Friday, 28 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

विधानसभेत गदारोळ केल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी करण्यात आलेलं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलं आहे. न्यायालयानं आज याबाबतचा निर्णय दिला. या निलंबनाच्या मुद्द्यावरुन विधानसभेत भाजपानं अनेकदा गदारोळ केल्यानं संसदेचं कामकाज ही अनेक वेळा तहकुब करावं लागलं आहे.

****

देशातल्या वयस्क नागरिकांसाठी ‘कोवॅक्सिन’ आणि ‘कोविशील्ड’ या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींना औषध म्हणून मान्यता मिळाली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं काल ही मान्यता दिली. यापूर्वी या लसींच्या केवळ अत्यावश्यक परिस्थितीत वापराची परवानगी होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे.

****

जानेवारी २०२३ मध्ये वयाची १५ वर्ष पूर्ण करणारी मुलंही कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी पात्र आहेत, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अतिरिक्त सचिव विकास शील यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. जानेवारी २०२३ मध्ये किंवा त्यापूर्वी वयाची ६० वर्ष पूर्ण करणारे नागरिक वर्धक मात्रा घेऊ शकतात, असंही या पत्रात म्हटलं आहे.

****

देशातल्या ९५ टक्के वयस्क नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्यात आली असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी एका ट्वीट संदेशाद्वारे देशाचं अभिनंदन केलं आहे.

****

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचं त्यांनी काल समाज माध्यमातून जाहिर केलं आहे. ते नांदेड इथल्या विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.

****

No comments: