Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 27 January 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहात साजरा, नवी दिल्लीत राजपथावर देशाच्या सैन्यदलांचं
सामर्थ्य तसंच संस्कृतीचं दर्शन, वायूदलाच्या ७५ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं
· राज्यातही झेंडावंदनासह विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा
· राज्याचा अर्थसंकल्प अकरा मार्च रोजी सादर केला जाणार - अर्थमंत्री अजित पवार
· मुंबईत एका आंतरराज्यीय टोळीकडून सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त
· राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा नवा रुग्ण नाही, मात्र कोविड संसर्गाचे ३५ हजार
७५६ नवे रुग्ण, मराठवाड्यात आठ रुग्णांचा मृत्यू तर तीन हजार १९६ बाधित
· निर्भया पथकासह विविध निर्भया उपक्रमांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
· औरंगाबाद शहरातील खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातल्या विविध विकास कामांचं पर्यावरण
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
आणि
· अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांचं निधन
****
त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक
नियमांचं पालन करत उत्साहात साजरा झाला. नवी दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित
शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर
वेळी उपस्थित होते. देशाच्या सैन्यदलांचं सामर्थ्य तसंच देशाच्या संस्कृतीचं संचलन,
या सोहळ्यात पहायला मिळालं. यंदा प्रथमच वायूदलाच्या ७५ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं
संचलनाचं वैशिष्ट्यं ठरली. सैन्यदलांसह विविध राज्यांचे २५ चित्ररथ संचलनात सहभागी
झाले होते. महाराष्ट्राचा जैवविविधता मानके हा चित्ररथ या पथसंचलनाचं आकर्षण ठरला.
दर्शनी भागात असलेली ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची भव्य प्रतिकृती, राज्य फुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ,‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसंच हरियाल
या राज्यपक्षाची प्रतिकृती, आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती.
****
राष्ट्रनिर्माण कार्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असून, स्वातंत्र्याचं अमृत
महोत्सवी वर्ष साजरं करताना आपण सर्वांनी एकत्र येऊन एक नवं, बलशाली राज्य घडवण्याच्या
दृष्टीनं संकल्प करू या, असं आवाहन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मुंबईत
प्रजासत्ताक दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. राज्यानं आरोग्य,
पर्यावरण, उद्योग-गुंतवणूक, शेती, तसंच पायाभूत सुविधांसह, विविध क्षेत्रात गेल्या
अडीच वर्षात भरीव कामगिरी केल्याचं, राज्यपाल म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
झालं. जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याची दखल राज्य मंत्रिमंडळानं
घेतली असल्याचं सांगत देसाई यांनी, प्रशासनाचं कौतुक केलं. विविध विकासात्मक कामांमुळे
जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचं ते यावेळी म्हणाले.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते
ध्वजारोहण झालं. महावितरण प्रादेशिक कार्यालय आणि महावितरण परिमंडल कार्यालय इथं महावितरण
प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आलं. यावेळी घटना उद्देश पत्रिकेचं गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी
सामुहिक वाचन केलं.
****
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन, पहिली
ते पाचवी पर्यंतचे वर्ग येत्या एक फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस
असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. कोविडच्या तिसऱ्या लाटेत ग्रामीण भागात वाढती रुग्णसंख्या
पाहता नागरिकांनी खबरदारी बाळगावी, कोविड अनुषंगिक वर्तन ठेवावं, तसंच लसीकरणाचं महत्त्व
लक्षात घेऊन, लसीकरणाचं प्रमाण वाढवावं, असं आवाहन टोपे यांनी केलं.
नांदेड इथं पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री
अशोक चव्हाण यांच्या हस्ते, बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री धनंजय मुंडे
यांच्या हस्ते, तर लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते, ध्वजारोहण करण्यात
आलं. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकाला ५० हजार रुपये मदतनिधी
दिला जातो, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ११६ मृतांच्या वारसांना हा निधी देण्यात
आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तुळजाभवानी क्रीडासंकुलाच्या
मैदानावर मुख्य ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा म्हणून केंद्र
सरकारनं जाहीर केला असून, विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी केंद्र आणि
राज्य शासनाच्या निधीतून प्रयत्न होत असल्याचं, गडाख यांनी यावेळी सांगितलं.
परभणीत प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या
हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा
यावेळी सत्कार करण्यात आला.
हिंगोली शहरात संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली,
कोविडमुळे आनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये ठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं, तसंच
वीर मातेला सरकारच्या वतीनं चार एकर जमीन दिल्याचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं.
****
यवतमाळ इथं पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते, धुळे इथं पालकमंत्री अब्दुल
सत्तार यांच्या हस्ते, तर अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं.
****
राज्याचा अर्थसंकल्प अकरा मार्च रोजी सादर केला जाणार असल्याचं, उपमुख्यमंत्री
तसंच अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यात माध्यमांशी
संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर- जीएसटी संदर्भात केंद्र
आणि राज्य सरकारांमध्ये, महसूल वाटपाबाबतचा पाच वर्ष मुदतीच्या कराराचा कालावधी आता
संपणार आहे. कोरोना प्रादुर्भावाची दोन वर्ष सर्वांना अडचणीची गेल्याचं सर्व राज्यांच्या
अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारला सांगितलं आहे. त्यामुळे राज्याला केंद्राकडून मिळणाऱ्या
महसूली रक्कमेचा टक्का पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले.
****
मुंबईत भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून वितरीत करण्याच्या उद्देशानं आलेल्या
एका आंतरराज्यीय टोळीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलं. या टोळीकडून सात कोटी रुपये,
सात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली
आहे. दहिसर तसंच अंधेरी परिसरात या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चार व्यक्ती २००० रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये
येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी दहीसर चेकनाक्यावर
संबंधित गाडीची झडती घेऊन दोन हजार रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण पाच कोटी
रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या आरोपींचे आणखी काही साथीदार अंधेरी इथं असल्याची
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागातून तीन आरोपींकडून दोन कोटी रुपयांच्या बनावट
चलनी नोटा जप्त केल्या. या सात आरोपींना काल न्यायालयात हजर केलं असता, त्यांना ३१
जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या
ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ एवढी असून, यापैकी एक हजार ५३४ रुग्ण
संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३५ हजार ७५६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ७६ लाख पाच हजार १८१ झाली आहे. काल ७९ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार
२३७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ३९ हजार ८५७ रुग्ण बरे
झाले, राज्यात आतापर्यंत ७१ लाख ६० हजार २९३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक १५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
दोन लाख ९८ हजार ७३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल तीन हजार १९६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर आठ रुग्णांचा
मृत्यू झाला. मृतांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या चार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर
परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ९५८ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले
६७५, तर ग्रामीण भागातले २८३ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ६११, लातूर ४३०, बीड २९५, परभणी २७८, जालना २७६, उस्मानाबाद
२६६, तर हिंगोली जिल्ह्यात ८२ रुग्णांची नव्यानं नोंद झाली.
****
निर्भया पथकामुळे महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचा
विश्वास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. निर्भया पथकासह विविध निर्भया
उपक्रमांचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, दूरदृष्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. निर्भया संकल्पगीताचं लोकार्पण गृहमंत्री
दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झालं. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं हे गीत,
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केलं आहे. शेट्टी यांनी यावेळी ५० लाख रुपये
निधी निर्भया पथकासाठी दिला. याच निमित्तानं मुख्यमंत्री निधीत धनादेशाद्वारे जमा झालेला
११ लाख रुपये निधीही महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी बोलताना, निर्भया प्रकरणानंतर गुन्हे
दाखल होण्याचं प्रमाण वाढल्याची माहिती दिली. विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे
यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.
****
औरंगाबाद शहराचा शाश्वत विकास खाम नदीच्या पुनरूज्जीवन कामातून दिसतो. अशा कामांची
राज्यात गरज असल्याचं, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद
इथं खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातल्या विविध विकासकामांचं लोकार्पण केल्यानंतर बोलत
होते. महापालिका, स्मार्ट सिटी, इको सत्व, छावणी नगर परिषद, आणि व्हेरॉक कंपनी यांच्या
संयुक्त विद्यमाने, शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या या पुनरुज्जीवन
कार्यक्रमात, वॉकिंग ट्रॅक, तलाव, बाल उद्यान,
ओपन जिम, व्हॉलीबॉल मैदान, खाम नदी प्रकाश योजना, योग लॉन, फुलपाखरू उद्यान, ऍम्पिथिएटर
आदी सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. राज्यातल्या इतर महापालिकांच्या आयुक्तांसमोर
या कामाचं सादरीकरण व्हावं, असं ठाकरे यांनी नमूद केलं. खाम नदीच्या पुनरूज्जीवन कामात
काम करणाऱ्या प्रत्येकाचा ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं.
दरम्यान, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयातल्या सुसज्ज आणि आधुनिक
इनडोअर फायरिंग रेंज आणि बॉक्सिंग रिंगचं लोकार्पण, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या
हस्ते काल झालं.
****
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष किसनराव वरखिंडे यांचं काल सायंकाळी
नांदेड इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक
विकास महामंडळाचे ते पहिले अध्यक्ष होते. वरखिंडे यांनी सहकार, प्रबोधन, सामाजिक चळवळीत
भरीव योगदान दिलं आहे.
****
No comments:
Post a Comment