी आज ट्वीट करून ही माहिती दिली. आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पवार यांनी आभार मानले आहेत.
****
पंतप्रधान आवास योजनेत शासकीय
पैशांचा गैरवापर तसंच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा केल्याचा आरोप खासदार
इम्तियाज जलील यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मार्च
२०२२ ला मुदत संपत असलेल्या या योजनेसाठी औरंगाबाद शहरातल्या ८० हजार ५१८ गोरगरीब नागरिकांनी
२०१६ मध्ये प्रस्ताव सादर केले होते, गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने फक्त
३५५ लाभार्थी म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला, ही बाब
शहरासाठी लाजीरवाणी असल्याचं खासदार जलील म्हणाले. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च
करून, प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा होत आहे. याचा लोकसभेत
थेट पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात
एकाही किराणा दुकानात, सुपर शॉपी किंवा मॉल्समध्ये वाईनची विक्री करु देणार नसल्याचा
इशारा खासदार जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी
घेत असल्याचा राज्य सरकारचा दावा असेल, तर सरकारने गांजाच्या शेतीलाही परवानगी द्यावी,
अशी उपहासात्मक मागणी खासदार जलील यांनी यावेळी केली.
****
वीज महावितरणच्या कृषीपंप
वीज देयकात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता फक्त दोन महिने उरले आहेत. येत्या
३१ मार्चला या सवलत योजनेची मुदत संपणार असून, एप्रिलपासून थकीत देयकात फक्त ३० टक्के
माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी
तसंच चालू देयकं भरून ५० टक्के माफी मिळवावी, असं आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात
आलं आहे.
****
लातूर तालूक्यातील भिसे वाघोली
शिवारात काल शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत जवळपास ७० एकरावरचा उभा ऊस खाक झाला. जवळपास
२० शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना
तातडीनं मदत मिळावी यासंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी महसूल आणि
महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या २६
पपई उत्पादक शेतकऱ्यांची उत्तर प्रदेश इथल्या व्यापाऱ्यानं ४६ लाख रुपयांची फसवणुक
केली आहे. शेतकऱ्यांकडून पपई खरेदी केल्यानंतर आठ दिवसात पैसे देण्याच सांगत हा व्यापारी
पसार झाला आहे. सरफराज चौधरी असं या व्यापाराचं नाव असून त्याच्या विरुध्द फसवणुकीचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज
इथं अडीच कोटीचं रक्त चंदन पोलिसांनी जप्त केलं आहे. एक टन रक्त चंदन बंगळूरुहून कोल्हापूरला
नेलं जात असताना, पोलीसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात
आली असून, यामुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे
****
मराठी पत्रकार परिषदेच्या
अंबाजोगाई शाखेचे पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता
पुरस्कार आष्टी इथले पत्रकार सचिन पवार यांना तर मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पुरस्कार
परळी वैद्यनाथ इथले पत्रकार प्रवीण फुटके यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान
चिन्न आणि एक हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
परभणी जिल्ह्यात जल जीवन
मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन
ग्रामीण आणि टेक्नोस्पर्ट ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवशीय
प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना पाण्याची
गुणवत्ता, जलस्त्रोतांची देखरेख तसंच सर्वेक्षण, लोकसहभाग समीक्षण, आदी प्रशिक्षण देण्यात
आलं.
****
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची
शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला राज्यात काही ठिकाणी
पाऊस पडेल, तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. वातावरणातल्या या बदलामुळे शेतीचं
नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
****
No comments:
Post a Comment