Saturday, 29 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काल चोवीस तासात देशभरात ५६ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. यासह देशात आतापर्यंत १६५ कोटी ०४ लाख लोकांना लसी देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या लसींच्या १२ कोटी ८८ लाख मात्रा उपलब्ध असल्याची माहितीही मंत्रालयानं दिली आहे.

****

देशभरात काल कोरोना विषाणू संसर्ग झालेले २ लाख ३५ हजार नवे रुग्ण आढळून आले. सध्या देशात २० लाख ४ हजार ३३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्या चोवीस तासात ३ लाख ३५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९३ शतांश ८९ टक्के असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. देशात आतापर्यंत ७२ कोटी ५७ लाखांहून अधिक रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली आहे.

****

पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा आणि महाविद्यालयं सुरु होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. शाळा जरी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल. पालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल. नववी इयत्तेपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील, असं ते म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण शाळेतच करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. फिरत्या मोबाईल व्हॅनच्या मदतीनं लसीकरण मोहिम राबवण्यात येईल. दहावी आणि बारावीच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबतचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील, असं ते म्हणाले.

एक हजार चौरस फुटांचं दुकान तसंच मॉल मधून वाईन विक्रीस परवानगी देण्याबाबत बोलतांना पवार यांनी वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी द्राक्ष, काजूपासून वाईन तयार करतात. ही वाईन म्हणजे दारू नाही. त्यातच आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचं प्रमाणही अतिशय अल्प आहे. जेवढी तयार होते, तेवढी विक्री आपल्याकडे होत नाही. बहुतांशी वाईन ही इतर राज्यांत आणि काही परदेशात निर्यात होते. पण काही लोकांनी जाणीवपूर्वक मद्यराष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिल्याचं पवार म्हणाले.

****

सुरत-जळगाव रेल्वे मार्गावर नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम पुरी जलद गाडीतल्या उपहारगृहाच्या डब्याला आज सकाळी भीषण आग लागली. गाडीतील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं. नंदुरबार रेल्वे स्थानकात गाडी शिरत असताना तिला आग लागल्याचं लक्षात आलं, त्यानंतर तात्काळ गाडी थांबवून उपहारगृहाचा डबा वेगळा करण्यात आला, दीड तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं.  घटनेनंतर जवळपास दोन तास सुरत-जळगाव रेल्वे मार्गावरील मुख्य विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या थांबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हुतात्मा दिनानिमित्त उद्या देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली जाणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठं तसंच विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनीही या मौनमध्ये सहभागी व्हावं असं सामान्य प्रशासन विभागातर्फे कळवण्यात आलं आहे. 

****

कोविड-19 मुळे सुरु झालेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि राज्यातल्या ९ शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह इथं सामंजस्य करार करण्यात आले. देशाच्या विकासाला गती देण्यात मोठी भूमिका निभावणाऱ्या युवा पिढीचे मानसिक आरोग्य संभाळणं गरजेचं आहे, त्यामुळे या शैक्षणिक संस्थांनी बदललेली जीवनशैली, विद्यार्थ्यांचे करिअर, मानसिक आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, आदींविषयी मार्गदर्शन करावं असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. सामंजस्य करारामध्ये आयसीटी मुंबई, डॉ.आंनद नाडकर्णी यांची आयपीएच, डॉ.हमीद दाभोळकर यांची परिवर्तन ट्रस्ट, एसएनडीटी विद्यापीठ, सेंट झेविअर्स कॉलेज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, डेक्कन इस्टिट्यूट, पुणे आदी संस्थांचा समावेश आहे.

****

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांना घेता यावा यासाठी, मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातली कागदपत्रं आणि माहिती परवा ३१ जानेवारीपर्यंत बँकांकडे जमा करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केलं आहे

****

No comments: