Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जानेवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा
वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या
सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या
उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा.
कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३
९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
** शिक्षक पात्रता परीक्षा
घोटाळा प्रकरणी कृषी विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकरला अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
** पुण्यात १ फेब्रुवारीपासून
शाळा आणि महाविद्यालयं सुरु, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांना
घेण्यास मुभा
** दहावी आणि बारावीच्या
परिक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही चर्चा नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार
आणि
** बीड जिल्ह्यात बोरगाव
तसंच नांदेड जिल्ह्यातील जांब खुर्दच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास
राज्य शासनाची मान्यता
****
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा
प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आज भारतीय प्रशासकीय सेवेतील आणखी एक अधिकारी -कृषी विभागाचे
उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. त्यांना परवा ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
सुनावण्यात आली आहे. खोडवेकर हे यापूर्वी शिक्षण विभागाचे उपसचिव म्हणून कार्यरत होते.
या पदावर असतांना त्यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचं आढळून आल्यानं आज त्यांना
अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यासाठी खोडवेकर यांनी काळ्या यादीमध्ये
नाव असलेल्या जीए टेक्नॉलॉजी या कंपनीला शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपे
याच्या सांगण्यावरुन परीक्षा घेण्याचं कंत्राट पुन्हा दिलं, यासाठी खोडवेकर याला पैसे
मिळाल्याचं तपासात उघडकीस झालं आहे. त्याचबरोबर या प्रकरणात अटक असलेला तुकाराम सुपेचा
तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर हा वेळोवेळी मुंबईत मंत्रालयात जाऊन खोडवेकरची भेट
घेत असे, आणि आवश्यक बाबींची पूर्तता करुन घेत असल्याचंही पोलिस तपासात निदर्शनास आलं
आहे. पोलिसांनी ठाणे इथल्या राहत्या घरून खोडवेकरला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणी यापूर्वी राज्य
परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक
अश्विनीकुमार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम नामदेव सुपे, तांत्रिक
सल्लागार अभिषेक सावरीकर तसंच संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली आहे.
****
पुण्यात १ फेब्रुवारीपासून
शाळा आणि महाविद्यालयं सुरु होत आहे, मात्र विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय
पालकांनी घ्यायचा आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते आज पुण्यात
वार्ताहरांशी बोलत होते. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल तर नववी इयत्तेपासून
पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील, असं ते म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील मुलांचं
लसीकरण शाळेतच करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मोबाईल व्हॅनच्या मदतीनं
ही लसीकरण मोहिम राबवण्यात येईल. दहावी आणि बारावीच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणतीही
चर्चा झाली नाही. याबाबतचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील, असं ते म्हणाले.
एक हजार चौरस फुटांचं दुकान
तसंच मॉल मधून वाईन विक्रीस परवानगी देण्याबाबत बोलतांना पवार यांनी वाईन आणि दारू
यात जमीन-आस्मानाचा फरक असल्याचं स्पष्ट केलं. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी द्राक्ष
तसंच काजूपासून वाईन तयार करतात. ही वाईन म्हणजे दारू नाही, असं सांगून शेतकऱ्यांच्या
हिताच्या दृष्टीनं तिच्या विक्रीस परवानगी देण्यात आल्याचं ते म्हणाले. आपल्याकडे वाईन
पिणाऱ्यांचं प्रमाणही अतिशय अल्प आहे. बहुतांशी वाईन ही इतर राज्यांत आणि काही परदेशात
निर्यात होते. पण काही लोक जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र म्हणून राज्याची बदनामी करत असल्याचं
ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
उद्या प्रसारीत होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. महात्मा
गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्यानंतर अकरा वाजून ३० मिनिटांनी हा कार्यक्रम
सुरू होईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, मन की बात चा हा ८५
वा भाग असेल.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील
बोरगाव आणि दोन गावं नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य शासनानं मान्यता
दिली आहे. एक कोटी ४० लाख ९३ हजार रूपयांची ही योजना आहे. येत्या तीन महिन्यात या योजनेचं
काम पुर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील जांब
खुर्दच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकासही राज्य शासनानं मान्यता प्रदान
केली आहे. ५१ लाख ७४ हजार रुपयांची ही पाणीपुरवठा योजना नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा
विभागामार्फत पूर्ण केली जाणार आहे. योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर एक महिन्याच्या आत
ती ग्रामपंचायतला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
****
सुरत- जळगाव रेल्वे मार्गावर
नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधी धाम- पुरी या जलद रेल्वे गाडीतल्या उपहारगृहाच्या
डब्याला लागलेली आग दीड तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणण्यात यश आलं. गाडीतील
सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं. नंदुरबार रेल्वे स्थानकात
गाडी शिरत असताना तिला आग लागल्याचं लक्षात आलं, त्यानंतर तात्काळ गाडी थांबवून उपहारगृहाचा
डबा वेगळा करण्यात आला, या घटनेनंतर जवळपास दोन तास सुरत -जळगाव रेल्वे मार्गावरील
मुख्य विद्युत पुरवठा बंद राहिला. यामुळे या मार्गावरील अनेक गाड्या थांबवण्यात आल्या
होत्या, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हुतात्मा दिनानिमित्त उद्या
देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली जाणार आहे. सर्व शासकीय,
निमशासकीय कार्यालयं, आस्थापना, शैक्षणिक संस्था, विद्यापीठं तसंच विद्यार्थी आणि सामान्य
नागरिकांनीही या मौनमध्ये सहभागी व्हावं असं सामान्य प्रशासन विभागातर्फे कळवण्यात
आलं आहे.
****
राष्ट्रीय कृष्ठरोग निवारण
कार्यक्रमा अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं कालपासून स्पर्श हे जनजागृतीपर अभियान
सुरु केलं आहे. महानगरपालिकेच्या २४ क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन हे अभियान राबवलं जाणार
आहे. ‘कृष्ठरोग मुक्ततेच्या दिशेने’ असं या स्पर्श अभियानाचं ब्रीदवाक्य आहे. हे अभियान
येत्या १४ फेबुवारीपर्यंत चालणार आहे.
****
३० वर्ष पत्रकारिता केलेल्या
ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून
देण्यासाठी तसंच पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं
माहिती आणि जनसंपर्क तसंच विधी आणि न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
कोल्हापूर इथं आज त्यांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं, त्यानंतर त्या वार्ताहरांशी
बोलत होत्या. पत्रकार सन्मान योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात
निधीची तरतूद केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment