Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा
वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या
सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना
विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या
उपायांचं पालन करा.. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा.
कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३
९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा..
****
·
महाराष्ट्रासह
उत्तर प्रदेश, दिल्ली, ओडीशामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण
कमी झालं.
·
जालना
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे १५६ नवे रुग्ण.
·
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू होणार.
आणि
·
तुळजाभवानी,
महालक्ष्मी मंदिर, रेणापूरचे रेणुका मंदिरासारख्या प्राचीन मंदिरांचा विकास करणार
- सांस्कृतिक विकास मंत्री अमित देशमुख यांची घोषणा.
****
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश,
दिल्ली, ओडीशामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी झालं असल्याची
माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या या संसर्गाच्या सुमारे बावीस
लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या आठवड्यातलं रुग्ण सापडण्याचं प्रमाण १७
पूर्णांक ७५ शतांश टक्के आहे, अशी माहिती या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आज पत्रकार
परिषदेत दिली. पुणे, एर्नाकुलम आणि नागपूरमध्ये रुग्ण आढळण्याचं प्रमाण खूप अधिक असल्याची
माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली. अठरा वर्षे वयावरच्या ९५ टक्के नागरिकांना या संसर्गाच्या
प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात आली आहे. ‘ई संजीवनी ॲप’च्या माध्यमातून
डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
अन्य देशांच्या तुलनेत देशातलं रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. सापडणाऱ्या रुग्णांमध्ये
सर्वाधिक रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. या महिन्यात आढळलेले ७५ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे
असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात आज कोरोना
विषाणू संसर्गाचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. या संसर्गातून मुक्त झालेल्या २२३ रुग्णांना
रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले ६२ हजार ४९१ रुग्ण संसर्मुक्त
झाले आहेत. जिल्ह्यात सध्या या संसर्गाच्या दोन हजार एकशे ६१ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
बंद असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शाळा आता टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहेत.
यासंबधी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
राहुल गुप्ता यांनी संयुक्तपणे आदेश काढले आहेत. कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं
पालन करून नववी ते बारावीचे वर्ग ३१ जानेवारीपासून दररोज सुरू होणार आहेत, तर जिल्ह्यातल्या
दहावी आणि बारावीचे वर्ग पूर्ववत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. उस्मानाबाद
जिल्ह्यातले पहिली ते आठवीचे वर्ग पाच फेब्रुवारीपर्यंत बंदच असणार आहेत, असं या आदेशांमध्ये
नमूद आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे आमदार
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. संतोष परब
हल्ला प्रकरणी नितेश राणे यांनी येत्या दहा दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर व्हावं,
असे निर्देश सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती
ए एस बोपण्णा यांच्या पीठानं दिले आहेत. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि सिद्धार्थ लुथरा
यांनी राणे यांची बाजू मांडली तर अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारतर्फे युक्तिवाद
केला.
****
राज्यातल्या तुळजाभवानी,
महालक्ष्मी मंदिर, रेणापूरचे रेणुका मंदिर या सारख्या प्राचीन मंदिरांचा पुरातत्व विभागांतर्गत
विकास आराखडा आखून विकास करणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक विकासमंत्री अमित
देशमुख यांनी दिली. लातूर जिल्ह्यातल्या औसा, लातूर आणि रेणापूर तालुक्यातल्या काही
गावांच्या विकास कामाचं दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी उद्घाटन केलं, त्यावेळी देशमुख
बोलत होते. या विकास कामाची सुरवात रेणुका माता मंदिरापासून करू तसंच डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या पानगाव चैत्यभूमीचा विकास करणार असल्याचं ते म्हणाले.
लातूर जिल्ह्यात कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी मोठी व्यवस्था उभी केली असून येणाऱ्या
काळात संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी जिल्ह्यात वेगळी व्यवस्था निर्माण करू तसंच
येत्या काही दिवसांत जिल्ह्यात ‘मोहल्ला क्लिनिक’ ही संकल्पना राबवणार असल्याचं देशमुख
यांनी यावेळी सांगितलं.
****
वेरूळ लेणी समोरच्या वेरूळ
वन उद्यानाचं लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केलं. या उद्यानात विविध
प्रजातींची आणि औषधी वनस्पती आहेत. ठाकरे यांनी वेरूळ पर्यटन केंद्र, कैलास लेणी आणि
परिसरासह शहाजी महाराज भोसले स्मारकाची पाहणीही केली. औरंगाबाद शहरातल्या प्रियदर्शनी
उद्यानात उभारण्यात येणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
स्मारक आणि स्मृती वनाच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला. दोन वर्षांत नुतनीकरण झालेल्या
शहरातल्या रस्त्यांची त्यांनी पाहणी केली. ठाकरे यांनी काही रस्त्यांच्या नुतनीकरणासंदर्भात
महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना सूचनाही दिल्या.
****
औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा
येत्या शनिवारी २९ जानेवारी रोजी विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली
आहे. फारोळा इथल्या पंपगृहात विद्युत रोहीत्राच्या कामासाठी चार तास खंडणकाळ घेण्यात
येणार आहे. त्यामुळे या काळात पाणी पुरवठा योजनेची उचल पूर्णत: बंद राहणार असल्यानं
शहरातल्या पाणी वितरणावर शनिवारी परिणाम होणार असल्याचं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं
आहे.
****
औरंगाबाद आणि परिसरात थंडीचा
जोर कायम आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा गेल्या दोन वर्षांतील निचांकी
पातळीवर घसरला आहे. आज धुळ्यात २पूर्णांक ८ अंश सेल्सिअस तपामानाची नोंद झाली.
****
परभणी जिल्ह्यात स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यातल्या कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभागाच्या वतीनं
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जायकवाडी परिसर या विभागीय कार्यालयात
‘स्वातंत्र्यापूर्वीची आणि स्वातंत्र्यानंतरची सिंचन परिस्थिती’ या विषयावर संगणकीय
सादरीकरण झालं. ढालेगाव उच्च पातळी बंधारा इथंही शेतकरी आणि स्थानिकांनाही या सिंचन
परिस्थितीची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment