Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जानेवारी २०२२ सायंकाळी
६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा
वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या
सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या
उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा.
कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३
९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
एनसीसीच्या
महाराष्ट्र पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी पटकावला पीएम बॅनर.
·
भाजपच्या
१२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द.
·
कृषीपंपाचा
वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी राज्यशासनाला उच्च न्यायालयाची नोटीस.
आणि
·
उस्मानाबाद
जिल्ह्यात प्रलंबित कर्ज प्रकरण त्वरित निकाली काढण्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
डॉक्टर भागवत कराड यांची सूचना.
****
राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या
महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी दमदार कामिगिरी करत पीएम बॅनर जिंकला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या
संचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या संचलनाची आज दिल्लीत करिअप्पा
मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सांगता झाली. त्यावेळी पंतप्रधानांच्या
हस्ते या पथकाला मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आलं. राज्यातील एनसीसी सिनीयर एअर फोर्स विंगची छात्रसैनिक, वॉरंट
ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली. छात्रसेनेच्या या पथकाचं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या १२
आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. दरम्यान, सरकारला आपली चूक सुधरवण्याची
संधी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. मात्र,ठाकरे सरकारनं अहंकारात ती संधी गमावली
आणि त्यातूनच आजचा निर्णय आल्याचं भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं. न्यायालयाच्या
निकालानंतर ते आज माध्यमांशी बोलत होते. न्यायालयाच्या या निर्णयावर राज्य सरकारने
कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये, असा इशाराही शेलार यांनी यावेळी दिला.
या निर्णयावर विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं
स्वागत करत, न्यायालयाचे आभार मानले आहेत.
****
कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित
करणे हे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग आहे. या विषयी, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव
यांच्यासह वीज नियामक आयोग आणि संबंधीत अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याची
माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
दिली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे वकील अजय तल्हार यांच्या मार्फत घनवट
यांनी प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
****
येत्या ३० जानेवारीला होणाऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला
आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केल्यानंतर अकरा वाजून ३० मिनिटांनी
हा कार्यक्रम सुरू होईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, मन की
बात चा हा ८५ वा भाग असेल.
****
आध्यात्मिक गुरु आणि सामाजिक
कार्यकर्ते भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर इथल्या न्यायालयानं तीन आरोपींना
दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये भय्यू महाराजांचा सेवक विनायक
दुधाळे, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक यांचा समावेश आहे. हे तिघं पैशासाठी
महाराजांचा छळ करत असल्याचं तसंच त्यांनी महाराजांना ब्लॅकमेल केल्याचं न्यायालयात
सिद्ध झालं. १२ जून २०१८ रोजी महाराजांनी कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली साडे तीन
वर्ष चाललेल्या या प्रकरणात, न्यायालयानं ३२ जणांची साक्ष नोंदवली, तसंच १५० पुरावे
तपासून तिघा दोषींना सहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या
वतीनं कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर १४ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात
येणार आहे. संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. ऊसाचा दुसरा हप्ता, सक्तीची वीज तोडणी बंद करून दिवसा १० तास वीज पुरवठा,
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार अनुदान, आदी मागण्यांसाठी हा
मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात मुद्रा
योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली कर्ज प्रकरण तसंच महिला बचत गटांचे कर्ज प्रस्ताव त्वरित
निकाली काढण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिल्या
आहेत. आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हा बाहेर काढण्यासंदर्भात झालेल्या
आढावा बैठकीत कराड आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जिल्ह्यातल्या
शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास यासह पायाभूत सुविधांचा कराड यांनी यावेळी आढावा घेतला.
किसान क्रेडिट कार्ड योजना, तसंच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी अर्थसहाय्य
करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि
क्षेत्रविकास प्राधिकरण -म्हाडा ची तांत्रिक तसंच अतांत्रिक संवर्गातली ५६५ पदं भरण्याकरता
सरळ सेवा भरतीद्वारे ऑफलाईन पद्धतीने होणारी परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
३१ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या परीक्षा केंद्रांवर
ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली असल्याचं, सागर यांनी सांगितलं.
****
नागरिकांनी चांगले आरोग्य
आणि प्रतिष्ठेसाठी स्वच्छतागृहाचा नियमित वापर करण्याचं आवाहन परभणीचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. टाकसाळे यांच्या हस्ते आज सेलू तालुक्यातील
ढेंगळी पिंपळगाव इथं सार्वजनिक स्वच्छतागृहाचं लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत
होते. यावेळी त्यांनी मनरेगा अंतर्गत बांधकाम सुरु असलेल्या विहिरीच्या कामाची पाहणी
केली.
****
जालना जिल्ह्यात आज २८२ नवीन
कोविड बाधित रुग्ण आढळून आले. आज कोविडमुक्त झालेल्या २८४ रुग्णांना सुटी देण्यात आली
तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातले ६२ हजार ७७५ रुग्ण कोविडमुक्त
झाले आहेत. जिल्ह्यात सध्या २ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
No comments:
Post a Comment