आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ जानेवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची
सुरुवात आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रातल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
अभिभाषणानं होत आहे. या अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभेचे
सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसंच अर्थसंकल्पीय
अधिवेशनाचं सर्व कामकाज सुरळितपणे पार पाडण्यास सर्व पक्षाच्या सदस्यांचं सहकार्य मिळावं,
यासाठी सरकारनं देखील आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. २०२१-२२ या वर्षासाठीचा आर्थिक
सर्वेक्षण अहवालही आजच संसदेत मांडण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या
एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
राष्ट्रीय महिला आयोगाच्या
३०व्या वर्धापन दिनानिमित्त आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार असलेल्या कार्यक्रमाला,
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. ‘ती
- एक परिवर्तक’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध
क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव केला जाणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर
तालुक्यातल्या शिवराई फाट्याजवळ दोन आयशर ट्रक मध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू
झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री हा अपघात झाला.
****
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी
तालुक्यातल्या ठेपणपाडा इथं पोलिसांनी अफुच्या शेतीवर छापा टाकून सुमारे आठ लाख रुपयांची
अफू जप्त केली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
****
ऊसाच्या बिलातून शेतकऱ्यांची
थकीत वीज बिल वसुली होऊ देणार नाही, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं
आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. राज्य शासनाच्या अशा प्रकारे वीज बिल वसूल करण्याच्या
निर्णयाला विरोध दर्शवत, शेतकऱ्यांकडून ही वीज बिल वसुली केली तर भाजपतर्फे आंदोलन
केलं जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल ४७४
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ३२२ तर
ग्रामीण भागातले १५२ रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला.
****
No comments:
Post a Comment