Sunday, 30 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं उद्यापासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ.

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ७४ व्या स्मृती दिनानिमित्त देशभर आदरांजली.

·      कोविड-19च्या तिसऱ्या लाटेचा देश यशस्वीपणे सामना करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून समाधान व्यक्त.

·      देशातल्या ७५ टक्के पात्र लाभार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण.

आणि

·      मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू.

****

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होईल. २०२१-२२ वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण उद्या संसदेत सादर केलं जाणार आहे. मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. कोविड नियमांमुळे दोन्ही सभागृहांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दोन फेब्रुवारीपासून राज्यसभेचं कामकाज सकाळी १० ते दुपारी ३ तर लोकसभेचं कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असेल.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या स्मृती दिनानिमित्त आज संपूर्ण देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली इथं राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना अभिवादन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांधीजींना पुष्पार्पण करुन आदरांजली वाहीली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे, नौदल प्रमुख आर हरी कुमार, हवाईदल प्रमुख एयर मार्शल विवेक राम चौधरी यांनीही राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहिली.

आज या निमित्त सर्वधर्मिय प्रार्थनासभा आयोजित केली होती. हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो. त्यानिमित्त आज सकाळी ११ वाजता सर्वांनी दोन मिनिटं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली.

 

****

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही गांधीजींना आदरांजली वाहिली. शांतता आणि अहिंसा यांचे अग्रदूत असलेले गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या भविष्याला आकार देण्यात गांधीजी यांनी मोठी भूमिका बजावली. गांधीजींचं आयुष्य, त्यांच्या अभिनव कल्पना आणि निस्वार्थीपणा मानवतेला प्रेरणा देत राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. एकत्रित, बंधुभाव नांदणारा, स्वावलंबी, स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण भारताच्या उभारणीचा संकल्प प्रत्येकानं करावा, असं आवाहन नायडू यांनी या ट्विटर संदेशात केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपली लोकशाही आणखी बळकट व्हावी, यासाठी महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसा, समता-बंधुता या तत्वज्ञानाचे पदोपदी स्मरण व्हावं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधी ही व्यक्ती नसून विश्वशांती मानव कल्याणाचा विचार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबादमध्ये महात्मा गांधी मिशन-एमजीएम विद्यापीठात ‘अहिंसेचे तत्वज्ञान’ या विषयावर प्राध्यापक जयदेव डोळे यांचं व्याख्यान झालं. यावेऴी एमजीएमच्या संगीत विभागाच्या गायकवृंदाने सर्वधर्म प्रार्थना आणि भजनांच्या माध्यमातून हुतात्म्यांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ जगभरातील ११९ देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांच्या संकलित पोस्टरचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.

****

कोविड-19च्या तिसऱ्या लाटेचा देश यशस्वीपणे सामना करत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ८५ व्या भागात देशवासियांशी संवाद साधतांना ते आज बोलत होते. लसीकरण मोहिमही यशस्वीरित्या पार पडत असून आतापर्यंत देशातल्या साडे चार कोटी किशोरवयीन मुलांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लसी दिल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ तीन ते चार आठवड्यात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या साठ टक्के युवकांना लसी देण्यात आल्या आहेत, यामुळे देशातले तरुण सुरक्षित तर राहणारच आहेत त्याचबरोबर त्यांना आपला अभ्यासही व्यवस्थित सुरु ठेवण्यास मदत होईल असं पंतप्रधानांनी नमूद केलं. देशभरातल्या एक कोटीहून अधिक मुलांनी मन की बात पोस्ट कार्डच्या माध्यमातून संदेश पाठवल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

****

देशातल्या ७५ टक्के पात्र लाभार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण झालं असून, ‘सबका साथ सबका प्रयास’ या मंत्रामुळे भारताला हे उद्दिष्ट गाठता आलं, असं ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. जनतेनं कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करावं आणि शक्य तितक्या लवकर लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल देशातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असं त्यांनी ट्विटर संदेशामध्ये म्हटलं आहे.

****

राज्य मास्कमुक्त करण्याचा कोणताही विचार नाही. युरोपमधल्या राष्ट्रांनी मास्क बाबत जो निर्णय घेतला आहे, त्यावर अभ्यास करून नंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. टोपे यांनी आज पंढरपूर इथं विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्या राज्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्या कोरोना विषाणू मुक्त झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर कार्ल्याजवळ आज पहाटे झालेल्या एका अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या मोटारीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुभाजक ओलांडून ती मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या कंटेनरखाली घुसली. या अपघातात मोटारीतल्या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

****

ऊसाच्या बिलातून शेतकऱ्यांची थकित विज बील वसुली होऊ देणार नाही, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे इथं बोलत होते. राज्य शासनाच्या अशा प्रकारे वीज बिल वसूल करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत शेतकऱ्यांकडून ही वीज बिल वसुली केली तर भाजपतर्फे आंदोलन केलं जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत प्राथमिक स्तर पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तर आठवी परीक्षेसाठी नव्यानं प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारी पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. असं मंडळानं कळवलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित असून ही शिष्यवृत्ती परीक्षा दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यानंतरच होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. येत्या २० फेब्रुवारीला ही परीक्षा घेतली जाणार होती.

****

कोरोना काळात अन्य राज्यातील रुग्णालयात मृत पावलेल्या महाराष्ट्रातील रुग्णाच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळावा, अशी मागणी सिंधुदुर्गमधल्या युवा सेनेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन काल सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे देण्यात आलं. कोविड काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोवा राज्यातील रुग्णालयांमध्ये दाखल व्हावं लागलं होतं. त्यावेळी अनेक रुग्ण गोवा इथल्या रुग्णालयात मृत झाले, अशा रुग्णांना या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.

****

नाशिकचे माजी उपनगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तसंच उत्कृष्ट छायाचित्रकार अण्णा लकडे यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

No comments: