Friday, 28 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. इतर मागासवर्गीयांचं- ओबीसी राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं आहे. सुनावणी दरम्यान, न्यायालयानं राज्य सरकारला, तब्बल एक वर्षासाठी आमदारांचं निलंबन करणं योग्य नसल्याचं सांगितलं. एका आमदारांचं निलंबन म्हणजे केवळ एकट्याचं नव्हे तर त्या संपूर्ण मतदारसंघाचं निलंबन होतं. त्यामुळे त्या मतदारसंघाला दिलेली ही एक प्रकारची शिक्षाच आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या निलंबनामुळे लोकशाहीमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आमदारांना ६० दिवसांपेक्षा अधिक काळ निलंबित करणं म्हणजे बडतर्फ केल्यासारखं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत, न्यायालयाचे आभार मानले आहेत.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आज ते सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळला. यावेळी न्यायालयानं नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास सांगितलं होतं. यासाठी न्यायालयानं नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. तसंच तोपर्यंत त्यांना अटक करु नये असे निर्देश देत दिलासा दिला होता.

****

देशव्यापी कोविड लसीकरण मोहीमेअंतर्गत देशात आतापर्यंत एकशे चौसष्ठ कोटी चव्वेचाळीस लाखांहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल देशभरात २ लाखांहून अधिक कोविड संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले तर ३ लाख ४७ हजारांहून अधिक लोक या आजारातून बरे झाले आहेत. सध्या देशभरात २१ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६ शतांश टक्के आहे.

देशात आतापर्यंत ७२ कोटी ३७ लाखांहून कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारनं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १६३ कोटी ९६ लाखांहून अधिक मोफत लसीच्या मात्रा उपलब्ध करुन दिल्या असून राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या १३ कोटी ३२ लाखांहून अधिक लसीच्या मात्रा शिल्लक आहेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.

****

२०२१ च्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या देशाच्या निर्यातीत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२० मध्ये या काळात ७ अरब ४० कोटी अमेरिकन डोलर्सची इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्यात झाली होती तर २०२१ मध्ये ही निर्यात वाढून ११ अरब अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. सर्वाधिक निर्यात अमेरिकेला १८ टक्के तर त्याखालोखाल संयुक्त अरब अमिरातला झाली आहे.

****

पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यातलं लाला लजपतराय यांचं साहस, समर्पण आणि संघर्ष देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलली आहे. आयोगानं पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ८६ उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या व्यतिरीक्त आणखी काही उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी असे आदेश नागपूर आणि औरंगाबादच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणनं दिले होते. यासाठी आवश्यक तयारी करायला वेळ नसल्यानं उद्यापासून सुरू होणारी ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

****

No comments: